esakal | राज्यात परीक्षांचा गोंधळ; राष्ट्रवादी विद्यार्थी कॉंग्रेसने दिले राज्यपालांना पत्र  
sakal

बोलून बातमी शोधा

राज्यात परीक्षांचा गोंधळ; राष्ट्रवादी विद्यार्थी कॉंग्रेसने दिले राज्यपालांना पत्र  

कोरोनाच्या धोक्‍याकडे सपशेल दुर्लक्ष करत राज्यातील विविध विद्यापीठांमध्ये अंतिम वर्षाच्या परीक्षा सुरू आहेत. मात्र, या परीक्षेत प्रचंड प्रमाणात गोंधळ उडाला असून, विद्यार्थ्यांना मानसिक त्रासाला सामोरे जावे लागत आहे.

राज्यात परीक्षांचा गोंधळ; राष्ट्रवादी विद्यार्थी कॉंग्रेसने दिले राज्यपालांना पत्र  

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

पिंपरी : कोरोनाच्या धोक्‍याकडे सपशेल दुर्लक्ष करत राज्यातील विविध विद्यापीठांमध्ये अंतिम वर्षाच्या परीक्षा सुरू आहेत. मात्र, या परीक्षेत प्रचंड प्रमाणात गोंधळ उडाला असून, विद्यार्थ्यांना मानसिक त्रासाला सामोरे जावे लागत आहे. या विद्यापीठानुसार परीक्षा पद्धतीतील त्रुटी व विद्यार्थ्यांच्या अडचणी राष्ट्रवादी विद्यार्थी कॉंग्रेस महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष सुनील गव्हाणे यांनी राज्यपालांकडे पत्राद्वारे मांडल्या आहेत. अन्यथा राज्यभर तसेच राजभवनासमोर धरणे आंदोलन करण्याचा इशारा त्यांनी दिला आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 

पिंपरी-चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

नियोजनशुन्यता, मॉक टेस्टचा अभाव, कुशल मनुष्यबळाचा अभाव, अपात्रताधारक सर्व्हिस प्रोव्हायडर, हेल्पलाइन केंद्राची अकार्यक्षमता व प्रशासकीय दिरंगाई, एमसीक्‍यू प्रश्‍नपेढी (QYUESTIONBANK) न पुरवणे यामुळे विद्यार्थी त्रस्त आहेत. डिव्हाईस कनेक्‍टिव्हीटीचा अभाव आहे. ऑनलाइन पेपरचे लॉगइन होत नाही, लॉगइन झाले की पेपर येत नाही आणि पेपर आलाच, तर तो सबमिट होत नाही, असे एक ना अनेक समस्यांना विद्यार्थ्यांना सामोरे जावे लागत आहे. अनेक विद्यापीठात एकाच दिवशी एकाच वेळी अनेक शाखांचे पेपर घेतले जात असल्याने ऑनलाइन यंत्रणेवरचा ताण येऊन यंत्रणा निकामी ठरत आहे. विद्यार्थ्यांचे हेल्पलाइन नंबरवर आलेले फोनसुद्धा उचलले जात नसल्याचे पुढे येत आहे. एकाच दिवशी एकाच वेळी सर्व शाखांचे पेपर न घेता शाखानिहाय वेगवेगळ्या परीक्षा व्हायला हव्या होत्या. बहुतेक विद्यापीठात अपात्रताधारक सर्व्हिस प्रोवाईडरने मोठी अडचण निर्माण झाली आहे. 

विविध विद्यापीठातील या आहेत समस्या 

  • पुण्यश्‍लोक अहिल्यादेवी होळकर विद्यापीठ, सोलापूर 

विद्यापीठाने परीक्षेसाठी दिलेली लिंक ओपन होण्यासाठी वेळ लागत आहे. प्रश्‍नपत्रिकेत अर्धेच प्रश्‍न दिसत होते, तर अर्ध्या प्रश्‍नांचे फक्त पर्याय दिसत होते. काही विद्यार्थ्यांची प्रश्‍नपत्रिका ऑटोमॅटिक सबमीट होत होती. विद्यापीठाने हेल्पलाइन म्हणून दिलेल्या क्रमांकावर एकदा ही फोन घेण्यात आला नाही. 

  • संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ 

सलग दुसऱ्यांदा अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांच्या परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या. विद्यापीठ प्रशासनाकडून वारंवार परीक्षा प्रक्रिया निर्णयाच्या बाबतीत गोंधळ दिसून येतो. दीड लाख विद्यार्थ्यांच्या परीक्षांसाठी फक्त-हेल्पलाइन क्रमांक देण्यात आले. 

  • सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ 

विद्यार्थ्यांना प्रश्‍न न दिसणे, साइटवर फक्त एमसीक्‍यूचे ऑप्शन येत होते. वेळोवेळी विद्यापीठाची साइट क्रॅश होते. वेबसाईटमध्ये अडचणीमुळे परीक्षा वेळेवर सुरू होत नाही. विद्यार्थ्यांना कित्येक तासन्‌तास ताटकळत राहावे लागते. परीक्षार्थी विद्यार्थ्यांची संख्या जास्त असल्यामुळे विद्यापीठाची हेल्पलाइन सतत व्यस्त लागत आहे. 

  • कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ 

लॉगइन करताना तांत्रिक अडचणी येत आहे. विद्यापीठाने दिलेल्या हेल्पलाइन नंबरद्वारे कुठल्याही प्रकारची मदत विद्यार्थ्यांना होत नाही. परीक्षेच्यावेळेवर पेपर ओपन न होता दोन-चार तासांनी पेपर सुरू होत आहे. एमबीए शाखेच्या विद्यार्थ्यांचे सबजेक्‍ट क्रमांक 401चा पेपर होता लॉगइन केल्यावर सबजेक्‍ट क्रमांक 201चा पेपरसमोर स्क्रीनवर आला. यातच काही विद्यार्थ्यांचा परीक्षेची वेळ निघून गेली आणि लॉगइन झाले नाही. 

  • राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विद्यापीठ, नागपूर 

पेपर पीडीएफ पाठविताना वेळेचे योग्य नियोजन नसून वेळापत्रकामध्ये नमूद केलेल्या वेळेत पेपर येत नसून उशिरा येत आहे. पेपर सबमिट करताना वेळेत सबमिट होत नाही. यासंदर्भात तक्रार निवारण करता संपर्क साधला असता उडवाउडवीची उत्तरे व अरेरावीची भाषा वापरली जाते.