माईक तोडले, ग्लास फोडले, कागदपत्रे फाडली; स्थायी समिती सभेत गोंधळ 

MLA Jagtap supporters chaos in the standing committee meeting
MLA Jagtap supporters chaos in the standing committee meeting

पिंपरी : भाजपच्या दोन्ही आमदारांमधील टोकाच्या वादाचे दर्शन बुधवारी स्थायी समिती सभेत झाले. वाकडच्या रस्ते विकासाच्या मुद्दयावरुन चिंचवडचे आमदार लक्ष्मण जगताप यांच्या समर्थक नगरसेवकांनी आयुक्त आणि नगरसचिवांना अरेरावी करत राडा केला. सुरक्षारक्षकांशी खेचाखेची करत माईकची तोडफोड केली.कागदपत्रे भिरकावित काचेचे ग्लास फोडले. यातच सभापतींनी एका सभेचे कामकाज पुर्ण करत तीन सभांचे कामकाज एका आठवड्यापर्यंत पुढे ढकलले. तासभर हा गोंधळ सुरु होता. 

विधानपरिषदेच्या पुणे पदवीधर आणि शिक्षक मतदार संघाच्या निवडणुकीची आचारसंहिता नुकतीच संपुष्टात आली आहे. आचारसंहितेमुळे गेले आठ आठवडे स्थायी समितीचे कामकाज बाधित झाल्यामुळे आजच्या सभेत चार विषयपत्रिकेवरील दोनशेहून अधिक प्रस्ताव निर्णयासाठी प्रतिक्षेत होते. कामकाजाला सुरुवात होताच जगताप समर्थक नगरसेवक शशिकांत कदम यांनी वाकड रस्तेविकासाच्या मुद्दयाला हात घातला. आयुक्तांनी रस्ते विकासाबाबात राज्य सरकारकडे सकारात्मक भूमिका का मांडली? सत्ताधारी भाजपच्या ठरावाला महत्त्व नाही का? आम्ही मुर्ख आहोत काय? याचा खुलासा करावा अशी मागणी कदम यांनी केली. त्यावर पुढील आठवड्यात खुलासा करतो, असे उत्तर आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी दिले. सभापती संतोष लोंढे यांनी त्यास मान्यता दिली. आयुक्त-सभापतींच्या या उत्तरामुळे जगताप समर्थक चिडून उठले. 

शशिकांत कदम, अंबरनाथ कांबळे, संतोष कांबळे, अभिजीत बारणे, झामाबाई बारणे आणि आरती चोंधे या सहा नगरसेवकांनी आक्रमक पवित्रा घेत सभा कामकाज तहकूब करा, आग्रह जोरजोरात केला. तर, शहर विकासाचे असंख्य प्रस्ताव प्रलंबित आहेत, त्याचा निपटारा करु अशी भूमिका सभापती लोंढे यांनी घेतली. त्यातच महेश लांडगे समर्थक सुवर्णा बुर्डे यांनीही सभापतींची बाजू उचलून धरत सभा कामकाज चालू ठेवा. ज्यांना जायचे असेल त्यांनी बाहेर जावे अशी शेरेबाजी केली. त्यामुळे वातावरण अधिकच चिघळले. आम्हाला सभेतून बाहेर काढता का, असा कांगावा करत सहा नगरसेवकांनी आदळआपट सुरु केली. 

पुणे, पिंपरी-चिंचवड बाहेरील प्रवाशांनो इकडे लक्ष द्या, पीएमपीचे 12 मार्ग सुरू होणार

सभापती पक्षाविरोधी भूमिका घेत असून त्यांना राष्ट्रवादी कॉग्रेस, शिवसेना नगरसेवकांची साथ आहे, असा आरोप या नगरसेवकांनी केला. तसेच, आयुक्त - नगरसचिवांना अरेरावी करत त्यांच्यापुढील कागदपत्रे फाडत ती हवेत भिरकावली. अधिकारी-नगरसेवकांसमोरील ध्वनिक्षेपक उपसून काढत त्यांची मोडतोड केली. काचेचे ग्लास जमिनीवर फोडत संताप व्यक्त केला. यावेळी सुरक्षारक्षकांनी प्रतिबंध करण्याचा प्रयत्न केला असता त्यांनाही धक्काबुक्की करण्यात आली. अखेरिस, सभापतींनी सुरक्षारक्षकांना सभागृह सोडण्याचे आदेश दिले. या गदारोळातच सभापतींनी एका सभेचे कामकाज रेटून नेले, तसेच उर्वरित तीन सभा डिसेंबरपर्यंत पुढे ढकलल्या. 

''वाकडच्या रस्ते विकासाच्या मुद्दयावर खुलासा करण्यासाठी आयुक्तांनी एका आठवड्याची मुदत मागितली आहे. पुढील आठवड्यात ते खुलासा करणार आहेत. आयुक्तांचे काम समाधानकारक असून त्यांच्याविषयी कोणतीही तक्रार नाही. स्थायी समितीत भाजप नगरसेवकांनी घातलेल्या राड्याबाबत पक्षश्रेष्ठींकडे तक्रार करण्यात येईल. पक्षपाती कारभाराचे आरोप बिनबुडाचे असून शहर विकासाचे निर्णय घेताना सर्वांना विश्वासात घोऊनच कामकाज करतो आहे.''
- संतोष लोंढे, सभापती, स्थायी समिती 

''वाकडचा रस्तेविकास करा असा आदेश राज्य सरकारने दिल्याने भाजप आमदारसमर्थक नगरसेवकांची अवस्था सांगताही येईना अन्‌ सहनही होईना अशी झाली आहे. भाजपकडून रडीचा डाव खेळला जात असून रस्तेविकासासाठी असलेली आर्थिक तरतूद शून्य करण्याचा कोतेपणा केला जात आहे. मंगळवारी झालेल्या महासभेत तरतूद वर्गीकरणाच्या प्रस्तावाला उपसूचना देताना वाकडच्या रस्तेविकासाची तरतूद शून्य करण्याची खेळी भाजपने खेळली आहे. सत्ताधारी नगरसेवकांनीच गोंधळ घालणे, कांगावा करणे हे उचित नाही.''
- राहुल कलाटे, शिवसेना गटनेता 

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

''भाजप नगरसेवकांनी घातलेला राडा अशोभनीय आहे. आयुक्त - नगरसेवकांचा उद्धार करणे, त्यांच्या अंगावर धाऊन जाणे योग्य नाही. सार्वजनिक मालमत्तेचे नुकासान करणाऱ्या नगरसेवकांचे निलंबन करावे. प्रसंगी फौजदारी गुन्हा दाखल करत त्यांच्याकडून नुकसानभरपाई वसूल करावी. अशोभनीय वर्तन करणाऱ्या नगरसेवकांचे पद रद्द करण्याबाबतचा प्रस्ताव आयुक्तांनी राज्य सरकारला पाठवावा, अशी आमची मागणी आहे'' 
- राजू मिसाळ, विरोधी पक्षनेते, राष्ट्रवादी कॉंग्रेस

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com