पिंपरी-चिंचवडच्या महापौरांसाठी आता आलिशान कार

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 4 February 2021

  • महापौरांचे वाहन जुने झाल्याने नवीन आलिशान कार घेण्यास स्थायी समिती सभेने मंजुरी दिली.

पिंपरी-चिंचवड : महापौरांचे वाहन जुने झाल्याने नवीन आलिशान कार घेण्यास स्थायी समिती सभेने मंजुरी दिली. ही मोटार टोयाटो किर्लोस्कर मोटार कंपनीकडून थेट पद्धतीने करारनामा न करता खरेदी केली जाणार आहे. यासाठी वीस लाख रुपये खर्च येणार असून, वाहनास जादा सुविधा कंपनीच्या अधिकृत विक्रेत्याकडून बसविण्यात येणार आहेत. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

शहराचे प्रथम नागरिक म्हणून महापौरांकडे पाहिले जाते. महानगरासाठी ते सन्मानाचे पद आहे. पूर्वी महापौरांच्या मोटारीवर लाल दिवा असायचा. त्यामुळे एक रुबाब असायचा. आता लाल दिवा गेलेला असला तरी, महापौर पदाला महत्त्व कायम आहे. त्यामुळे आलिशान मोटार, प्रशस्त कार्यालय, स्वतंत्र कर्मचारी दिमतीला असतात. विविध भूमिपूजने, उद्‌घाटने, सभा, समारंभ यासाठी महापौरांना निमंत्रणे असतात. नागरिकांमध्ये एक आदर असतो. मात्र, महापौरांसाठी असलेले सध्याचे वाहन जुने झाल्याने नवीन वाहन घेण्यात येणार आहे. त्यासाठीच्या खर्चास मंजुरी देण्यात आली आहे. 

नगरसेवक जाणार कश्‍मीरला 

महापालिकेच्या 'क' क्षेत्रीय कार्यालयांतर्गत येणारे सर्व नगरसेवक व चार अधिकारी-कर्मचारी स्वच्छ भारत अभियानांतर्गत मार्च महिन्यात जम्मू व कश्‍मीरच्या अभ्यास दौऱ्यावर जाणार आहेत. यामध्ये शहर स्वच्छता, कचरा विल्हेवाट, शाळांमधील स्वच्छता प्रकल्प, पर्यटन स्थळांवरील स्वच्छतेचे नियोजन आदी बाबींचा अभ्यास केला जाणार आहे. त्यासाठी येणाऱ्या प्रत्यक्ष खर्चास स्थायी समिती सभेने मंजुरी दिली आहे. 'क' क्षेत्रीय कार्यालय कक्षेत चार प्रभाग येतात. यात प्रभाग दोन चिखली-जाधववाडी-कुदळवाडी, प्रभाग सहा भोसरी-धावडेवस्ती, प्रभाग आठ इंद्रायणीनगर-लांडेवाडी, प्रभाग नऊ कामगारनगर-नेहरूनगर-उद्यमनगर-मासुळकर कॉलनी यांचा समावेश होतो.

- पिंपरी-चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

या भागाचे नेतृत्व नगरसेविका अश्‍विनी जाधव, सारिका सस्ते, यशोदा बोईनवाड, सारिका लांडगे, सीमा सावळे, गीता मंचरकर, डॉ. वैशाली घोडेकर, नम्रता लोंढे, नगरसेवक राहुल जाधव, वसंत बोराटे, रवी लांडगे, राजेंद्र लांडगे, विलास मडिगेरी, विक्रांत लांडे, राहुल भोसले, समीर मासुळकर करीत आहेत. तसेच, तीन स्वीकृत सदस्य आहेत. म्हणजेच 19 लोकप्रतिनिधी व चार अधिकारी, कर्मचारी असे 23 जण दौऱ्यावर जाणार आहेत. मात्र, यात प्रत्यक्षात किती सहभागी होतात, हे मार्चमध्येच कळणार आहे. कारण, पाच लोकप्रतिनिधी विरोधीपक्ष राष्ट्रवादी कॉंग्रेसचे आहेत. ते सत्ताधारी भाजपसोबत दौऱ्यावर जातात किंवा नाही, हेही महत्त्वाचे ठरणार आहे. 

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: luxury car for the mayor of pimpri chinchwad