esakal | कामशेत : वीज पडून चार वर्षात सातजणांचा मृत्यू | Lightning
sakal

बोलून बातमी शोधा

Lightning
कामशेत : वीज पडून चार वर्षात सातजणांचा मृत्यू

कामशेत : वीज पडून चार वर्षात सातजणांचा मृत्यू

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

कामशेत - गेल्या चार वर्षांत अवकाळी पावसात वीज पडून सात जणांचा मृत्यू झाला आहे. परतीच्या पावसात मेघगर्जनेसह विजांचा कडकडाटात तीनजण जखमी झाले. भंडारा डोंगराच्या पायथ्याशी वीज पडून काही बकऱ्या मृत पावल्या होत्या.

चार दिवसापूर्वी खांडीतील राज भरत देशमुख हा चौदा वर्षांचा मुलगा बैल आणायला गेला होता. अवकाळी पावसात झाडाच्या आडोशाला थांबला असता, त्याच्यावर वीज पडली. यात तो मृत्यू पावला. कळकराईच्या भागाबाई सोभाजी कावळे तीन दिवसांपूर्वी गोठ्यात जनावरे बांधायला जात असताना त्यांच्यावर वीज पडली. मागील वर्षी बेलजचे बळिराम भीमा वाजे वीज पडून गतप्राण झाले. तीन वर्षापूर्वी नेसावेतील खंडू धोंडू शिरसट, शोभा अंकुश शिरसट, कचरेवाडीतील सुनंदा भाऊ कचरे यांचाही वीज पडून शेतात काम करताना मृत्यू झाला.

चार वर्षापूर्वी मेंढ्या राखायला गेलेल्या कल्हाटच्या पोपटाबाई दादू सप्रे या महिलेचा वीज पडून जागेवरच मृत्यू झाला होता. याच वर्षी बोरवलीतील सुरेश भिकाजी शेलार, सोपान दत्तात्रेय शेलार, किसन तुकाराम जाधव या तिघांवर रानात जनावरे राखीत असताना वीज पडली होती. यात तिघेही जखमी झाले होते. याच आठवड्यात भंडारा डोंगराच्या पाठीशी तळ ठोकलेल्या मेंढपाळांच्या तळावर वीज पडून काही मेंढ्या मृत्यू पावल्या होत्या.

खांडीच्या स्मशानभूमीजवळ वीजरोधक टॉवर उभा केला आहे. सरकारच्या नियमानुसार टॉवरपासून दोन किलोमीटरपर्यंत वीज पडण्याचा धोका निर्माण होत नाही. असे असताना या टॉवरपासून काही अंतरावर असलेल्या राज देशमुख हा चौदा वर्षांचा मुलगा विजेचा बळी कसा ठरला, असा प्रश्न गावकरी उपस्थित करीत आहेत.

loading image
go to top