Video : तुम्ही नवीन फर्निचर करण्याच्या तयारीत असाल, तरी ही बातमी वाचा

अवधूत कुलकर्णी 
शुक्रवार, 22 मे 2020

लॉकडाउनमुळे सुतार, मिस्त्री हे त्यांच्या बिहार, उत्तर प्रदेश या राज्यांमध्ये परतले आहेत.

पिंपरी : नवीन फर्निचर करायचा विचार करताय? मग थांबा किमान सहा महिने. कारण लॉकडाउनमुळे सुतार, मिस्त्री हे त्यांच्या बिहार, उत्तर प्रदेश या राज्यांमध्ये परतले आहेत. ते येईपर्यंत तुम्हाला तुमच्या स्वप्नातले फर्निचर सत्यात बघणे शक्‍य होणार नाही. भलेही तुम्ही त्यासाठी कितीही पैसे मोजायला तयार असले तरीही... चार भिंती असल्या की घर होत नाही. त्यासाठी दर्जेदार फर्निचरची जोड असल्यास घराच्या सौंदर्यात भर पडते. त्यासाठी अनेकजण लाखो रुपयेही मोजतात. पण आता त्यांचे स्वप्न लवकर साकार होणे अवघड आहे. प्लायवूड ऍण्ड लॅमिनेट डिलर्स असोसिएशन, पिंपरी-चिंचवडचे उपाध्यक्ष चरणसिंग जमतानी यांनी या व्यवसायाच्या सद्यस्थितीबद्दल माहिती दिली. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

कसा चालतो व्यवसाय 

काहीजण एखाद्या इंटिरिअर डिझाईनरकडून आवडीचे डिझाईन बनवून घेतात. त्यानंतर सुतारकाम करणाऱ्या कारागीराला काम दिले जाते. काही इंटिरिअर डिझाइनर व्यावसायिकांकडे असे संपूर्ण काम करणारे कारागीर असतात, तर काहीजण ग्राहकांना फक्त डिझाईन बनवून देतात. या डिझाईननुसार फर्निचर करण्यात प्लायवूड आणि सन्मायका हे दोन भाग महत्वाचे आहेत. फर्निचरच्या प्रकारानुसार प्लायवूडची निवड केली जाते. त्यानंतर टेम्पोतून हमालांच्या माध्यमातून प्लायवूड घरपोच केले जाते. तेथे सुतार, मिस्त्री फर्निचरला आवश्‍यक तो आकार देतात.

पिंपरी चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

फर्निचर झाल्यावर पॉलिश करणारे कारागीरांना महत्वाची जबाबदारी पार पाडावी लागते. साधारपणे फर्निचरसाठीच्या एकूण किमतीच्या 30 टक्के एवढी रक्कम कारागीर मजुरी म्हणून आकारतात. या सर्व प्रक्रीयेत सुतार, मिस्त्री, हमाल, टेम्पोचालक ही साखळी महत्वाची आहे. मात्र ही साखळीच पूर्णपणे विस्कळीत झाली आहे. सुतार, मिस्त्रि हे बिहारी अथवा उत्तर प्रदेशचे आहेत. ते त्यांच्या गावी गेले आहेत. त्यामुळे लॉकडाउन संपल्यानंतरही ते लगेच परततील याची शाश्‍वती व्यावसायिकांना नाही. 

कामगारांची स्थिती 

प्रत्येक दुकानात सरासरी तीन ते चार कामगार आहेत. त्याचप्रमाणे एका अनुभवी सुताराकडे सहा ते सातजण काम करतात. या व्यतिरिक्त 200 ते 300 हमाल आहेत. 100 ते 150 टेम्पो व्यावसायिक आहेत. 

व्यवसायाचे भवितव्य 

अनेकांचे रोजगार जात आहेत किंवा नोकरीची शाश्‍वती वाटत नाही. व्यवसायही बंद पडले आहेत. त्यामुळे त्यांनी फर्निचर करण्याचा निर्णय पुढे ढकलला आहे. कामगारच नसल्याने ज्यांच्याकडे पैसे आहेत त्यांनाही फर्निचर करुन घेणे शक्‍य होणार नसल्याचे चित्र आहे. तर दुसरीकडे काहींनी कोरोनाच्या भितीमुळे फर्निचर करण्याचा निर्णय पुढे ढकलणे पसंत केले आहे. लॉकडाऊनचे दोन महिने आणि व्यवसाय पूर्वपदावर येण्याकरिता लागणारे सहा महिने अशा आठ महिन्यांचा विचार करता या व्यावसायिकांना किमान 200 कोटी रुपयांचा फटका बसणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा 

दृष्टीक्षेपात प्लायवूड व्यवसाय 

पिंपरी-चिंचवड/पुणे 

- शहरातील एकूण दुकानांची अंदाजे संख्या - 250/1500 

- संघटित व्यावसायिकांची संख्या - 110/1000 

- महिन्याची होणारी आर्थिक उलाढाल - सुमारे 25 कोटी रुपये / 450 कोटी रुपये  

- व्यवसायावर अवलंबून असणाऱ्यांची संख्या - चार ते पाच हजार / 15000 हून अधिक 

प्रत्येक व्यावसायिकाची मासिक आर्थिक उलाढाल सरासरी 10 ते 15 लाख रुपये आहे. त्यामुळे दोन महिन्यातच सुमारे 50 कोटी रुपयांचा आर्थिक फटका बसला आहे. लॉकडाउन संपला तरी सर्व कामगार पुन्हा कामावर येऊन व्यवसायाची स्थिती पूर्ववत येण्यासाठी चार ते सहा महिन्यांचा कालावधी लागू शकतो. 

- कीर्ती पटेल, सचिव - प्लायवूड ऍण्ड लॅमिनेट डिलर्स असोसिएशन, पिंपरी-चिंचवड 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Marathi news about furniture business home at pimpri chinchwad