esakal | महापौर पायउतार होण्यापूर्वी सांगवीच्या वाट्याला 1-2 तरी प्रकल्प येवू देत 
sakal

बोलून बातमी शोधा

at least 1-2 projects should come to Sangvi Before the mayer steps down

महापालिका स्थापन झाली त्यावेळी सांगवी परिसर विकसित झालेला आहे. 1987 नंतर 2019 मध्ये म्हणजे सुमारे तीस वर्षाच्या काळानंतर म्हणजे नानासाहेब शितोळे महापौर झाल्यानंतर ही संधी सांगवीच्या ढोरे यांना मिळालेली आहे.

महापौर पायउतार होण्यापूर्वी सांगवीच्या वाट्याला 1-2 तरी प्रकल्प येवू देत 

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

पिंपरी : ''शहराच्या महापौरपदी सांगवी येथील उषा ढोरे वर्षापूर्वी विराजमान झाल्या. याचा आम्हाला आनंद झाला, तसेच आता किमान पाच-सहा तरी नवी प्रकल्प आमच्या भागात येतील, असा आशावाद वाटला. मात्र, कारकीर्द संपत आली, तरी एकही प्रकल्प आला नाही याची खंत वाटते. आता त्या पायउतार होण्यापूर्वी एक-दोन तरी प्रकल्प सांगवीच्या वाट्याला येवून देत,''अशी उपरोधिक अपेक्षा राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर कार्याध्यक्ष प्रशांत शितोळे एका निवेदनाव्दारे व्यक्त केली. 

याबाबत आयुक्त श्रावण हर्डीकर यांना दिलेल्या या निवेदनात म्हटले आहे, ''आम्ही सांगवीकर म्हणून महापौरांना सहकार्य करण्यास कधीही कमी पडणार नाही. त्याचाच एक भाग म्हणून शितोळे परिवाराने आमच्या महापौरपदाच्या काळामध्ये सांगवीचा मान राखला जावा या भागात अनेक प्रकल्प केले आहेत. तसाच गौरव ढोरे यांचा व्हावा यासाठी सांगवी येथील सर्वे नंबर तीन मधील सांस्कृतिक केंद्राचे व क्रीडांगणाचे आरक्षण, तसेच सांगवी बोपोडी पुलाला आवश्‍यक असणारी खासगी जागा देण्याची तयारी दर्शविली. तसे लेखी कळविले देखील. या गोष्टीला आज दहा महिने झाले आहेत. तरीही यातील कोणताही प्रकल्प अद्याप मार्गी लागलेला नाही. सांगवी ग्रामस्थ मात्र महापौर पद सर्वोच्च असल्याने अनेक विविध प्रकल्प नागरिकांच्या दिमतीला उभे राहतील, अशी अपेक्षा अजून करत आहेत. आता जवळपास एक वर्ष होत आले तरीही सांगवी परिसरात डांबरी रस्त्यांचे काँक्रिटकरण आणि जुन्या इमारती भाजी मंडईची रंगरंगोटी या व्यतिरिक्त नव्याने दिसणारा एकही प्रकल्प झाला नाही याची खंतही वाटते. 

महापालिका स्थापन झाली त्यावेळी सांगवी परिसर विकसित झालेला आहे. 1987 नंतर 2019 मध्ये म्हणजे सुमारे तीस वर्षाच्या काळानंतर म्हणजे नानासाहेब शितोळे महापौर झाल्यानंतर ही संधी सांगवीच्या ढोरे यांना मिळालेली आहे. ढोरे यांच्या पदाचा काळ विकासगंगा असावा, अशी आमची अपेक्षा आयुक्त म्हणून तुम्ही तरी पूर्ण करा व त्यांच्याकडूनही करून घ्या. ढोरे यांची मुदत संपण्याअगोदर सांगवीकरांना प्रत्यक्ष नाही तर किमान काही धोरणात्मक निर्णय कागदावर घेऊन हे प्रकल्प राबविणे पुढच्या काळात शक्‍य होऊ शकते. यासाठी सांगवीसाठी सांस्कृतिक भवन, क्रीडांगण, सांगवी-बोपोडी पूल, सांगवी-दापोडी पुलाशेजारील बस थांबा विकसित करणे, सांगवीमध्ये आधुनिक भाजी मंडई विकसित करणे, सांगवी रुग्णालय नव्याने करणे, सांगवी येथील मुळा नदीकडील 18 मीटर रस्ता व इतर रस्त्यांसाठी व कोणत्याही आरक्षणासाठी जागा देणाऱ्या जागा मालकांना नुकसान भरपाई व मोबदला देणे गरजेचे आहे. तसेच काही प्रकल्प जे ढोरे यांनी त्यांच्या 2017 च्या निवडणुक जाहीरनाम्यात नागरिकांना आश्वासने देऊन कबूल केले होते. किमान तितकी आश्वासने तरी काही प्रमाणात महापौरांमार्फत आयुक्तांनी नागरिकांना उपलब्ध करून द्यायला पाहिजेत. 

महापौरांनी धोरणात्मक निर्णय घ्यावा व प्रकल्प सुचवावा आम्ही ते प्रकल्प पूर्ण करून घेऊ असे सांगून आयुक्तांनी महापौरांना शहरात व प्रभागात विकासकामे राबविणे गरजेचे आहे. शहराच्या प्रथम नागरिक असल्याने आयुक्त व प्रशासन यांनी या भागात नवनवीन संकल्पना आणणे गरजेचे आहे. मात्र, प्रशासन त्यांना साथ देत नाही का? असाही प्रश्न आम्हास पडतो. सांगवीच्या शेजारील पिंपळे गुरवमध्ये स्मार्ट सिटीच्या माध्यमातून व इतर कामांसाठी 500 कोटींची कामे चालू आहेत; पण मग सांगवीत मात्र इतके पैसे कुठे खर्च करावे हे नियोजन करण्यास कमी पडले का? 

सांगवीतील एका रस्त्याच्या कामासाठी भक्ती-शक्ती या पवित्र स्मारकाचे किरकोळ पैसे रक्कम वर्ग करावे लागतात हा महापौर पदाचा कमीपणा नाही का ? इतर नगरसेवकच्या प्रभागात ठीक आहे; पण खुद्द महापौरांच्या प्रभागात असे पैसे सर्वसाधारण सभेमध्ये वर्ग करणे व ते सुचविणे ही चूक कोणाची? आणि संत तुकाराम व छत्रपती शिवाजी महाराजांच्या भक्ती-शक्ती स्मारकाचे पैसे सांगवीकर चांगल्या मनाने स्वीकारतील का? याची माहिती आपण महापौरांना देणे आवश्‍यक होते असे मला वाटते. 

ढोरे यांनी तुमच्यावर कोणाच्यातरी सांगण्यावरून भ्रष्टाचाराचे आरोप केले आहेत. तरीही ते मनापासून नसावेत, असे वाटते. त्यामुळे आयुक्त म्हणून तुम्ही महापौरांच्या प्रभागात त्यांनी न सांगता जास्तीत जास्त विकासकामे केली पाहिजेत. आपण आयुक्त म्हणून बदली होऊन जाल. आम्ही मात्र याच शहरात आयुष्य काढणार आहोत व हे शहरातील सर्वोच्च पद वारंवार मिळत नाही. आम्ही जरी सध्या पक्षीय विरोधक असलो तरीही एकाच गावातील आहोत व त्यामुळेच आमच्या गावकऱ्याच्या महापौरपदाच्या कारकिर्दीत चांगले प्रकल्प झाले पाहिजेत, अशी आमची प्रमाणिक भावना, इच्छा व मागणी देखील आहे. 

आपण भोसरी विधानसभा मतदार संघातील भाजपाच्या दोन माजी महापौरांच्या प्रभागात ज्या मोठ्या प्रमाणात विकासकामे केली. त्याप्रमाणे ढोरेंच्या प्रभागात सुद्धा विकास करावा व एक चांगली विकसित ओळख चिंचवड मतदारसंघातल्या सांगवी भागामध्ये व्हावी अशी या निमित्ताने आपणास विनंती करीत आहोत.