वजनात झोलझाल; भोसरी एमआयडीसीत मारला जातोय काटा

सकाळ वृत्तसेवा
Saturday, 13 February 2021

शहरातील एमआयडीसीचा विस्तार अगदी भोसरीपासून आकुर्डीच्या थरमॅक्‍स चौकापर्यंत आहे. नेहरूनगर, चऱ्होली, मोशी, चिखली, तळवडे, मोरवाडी, ताथवडे, पुनावळे, वाकड आदी भागात भुईकाटे आहेत. कंपनीत माल भरण्यापूर्वी वाहनाचे अशा काट्यांवर केले जाते.

पिंपरी : वेळ सकाळी दहाची...भोसरी एमआयडीसीतील एक वजनकाटा...एक रिकामा ट्रक वजन करण्यासाठी पहिल्यांदाच आला आणि नेहमीपेक्षा वजन कमी भरले...कारणांचा शोध घेतला. तेव्हा लक्षात आले, अन्य काट्यांवर यापूर्वी झोल होत होता. ट्रकमध्ये कधी मोठे दगड ठेवून तर कधी माणसे बसवून रिकाम्या गाडीचे वजन वाढवले जायचे. त्यानंतर दगड काढून किंवा माणसे उतरवून माल भरल्यानंतर पुन्हा वजन केले जायचे. आलेल्या वजनातील फरकाचे पैसे झोल करणाऱ्यांमध्ये वाटून घ्यायचे. हा प्रकार काटा 'लॉक' किंवा 'सेटिंग' करूनही बिनधास्तपणे सुरू आहे. माल विकणाऱ्याच्या हे लक्षात येत नाही, नुकसान मात्र होते. 

 ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

शहरातील एमआयडीसीचा विस्तार अगदी भोसरीपासून आकुर्डीच्या थरमॅक्‍स चौकापर्यंत आहे. नेहरूनगर, चऱ्होली, मोशी, चिखली, तळवडे, मोरवाडी, ताथवडे, पुनावळे, वाकड आदी भागात भुईकाटे आहेत. कंपनीत माल भरण्यापूर्वी वाहनाचे अशा काट्यांवर केले जाते. माल भरल्यानंतर पुन्हा वजन केले जाते. त्यातून रिकाम्या गाडीचे वजन वजा करून निव्वळ मालाचे वजन केले जाते. त्यानुसार माल विकणाऱ्याळा रक्कम दिले जाते. हा माल टनांमध्ये असल्यामुळे त्याचे वजन करण्यासाठी भुईकाट्यांशिवाय पर्याय राहात नाही. त्यामुळेच वजनात झोलझाल केली जाते. यात वाहनचालकासह त्याचे साथीदार सहभागी असतात. कधी कधी संबंधित कंपनीचा सुपरवायझर किंवा माल खरेदीदारही सहभागी असतो. फसवणूक झाल्याचे माल विकणाऱ्याला कळतही नाही. 

अशी होते बनवाबनवी 
उदाहरणार्थ, रिकाम्या वाहनाचे वजन 100 किलो आहे. मात्र, त्यात दोन व्यक्ती बसवून वजन केल्याने 200 किलो भरले. त्यामुळे वाहनाच्या वजनाची पावती 200 किलोची मिळेल. कंपनीत माल भरल्यानंतर वाहनाचे वजन 500 किलो भरेल. मात्र, "त्या' दोन व्यक्ती वाहनात नसतात. मात्र, विक्रेत्याला भरलेल्या गाडीचे वजन 500 किलो वजा रिकाम्या गाडीचे वजन (दोन व्यक्तींसह) 200 किलो बरोबर 300 किलो मालाचे वजन दिसेल. प्रत्यक्षात खरेदीदाराला "त्या' दोन व्यक्तींच्या वजनाइतका म्हणजेच 100 किलो व प्रत्यक्षातील 300 किलो असा 400 किलो माल मिळेल. आता मालाची किंमत 100 रुपये किलो गृहित धरल्यास 400 किलोचे 40 हजार रुपये होतात. मात्र, विकणाऱ्याला 300 किलोचे म्हणजचे तीस हजार रुपयेच मिळतात. म्हणजेच, झोल केलेले 10 हजार रुपये खरेदीदार, वाहनचालक, 'त्या' दोन व्यक्ती किंवा त्यांच्या अन्य साथीदारांना मिळतील. या अन्य साथीदारांमध्ये वजन करणारा, कंपनीचा माणूस किंवा सेटिंग करणारा मध्यस्थ यापैकी कोणाचाही समावेश असू शकतो. 

पिंपरी-चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

जिल्ह्यात 925 भुईकाटे 
पुणे जिल्ह्यात पिंपरी-चिंचवडसह तळेगाव दाभाडे, उर्से, चाकण, मरकळ, रांजणगाव, जेजुरी, बारामती, शिरूर, शिक्रापूर, सासवड, उरळी कांचन, कुरकूंभ, घोटावळे आदी भागात सर्वाधिक कंपन्या आहेत. या सर्व क्षेत्र मिळून 925 भुईकाटे आहेत. त्यांच्या नियमित तपासणीसाठी वैधमापन विभागाने विभागीय कार्यालये आहेत. त्यांच्याकडे तक्रारी आल्यानंतर तपासणी केली जाते. 

अशा असतात तक्रारी 
वजन कमी भरले, वजन वाढवले, काटा लॉक केलाय, काटा सेटिंग केलाय, वजनमापनासाठी जादा रक्कम आकारली जाते, अशा प्रकारच्या तक्रारी वैधमापन विभागाकडे येत असतात. त्यांचे निराकारण विभागीय नियंत्रकांकडून केले जाते. पिंपरी-चिंचवडमधून सध्या 20 तक्रारी आल्या आहेत. त्यांचे निराकरण केले जात आहे, असे वैधमापन विभागाचे सहायक नियंत्रक संदीप कवरे यांनी सांगितले. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: making fault in vehicles weight at bhosari midc