कामशेतचा पूल सोशल मीडियावर पुन्हा ट्रोल; नागरिक विचारताहेत जाब

सकाळ वृत्तसेवा
Tuesday, 16 February 2021

कामशेतचा उड्डाणपूल सोशल मीडियावर पुन्हा ट्रोल होऊ लागला आहे.

कामशेत (ता. मावळ) : कामशेतचा उड्डाणपूल सोशल मीडियावर पुन्हा ट्रोल होऊ लागला आहे. धिम्या गतीने सुरू असलेल्या कामाला मावळवासीय त्रस्त झाले आहेत. दररोज प्रवास करणारे वाहनचालक सोशल मीडियावर वेगवेगळ्या कमेंट्स टाकून पुलाच्या रेंगाळलेल्या कामाचा प्रशासनाला जाब विचारत आहेत. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

महामार्गावर वारंवार होणारे अपघात टाळण्यासाठी महामार्गावर पवनानगर कडे जाणाऱ्या रस्त्याला उड्डाणपूल बांधण्याच्या कामाला उनपुरी पाच वर्षे सरून गेली. चार वेळा मुदतवाढ देण्यात आली. सर्वपक्षीय नागरिकांनी आंदोलन केले. तीन महिन्यांपूर्वी आमदार सुनील शेळके यांनी रस्ते विकास महामंडळाला पुलाचे काम तातडीने पूर्ण करा अशा सूचना दिल्या. या सूचनांचे पालन करीत रस्ते विकास महामंडळाने कामाला गती दिली. दोन महिन्यात काम पूर्ण होईल, असेही रस्ते विकास महामंडळाकडून सांगण्यात आले. महिनाभर कामाने जोर पकडला. त्यानंतर पुन्हा धीम्यागतीने काम सुरू झाले. ओव्हरहेडचा प्रश्नही संगनमताने सुटला तरीही काम धिम्या गतीने सुरू असल्या बाबतीत नागरिक आश्चर्य व्यक्त करीत आहेत. इतकेच काय पुलाचा ठेकेदार, अधिकारी पुलाकडे फिरकतात की नाही, अशी विचारणा करणारी पोस्ट सोशल मीडियावर फिरू लागली आहे. 

- पिंपरी-चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

वस्तुस्थिती पाहण्यासाठी ‘सकाळ’ने पुलाची पाहणी केली असता पुलाच्या दोन्ही बाजूला मातीचा भराव टाकला. पुण्याच्या दिशेला खोदाई केली आहे. ओव्हर हेडच्या टॉवरसाठी काम अपूर्ण दिसले. एक जेसीबी मशिन आणि रस्त्याच्या कामाचे एक असे दोन मशिन काम न करता साइटवर उभे दिसले. सात मजूर जोड्या काम करताना दिसल्या. येथे काम करणारा मजूर सांगत होता. पंधरा दिवसांपासून काम बंद आहे. दिवसाची हजेरी बुडू नये म्हणून आम्ही काम करतोय. येथे काम करणाऱ्या अधिकाऱ्यांशी संपर्क होऊ शकला नाही. कामशेतच्या पुलाची अधिक चर्चा न होता हे काम तातडीने मार्गी लागावे, अशी अपेक्षा ग्रामपंचायत सदस्या अंजना मुथा यांनी व्यक्त केली. 

चालक, रहिवाशी त्रस्त 

कामशेतचा उड्डाणपूल तालुकाभर चर्चेचा विषय ठरला आहे. ग्रामीण भागातील हजारो नागरिकांचे रोजच येथे ये-जा आहे. पश्चिम महाराष्ट्रासह उत्तर महाराष्ट्राकडे जाणारी हजारो वाहने याच रस्त्याने धावत आहे. कंटेनर चालक असो की आलिशान मोटारचालक त्यांना सेवा रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यातून जावे लागते. जीव धोक्यात घालून महामार्गापलीकडील नागरिक, मुले, महिला ये-जा करीत आहेत. येथे सतत होणारी वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी बारा तास पोलिस उभे आहेत. 

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: kamshet's bridge again trolls on social media due to lingering work