पिंपरी-चिंचवड शहराच्या दिवसाआड पाणीपुरवठ्यामुळे नागरिक त्रस्त; मंगळवारी होणार निर्णय

सकाळ वृत्तसेवा
Saturday, 19 September 2020

सध्या शहराला पवना धरणातून पाणीपुरवठा केला जात आहे. त्यासाठी धरणातून नदी पात्रात पाणी सोडले जाते. नदीवरील रावेत बंधारा येथून अशुद्ध जल उपसा केला जातो. तेथून वीस पंपाद्वारे पाणी उचलून पाईपद्वारे निगडी प्राधिकरण सेक्टर 23 मधील जलशुद्धीकरण केंद्रात नेले जाते. 

पिंपरी : गेल्या 25 नोव्हेबरपासून पिंपरी चिंचवड शहरात दिवसाआड पाणीपुरवठा सुरू आहे. त्यात दुषित, अपुरा, अनियमित व कमी दाबाने होणाऱ्या पाणीपुरवठ्याची भर पडली आहे. त्यामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. यावर तोडगा काढण्यासाठी मंगळवारी (ता. 22) दुपारी चार वाजता महापालिका स्थायी समिती सभागृहात पाणीपुरवठा विभागाचे अधिकारी व महापालिका पदाधिकाऱ्यांची बैठक आयोजित केली आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप
- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

अपुरा, अनियमित व कमी दाबाने पाणीपुरवठा होत असल्याबाबत शहरातील नागरिकांच्या तक्रारी होत्या.   उंचावरील व शहराच्या शेवटच्या टोकाकडील गावांमधून सर्वाधिक तक्रारी होत्या. विशेषतः बोपखेल, दिघी, च-होली, वडमुखवाडी, चोविसावाडी, डुडुळगाव, तळवडे, जुनी सांगवी, नवी सांगवी, पिंपळे निलख, वाकड, किवळे, मामूर्डी या गावांतील नागरिकांना पाणी प्रश्न तीव्रतेने भेडसावत होता. त्यावर उपाय योजना करण्यासाठी व समन्याय पद्धतीने पाणी वितरण करण्यासाठी दिवसाआड पूर्ण क्षमतेने पाणीपुरवठा करण्याचा निर्णय आयुक्तांनी घेतला होता. त्याची अंमलबजावणी पंचवीस नोव्हेंबर पासून सुरू झाली आहे. तरीही तक्रारी वाढत असल्याने त्या सोडविण्याची मागणी उपमहापौर तुषार हिंगे यांनी महापौर उषा ढोरे यांच्याकडे केली होती. त्यानुसार मंगळवारची बैठक आयोजित केली आहे.

सध्या शहराला पवना धरणातून पाणीपुरवठा केला जात आहे. त्यासाठी धरणातून नदी पात्रात पाणी सोडले जाते. नदीवरील रावेत बंधारा येथून अशुद्ध जल उपसा केला जातो. तेथून वीस पंपाद्वारे पाणी उचलून पाईपद्वारे निगडी प्राधिकरण सेक्टर 23 मधील जलशुद्धीकरण केंद्रात नेले जाते. सध्या महापालिका दररोज 480 दशलक्ष लिटर अशुद्ध जल उपसा करते. दररोज तीस दशलक्ष लिटर पाणी एमआयडीसीकडून विकत घेते. म्हणजेच दररोज 510 दशलक्ष लिटर पाणी शहरासाठी वापरले जाते. मात्र, वाढती लोकसंख्या व पाण्याची वाढती मागणी यामुळे पाणी कमी पडत असल्याचे चित्र आहे.

काय सांगता? पुणे विद्यापीठ चौकात रस्ता ओलांडायला लागतायेत 15-20 मिनिटे!

शहराची पाण्याची वाढती मागणी पूर्ण करण्यासाठी भामा आसखेड व आंद्रा धरणातून 268 दशलक्ष लिटर पाण्याचा कोटा राज्य सरकारकडून काही वर्षांपूर्वीच मंजूर आहे. त्यासाठी तीनशे दशलक्ष लिटर क्षमतेचे जलशुद्धीकरण केंद्र चिखली येथे उभारण्यात येणार आहे. त्यातील शंभर दशलक्ष लिटर क्षमतेचे काम सुरू आहे. मात्र, ते पूर्ण होण्यासाठी आणखी काही महिने वाट पहावी लागणार आहे. शिवाय, निगडी प्राधिकरण सेक्टर 23 मधील जलशुद्धीकरण केंद्राची क्षमताही वाढवावी लागणार आहे, त्या दृष्टीने हालचाली सुरू झाल्या आहेत. तुर्त शहरातील सध्याच्या स्थितीत मार्ग काढावा लागणार आहे. त्यामुळे मंगळवारची बैठक महत्त्वपूर्ण ठरणार आहे.

पुणे : बेवारस मृतांच्या अस्थिंचे 'असे' केले जाते विसर्जन!


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Meeting on water supply of Pimpri-Chinchwad city on Tuesday