'या' नव्या फतव्यामुळे आयटी कर्मचारी धास्तावले, काय आहे त्यात...वाचा

सुधीर साबळे
मंगळवार, 30 जून 2020

कोरोनाचा संसर्ग वाढल्यानंतर पुण्यातल्या आयटी कंपन्यामध्ये काम करणारे अन्य शहरात राहाणाऱ्या कर्मचाऱ्यांनी सावधगिरीचा उपाय म्हणून घर गाठलं आणि तिथून वर्क फ्रॉम होम सुरु केलं.

पिंपरी : कोरोनाचा संसर्ग वाढल्यानंतर पुण्यातल्या आयटी कंपन्यामध्ये काम करणारे अन्य शहरात राहाणाऱ्या कर्मचाऱ्यांनी सावधगिरीचा उपाय म्हणून घर गाठलं आणि तिथून वर्क फ्रॉम होम सुरु केलं. मात्र, आता याच कर्मचाऱ्यांना (बेस लोकेशन) नोकरी असणाऱ्या शहरात परतण्याचा फतवा काही कंपन्यांनी काढल्यामुळं सुमारे एक हजार आयटी कर्मचारी कात्रीत सापडले आहेत. बेस लोकेशनला न आल्यास पगार कपात होऊ शकतो किंवा अन्य परिणामांचा सामना करावा लागू शकतो, या भीतीपोटी हे कर्मचारी धास्तावल्याचे वास्तव समोर आले आहे. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप   

नोकरी टिकवण्याचं आव्हान अन् कोरोनाची भीती 

पुणे आणि परिसरातील आयटी कंपन्यांमध्ये काम करणारे अनेक जण नाशिक, सातारा, सांगली, कोल्हापूर, कराड, याबरोबरच विदर्भ, मराठवाडा या भागातल्या शहरांमधील आहेत. पुण्यात कोरोना वाढू लागल्यानंतर आयटी कंपन्यांनी कर्मचाऱ्यांना वर्क फ्रॉम होमची सुविधा दिली. त्यामुळं सुरक्षेचा उपाय म्हणून शहरात राहाणाऱ्या बाहेरगावच्या अनेक कर्मचाऱ्यांनी आपलं घर गाठून तिथून काम सुरु ठेवलंय. केंद्र सरकारकडून लॉकडाउनच्या कालावधीसाठी जाहीर केलेल्या मार्गदर्शक तत्वानुसार आयटी कंपन्यांनी वर्क फ्रॉम होमची सुविधा जुलै महिन्याच्या अखेरपर्यंत सुरू ठेवण्याचे सांगितले आहे, असे असतानाही काही आयटी कंपन्यांनी बाहेरगावी असणाऱ्या कर्मचाऱ्यांना पुन्हा बोलावण्यास सुरुवात केली आहे. दरम्यान, पुण्यात कोरोनाचा संसर्ग कमी होत नसल्यामुळे इथे परतलो, तर कोरोनाची भीती आणि दुसरीकडे नोकरी टिकवण्याची कसरत अशा पेचात ही मंडळी सापडली आहेत. 

पिंपरी चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

राहणे, खाण्याचे होणार वांदे 

आयटीमध्ये काम करणारी तरुण मंडळी भाड्यानं घेतलेला फ्लॅट शेअर करून तर काही जण पेईंग गेस्ट म्हणून राहतात. आता पुण्यात परतल्यानंतर याठिकाणी प्रवेश मिळणार का, मेस देखील बंद आहेत. त्यामुळे राहायचं कसं, असा प्रश्‍न या कर्मचाऱ्यांना पडलाय. कुटुंब घेऊन घरी गेलेल्या मंडळींना देखील अशा प्रकारच्या अडचणींचा सामना करावा लागणार आहे. सरकारने अजून जिल्हाबंदी उठवलेली नाही. त्यामुळे पुण्यात येण्यासाठी सार्वजनिक वाहतुकीची सुविधा उपलब्ध नाही. पोलिसांचा पास काढणे आवश्‍यक आहे, अशा परिस्थितीत यायचं कसं, असा प्रश्‍न त्यांच्यासमोर उभा ठाकलाय. आयटी कंपन्यांकडून काढलेल्या अजब फतव्यामुळे ही मंडळी प्रचंड दबावाखाली आली आहेत. 

आयटीयन्स म्हणतात... 

पुण्यातला कोरोनाचा संसर्ग कमी होताना दिसत नाही. त्यामुळं इथं आल्यानंतर त्याची भीती कायम राहणार आहे. चुकून त्याचा संसर्ग झाल्यास त्याचा मोठा फटका बसू शकतो. त्यामुळे कंपन्यांनी बाहेरगावच्या कर्मचाऱ्यांना तूर्तात तरी बेस लोकेशनच्या ठिकाणी न बोलावता त्यांची वर्क फ्रॉम होमची सुविधा कायम सुरू ठेवावी. कोरोनाचा संसर्ग कमी झाल्यानंतर त्यांना इथं येण्याचा आग्रह धरावा, असे मत पी. मनोज या आयटी अभियंत्याने व्यक्‍त केले. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

आयटी कर्मचाऱ्यांना कोरोनाच्या संसर्गामुळं वर्क फ्रॉम होमची सुविधा देण्यात आलेली आहे. कोरोना अजून कमी झालेला नाही. त्यामुळं आयटी कंपन्यांनी त्यांना बेस लोकेशनला येण्याचा आग्रह धरू नये. 
- पवनजित माने, सदस्य, आयटी समिती, राज्य सरकार


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: latest news about it employees to returning job place pune pimpri chinchwad