Laxman Jagtap यांच्या पत्नीने घेतला उमेदवारी अर्ज; उमेदवारीबाबत भाजपचा निर्णय झाला? | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Laxman Jagtap

Laxman Jagtap यांच्या पत्नीने घेतला उमेदवारी अर्ज; उमेदवारीबाबत भाजपचा निर्णय झाला?

- जयंत जाधव

पिंपरी : चिंचवड विधानसभा मतदारसंघ पोटनिवडणुकीत बिनविरोध निवडणूक होण्याची शक्यता कमी असतानाच दुसरीकडे भारतीय जनता पार्टीच्यावतीने पूर्वतयारी जोरदारपणे सुरु करण्यात आली आहे. पक्षाच्यावतीने उमेदवारी अर्ज मागवून प्रदेशाकडे पाठविण्यात येणार आहेत. प्रदेशाकडून कोअर कमिटीकडे व त्यांच्याकडून दिल्लीत पार्लमेंटरी बोर्डाकडे पाठविण्यात येणार आहेत. त्यानंतर दिल्लीतून उमेदवाराचे नाव दिनांक ५ फेब्रुवारी रोजी अंतिम केले जाईल, अशी माहिती भाजपाचे शहराध्यक्ष, आमदार महेश लांडगे यांनी गुरुवारी (ता. २) दिली. (Laxman Jagtap news in Marathi)

प्रदेश व स्थानिक पातळीवर ही निवडणूक बिनविरोध होण्यासाठी आमच्यावतीने प्रयत्न केले आहेत. परंतु; निवडणूक बिनविरोध झाली नाही तरी आम्ही पक्षाच्या चिंचवड मतदारसंघात प्रभागनिहाय बैठका सुरु ठेवल्या आहेत. प्रदेश पातळीवरुन नेते मंडळी येणार असल्याचे लांडगे यांनी सांगितले.

दरम्यान, पक्षाच्यावतीने या मतदारसंघात बारकाईने लक्ष घालण्यात आले असून भाजपाचे पश्‍चिम महाराष्ट्र संघटन मंत्री मकरंद देशपांडे हे मोर्चेबांधणीसाठी मतदारसंघातील पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या गाठी-भेटी घेत आहेत.

दिवंगत आमदार जगताप यांच्या पत्नी अश्‍विनी जगताप यांनी नेला अर्ज

चिंचवड विधानसभा मतदारसंघातील भाजपाचे दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांच्या पत्नी अश्‍विनी जगताप यांच्यावतीने त्यांच्या एका महिला कार्यकर्त्याने आज गुरुवारी (ता. २) चिंचवड विधानसभा मतदारसंघाचे निवडणूक कार्यालय असलेल्या ‘ग’ क्षेत्रीय कार्यालयातून अर्ज नेला आहे. तर जगताप यांचे बंधु आणि भाजपा चिंचवड विधानसभेचे प्रभारी शंकर जगताप यांच्यावतीने देखील एका कार्यकर्त्याने उमेदवारी अर्ज नेला आहे. भाजपच्या वतीने निवडणूक लढणार असल्याची नोंद अर्ज नेताना करण्यात आली आहे.

भाजपच्यावतीने मतदारसंघातील १३ प्रभागाांमध्ये पक्षाच्यावतीने १३ निरिक्षक, १३ संयोजक व प्रत्येक प्रभागात ५ सहायक नेमण्यात आले आहेत. तसेच; प्रत्येक प्रभागात मतदारसंघा व्यतिरिक्त पिंपरी व भोसरी विधानसभा मतदारसंघातील १२५ कार्यकर्ते नेमण्यात आले आहेत. त्या कार्यकर्त्यांनी त्याच प्रभागात काम करावयाचे आहे. पक्षाच्यावतीने उमेदवाराचे नाव ५ फेब्रूवारी रोजी अंतिम केले जाणार आहे.

- महेश लांडगे, आमदार, शहराध्यक्ष, भाजपा पिंपरी-चिंचवड.

टॅग्स :BjpChinchwadLaxman Jagtap