esakal | शटर ‘डाउन’; पण दुकान ‘ओपन’

बोलून बातमी शोधा

Pimpri Camp
शटर ‘डाउन’; पण दुकान ‘ओपन’
sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

पिंपरी - ‘भय्या क्या चाहिए! शर्ट, पॅंट, ड्रेस मटेरिअल...और कुछ...अंदर दुकान चालू हैं।’ ही वाक्ये आहेत पिंपरी कॅम्प मुख्य बाजारपेठेत ऐकू येणारी. येथील दुकानांचे शटर खाली असते. सारे काही सामसुम. नियमांची कडक अंमलबजावणी. पण, प्रत्येक दुकानाबाहेर किमान एक तरुण उभा असतो. येणाऱ्या-जाणाऱ्या हळूच म्हणतो, ‘भय्या क्या चाहिए’ कारण, त्या दुकानांचे फक्त शटर खाली असते. त्याला कुलूप लावलेले नसते. ग्राहकाचा होकार दिसताच हळूच शटर वर केले जाते. ग्राहक आत गेला की शटर पुन्हा खाली. दुसऱ्या ग्राहकाच्या शोधात तो तरुण.

पिंपरी कॅम्‍प ही शहरातील सर्वांत मोठी घाऊक व किरकोळ बाजारपेठ आहे. किराणा मालापासून दागिने, कपडे, खेळणी, गृहोपयोगी वस्तू येथे मिळतात. जवळच भाजीपाला मार्केटही आहे. त्यामुळे शहरातील छोट्या दुकानदारांसह महिन्याचा किराणा भरणारे नागरिक कॅम्पातच खरेदीसाठी येतात. शिवाय परिसरातील चऱ्होली, डुडुळगाव, मोशी, चिखली, रावेत, किवळे, मामुर्डी, वाकड परिसरातील शेतकरी सकाळीच भाजीपाला घेऊनही येथे येतात. फूलबाजारही येथेच आहे. त्यामुळे वर्दळ असते. सध्या कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर प्रशासनाने केवळ अत्यावश्‍यक सेवेतील किराणा, भाजीपाला अशा दुकानांना सकाळी आठ ते अकरा या वेळेत दुकाने उघडे ठेवण्याची परवानगी दिली आहे. नेमका, याच वेळेचा फायदा घेऊन कॅम्पातील काही दुकानदार व्यवहार करीत आहेत. त्यासाठी दुकानाचे शटर खाली घेतलेले असते. मात्र, त्याला कुलूप लावलेले नसते. दुकानाबाहेर तरुण उभे असतात. रस्त्याने जाणाऱ्याला ते हळूच विचारतात, ‘क्या चाहिए...’ होकार मिळाल्यास त्यांचा उद्देश साध्य होतो. हा प्रकार फक्त सकाळी आठ ते अकरा या वेळेतच चालतो.