आधी पाणी स्थानिकांना, मग ‘बाहेरच्यांना’! | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

water tanker

‘पाणी तुमच्यासाठी नाही. जे आम्ही तुम्हाला पुरवत आहोत ती मेहेरबानी समजा. बाहेरच्यांना पाणी देण्याची जबाबदारी आमची नाही.

आधी पाणी स्थानिकांना, मग ‘बाहेरच्यांना’!

पिंपरी - ‘पाणी तुमच्यासाठी नाही. जे आम्ही तुम्हाला पुरवत आहोत ती मेहेरबानी समजा. बाहेरच्यांना पाणी देण्याची जबाबदारी आमची नाही, असे स्थानिक पदाधिकारी व ग्रामपंचायत सदस्य थेट बोलतात. मी येथे सोळा वर्षांपासून राहत असून वेळच्या वेळी कर भरूनही केवळ स्थानिक नसल्याने पाणी देणार नाही, असे सांगितले जाते. इतके वर्षे येथे राहूनही हे लोक आम्हाला स्थानिक समजत नाही, ही मोठी शोकांतिका आहे. पुण्यातील अधिकाऱ्यांशी संपर्क केला असता ते हात वर करतात, तुमचे प्रश्न तुम्ही स्थानिक पातळीवर प्रश्न सोडवा असे सांगतात...’, अशी व्यथा वेहरगावच्या कल्पना वरळीकर यांनी ‘सकाळ’च्या प्रतिनिधीजवळ मांडली.

कार्ला प्रादेशिक पाणीपुरवठा नळ योजनेचा पुरता बोजवारा उडाला आहे. आठ-आठ दिवस कार्ला ग्रामपंचायत पाणीच सोडत नाही आणि सोडले तरी तासभरच सोडतात, तेही अपुऱ्या दाबाने. पाणीही गढूळ असते, अशा तक्रारी स्थानिक रहिवाशांनी मांडल्या. या परिसराला भेट देवून माहिती घेत असताना स्थानिक नागरिकांनी पाणी समस्येमुळे येणाऱ्या अनेक अडचणींचा पाढा वाचला.

ग्रामपंचायत आणि कार्ला प्रादेशिक पाणी पुरवठा योजना, प्राधिकरणाकडे रीतसर पाणी परवाना भरला आहे. त्यासाठी आवश्यक तेवढी अनामत रक्कम भरली. याला पाच ते सात वर्षे होवूनही अद्याप पाणी मिळत नसल्याचे नागरिक, हॉटेल व्यावसायिक, भक्त निवास चालक, गृहनिर्माण संस्थेतील घरमालक सांगतात. एकवीरा देवीच्या दर्शनाला येणारे भाविक आणि पर्यटक यांची मंगळवार, शुक्रवार, शनिवारी व रविवार या दिवशी मोठी गर्दी असते. मुक्कामाला येणाऱ्या भाविक, पर्यटकांना पुरेसे पाणी मिळावे यासाठी आम्ही टँकर विकत घेतो, असे असल्याचे हॉटेल चालक, भक्त निवास चालक, होम-स्टे चालक सांगतात.

मुंबई, रायगडसह कोकणातील शेकडो नागरिकांनी या परिसरातील गृहनिर्माण प्रकल्पात फ्लॅट घेतले आहेत. काहींचे रो हाउस, बंगलो आहेत. तेही विकेंडला येत असतात. त्यांनाही टँकरशिवाय पर्याय नाही. कार्ला आणि वेहरगाव ग्रामपंचायत कर्मचारी पाणी सोडत नाहीत. ‘आधी गावकऱ्यांना पाणी, तुम्हाला नाही’, अशी त्यांची अरेरावीची भाषा असते. आम्ही वेळेवर ग्रामपंचायत कर भरतो. वीजबिल, पाणीपट्टी भरतो, मग आम्हाला पाणी का नाही? असा नागरिकांचा संतप्त सवाल आहे.

पांढऱ्या बगळ्यांचा गोरखधंदा!

कार्ला परिसरातील रहिवासी सोसायट्या, गृहनिर्माण प्रकल्प, हॉटेल, भक्तनिवास यांना ग्रामपंचायतीने पाणी पुरविले नाही की, त्यांना आपोआपच टँकर विकत घ्यावा लागतो, असा हा गोरख धंदा सुरू आहे. पांढरे बगळेच हे धंदे करीत असल्याने त्यांना रोखणार कोण? असा प्रश्न उपस्थित होत आहे.

गरिबांना व भक्त निवासांना ग्रामपंचायतीचे पाणी मिळत नाही. त्यामुळे भक्तांचे हाल होवू नयेत म्हणून पिण्याचे पाणी टँकरने मागावे लागते. यासाठी बाराशे रुपये रोख द्यावे लागतात. बंगलेधारकांनाही पाणी मिळत नाही.

- दत्तात्रेय पानसरे, व्यवस्थापक, आई एकवीरा देवी भक्त मंडळ निवास

‘सेकंड होम’ म्हणून माझे येथे रो हाउस आहे. २४ बंगल्यांची आमची सोसायटी आहे. प्रत्येक बंगलाधारकाने स्वतःची कूपनलिका घेतली आहे. मात्र, आता त्याला पाणी मिळत नाही. आमच्या येथे कूपनलिका व टँकरशिवाय पर्याय नाही. वारंवार सांगूनही ग्रामपंचायत लक्ष देत नाही. स्वतंत्र जलवाहिनी टाकता येईल. परंतु पुन्हा त्यात जाणीवपूर्वक अडथळा आणला जातोय.

- भूपेंद्र पाटील, मुंबई

आमच्या नऊ ते दहा माणसांच्या कुटुंबाला देखील पाणी मिळत नाही. आठवड्यात तीन-चार तास पाणी येते ते देखील गढूळ पाणी असल्याने टँकरशिवाय पर्याय नाही. पाणी ही जीवनावश्‍यक बाब असल्यामुळे आम्हाला नाइलास्तव टँकर विकत घ्यावा लागतो.

- निखिल वैदी, मूळ रा. मुंबई, सध्या कार्ला

खासगी बंगल्यांना पाणी देण्याचा ग्रामपंचायतीचा संबंध नाही. जिल्हा परिषदेकडून त्यांनी थेट जोड घेतलेला आहे. मीटरने त्यांना पाणी दिले जाते. गावठाणाला पाणी देण्याचे काम ग्रामपंचायतीकडे आहे. ग्रामपंचायती शिवाय बाहेर पाणी वितरणाचे कामही जिल्हा परिषदेने नेमलेल्या ठेकेदाराकडे आहे.

- दीपाली हुलावळे, सरपंच, कार्ला ग्रामपंचायत

नळ योजना जुनी असल्याने व टाक्यांची साठवण क्षमता कमी असल्याने पाणी पुरवठा कमी होतोय. तरीही आम्ही १६ ते २२ तास पंप चालवतो. नवीन योजनेचे काम सुरु आहे. टँकरवाल्यांशी संगनमताने कर्मचारी पाणीच सोडत नाहीत किंवा कमी सोडतात, असा भाग नाही. आम्ही टाक्या भरुन देतो, तेथून वितरणाचे काम ग्रांमपंचायतीचे आहे.

- सुनील पटेकरी, उपअभियंता, पुणे जिल्हा परिषद

कार्ला परिसरात टँकरने पाणी विक्री करणारे वलवण धरणातून पाणी घेत असतील तर ते धरण टाटा समूहाचे आहे. परंतु इंद्रायणी नदीतून पाणी उचलत असतील तर आमच्याकडून अशी परवानगी कोणालाही दिलेली नाही. याबाबत कोणी तक्रार केल्यास आम्ही संबंधितांवर कारवाई करु.

- राजेंद्र धोडपकर, कार्यकारी अभियंता, जलसंपदा विभाग

Web Title: Karla Water Line Scheme Issue

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :waterPimpri Chinchwad
go to top