गुन्हेगारांना एवढी काय त्या 'मेरी आवाज सुनो'ची दहशत; काय आहे हा प्रकार...पाहा

मंगेश पांडे 
रविवार, 24 मे 2020

कितीही सराईत, निर्ढावलेला अथवा भावनाशून्य गुन्हेगार असो, त्याला पोलिस ठाण्यातील 'मेरी आवाज सुनो'चे दर्शन झाले, की भलेभले गुन्हेगार बोलते होतात.

पिंपरी : कितीही सराईत, निर्ढावलेला अथवा भावनाशून्य गुन्हेगार असो, त्याला पोलिस ठाण्यातील 'मेरी आवाज सुनो'चे दर्शन झाले, की भलेभले गुन्हेगार बोलते होतात. मात्र, सध्या कोरोनाच्या संसर्गाच्या भीतीने पोलिस गुन्हेगारांच्या जवळ जाण्यास दचकत असल्याने त्यांना बोलते करणे तर दूरच, अशी परिस्थिती आहे. त्यामुळे एकीकडे 'मेरी आवाज सुनो'च्या माध्यमातून तोंड उघडण्यास भाग पाडणाऱ्या गुन्हेगारांना अच्छे दिन आले असून, दुसरीकडे गुन्हेगारांना घाम फोडणाऱ्या 'मेरी आवाज सुनो'चा आवाजच कोरोनामुळे लुप्त झाल्याचे दिसून येत आहे. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

एखाद्या गुन्ह्यात आरोपीला ताब्यात घेतल्यानंतर तो सहजासहजी गुन्हा कबूल करीत नाही. त्यामुळे न्यायालयात हजर केल्यानंतर न्यायालयाकडून आरोपीला मिळालेल्या कोठडी दरम्यान गुन्ह्याबाबतची माहिती मिळविण्यासाठी आरोपीकडे चौकशी केली जाते. मात्र, अनेकदा आरोपी चुकीची माहिती देऊन दिशाभूल करण्याचा प्रयत्न करतात. अशा आरोपींना जेव्हा पोलिसी खाक्‍या दाखविला जातो तेव्हा ते बोलते होतात. यामध्ये 'मेरी आवाज सुनो' महत्वाची भूमिका बजावितात. भल्याभल्या गुन्हेगारांनी याचा प्रसाद घेतलेला आहे. त्यामुळे गुन्हेगारी क्षेत्रातही 'मेरी आवाज सुनो'चा प्रसाद प्रसिद्ध आहेत. सराईत, निर्ढावलेला अथवा भावनाशून्य गुन्हेगार असला तरी पोलिसी खाक्‍यासमोर तो बोलता होऊन गुन्ह्याची कबुली देतोच. पुरावा नष्ट करून अनेक दिवसांपासून दडपलेले व गुंतागुंतीचे गुन्हे पोलिसांनी उघडकीस आणलेले आहेत. 

पिंपरी चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

मात्र, सध्या कोरोनाने सर्वत्रच अक्षरश: थैमान घातले असून संसर्गाच्या भीतीने माणूस माणसाच्या आसपासही जाण्यास तयार नाही. कोरोनाबाधित व्यक्तीच्या संपर्कात आल्याने कोरोनाचा संसर्ग वाढण्याचे प्रमाण वाढत आहे. यामध्ये पोलिसांनाही मोठ्या प्रमाणात कोरोनाचा संसर्ग झाल्याचे समोर आले आहे. शुक्रवारपर्यंत राज्यात एक हजार 666 पोलिस कोरोनाबाधित झाले आहेत. त्यात 183 अधिकारी व एक हजार 483 कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. त्यातील 473 पोलिस कोरोनामुक्त झाले. तर 16 पोलिसांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. सध्या राज्यात एक हजार 176 पोलिस अधिकारी, कर्मचारी विविध रूग्णालयात उपचार घेत आहेत. पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालयातील देखील सात पोलिसांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा 

कोरोनाच्या धास्तीमुळे पोलिसांनीही खबरदारी घेण्यास सुरूवात केली आहे. एखाद्या गुन्ह्यातील आरोपीला चौकशीसाठी आणले तरी दूर अंतरावरूनच त्याच्याकडे चौकशी केली जात आहे. अथवा स्वत:ची पुरेपूर खबरदारी घेऊन गुन्हेगारांकडून गुन्ह्याची माहिती घेतली जात आहे.

गुन्हेगारांना फुटतो घाम 

एखाद्या संशयिताला पोलिस ठाण्यात आणल्यानंतर तो माहिती देण्यास टाळाटाळ करीत असल्यास 'याला डिबी रूममध्ये घ्या रे' अशी सूचना पोलिस अधिकाऱ्याने त्यांच्या कर्मचाऱ्यांना केली तर तो झटकन माहिती देतो. पोलिस ठाण्यातील डिबी रूम म्हणजेच तपास पथकाची रूम. येथे गुन्हेगारांना पोलिसी खाक्‍या दाखवून बोलत केलं जाते. त्यामुळे डिबी रूमचे नुसते नाव काढले तरी गुन्हेगारांना घाम फुटतो. 

तातडीने घेतली जातेय तक्रार 

तक्रार देण्यासाठी पोलिस ठाण्यात आलेल्या नागरिकांमुळेही अनेक पोलिसांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे. यामुळे पोलिस ठाण्यात येणाऱ्या नागरिकांकडेही बाहेरच चौकशी केली जात आहे. त्यामुळे पोलिस ठाण्यात काही कामानिमित्त जायचे असले तरी तासन्‌तास थांबून ठेवून तक्रारदारालाच आरोपीप्रमाणे वागणूक मिळायची. मात्र, आता कोरोनामुळे परिस्थिती बदलली आहे. तक्रारदाराची तातडीने तक्रार नोंदवून घेत मोकळे केले जात आहे. 

कोरोनाची लागण होण्याचे वाढते प्रमाण 

पोलिसांना कोरोनाची लागण होण्याचे वाढते प्रमाण चिंतेची बाब बनली आहे. त्यामुळे कोरोनापासून बचाव होण्यासाठी पोलिसांना संरक्षण कीटही देण्यात आले आहेत. तसेच बंदोबस्तावर असताना योग्य ती खबरदारी घेत कामकाज करण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत. यासह ठाण्यात येणाऱ्या नागरिकांचे ऐकून घेत तातडीने योग्य ती प्रक्रिया पूर्ण करा, नागरिकांना रेंगाळत ठेवू नका, असे सांगण्यात आले आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news about police and criminal in pimpri chinchwad