भोसरीतील कामगारांचे थकीत वेतन मिळवून देणार : मेधा पाटकर

सकाळ वृत्तसेवा
Saturday, 30 May 2020

मेधा पाटकर यांनी भोसरी परिसराला भेट देऊन कंपन्यातील कामगार, घरेलू कामगार आदींशी चर्चा करून आढावा घेतला.

भोसरी : भोसरी एमआयडीसी कंपन्यातील कामगार व घरेलू महिला कामगारांनाही लॅाकडाउन काळातील थकीत पगार मिळावा, यासाठी राज्याच्या कामगारमंत्र्यांशी भेटून पाठपुरावा करणार असल्याचे आश्वासन नर्मदा बचाव आंदोलनाच्या प्रणेत्या मेधा पाटकर यांनी कामगारांना दिले. त्याचप्रमाणे कामगारांनी पगार घेतल्याशिवाय गावी न जाण्याचे आवाहनही त्यांनी कामगारांना केले. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

शनिवारी (ता. ३०) मेधा पाटकर यांनी भोसरी परिसराला भेट देऊन कंपन्यातील कामगार, घरेलू कामगार आदींशी चर्चा करून आढावा घेतला. या वेळी नागरी हक्क सुरक्षा समितीचे अध्यक्ष मानव कांबळे, कष्टकरी कामगार महासंघाचे अध्यक्ष काशिनाथ नखाते, प्रदीप पवार, गिरीश वाघमारे आदी उपस्थित होते. पाटकर यांनी धावडेवस्तीतील बाबा आनंद मंगल कार्यालय, विशाल भाट यांचे रेशनचे दुकान, बालाजीनगर पॅावर हाऊस, भोसरी एमआयडीसी आदी भागात फिरून कामगारांच्या समस्यांचा आढावा घेतला. 

पिंपरी चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

या वेळी नागरिकांनी 'घर मालक घरभाडे मागत आहेत', 'घरमालकांनी वीजभाडेही वसूल केले आहेत,' 'रेशन कार्ड नसल्याने शिधा मिळत नाहीत', अशा विविध समस्या त्यांच्यासमोर मांडल्या. त्यावर पाटकर म्हणाल्या, "सर्वोच्च न्यायालयाने प्रशासनाला दिलेल्या आदेशानुसार कामगार आणि नागरिाकांना त्यांच्या गावी सुरक्षित पोचवायचे आहे. त्यामुळे कोणत्याही कामगार, नागरिकांनी जीव धोक्यात घालून पायी प्रवास करू नये. शासनाद्वारे नागरिकांना त्यांच्या मूळगावी पाठविण्यासाठी नियोजन करण्यात येत आहे. ही सेवा संपूर्णपणे मोफत आहे. कोणत्याही नागरिकांनी प्रवासासाठी एजंटला पैसे देऊ नये. नागरिकांना काही अडचणी आल्यास स्थानिक कार्यकर्त्यांशी संपर्क साधा."

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा 

दरम्यान, नागरिकांनी कोरोनाला घाबरू नये. त्याला हरविण्यासाठी  शासनाने वेळोवेळी दिलेल्या सूचनांचे पालन करावे, असे पाटकर यांनी सांगितले. लॉकडाउन काळात सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या मार्गदर्शक सूचना व आदेशाची उपस्थितांना माहिती त्यांनी दिली.     


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Medha Patkar meets workers in Bhosari