esakal | पिंपरी-चिंचवड : नवीन रुग्ण रोखण्याकडे अधिक लक्ष - महेश झगडे

बोलून बातमी शोधा

Mahesh Jhagade
पिंपरी-चिंचवड : नवीन रुग्ण रोखण्याकडे अधिक लक्ष - महेश झगडे
sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

पिंपरी - ‘कोरोनाचा मुकाबला करताना नवीन रुग्ण रोखण्याकडे, त्यांच्यात वाढ होणार नाही, यावर लक्ष देणे फार गरजेचे आहे. यासाठी प्रशासनाने सामाजिक संस्थांची मदत घ्यावी,’ असे मत निवृत्त सनदी अधिकारी महेश झगडे यांनी व्यक्त केले.

पिंपरी-चिंचवड सिटिझन फोरम, उन्मुक्त युवा संगठन, पिंपरी-चिंचवड हाउसिंग सोसायटी फेडरेशन, रोटरी क्लब ऑफ वाल्हेकरवाडी, थेरगाव सोशल फाउंडेशन, आरोग्य मित्र, कै. तुकाराम तनपुरे फाउंडेशन, दीपक फाउंडेशन या संस्थांच्या माध्यमातून झगडे यांचा नागरिकांशी ऑनलाइन संवाद आयोजित केला होता. त्यात ते बोलत होते.

पुणे, पिंपरी-चिंचवडमध्ये स्वाइन फ्ल्यूची साथ असताना झगडे हे पुणे महापालिकेचे आयुक्त होते. त्या अनुभवाबाबत ते म्हणाले, ‘आपत्तीच्या वेळी ९०-९५ टक्के काम प्रशासनाचे असते आणि उर्वरित काम जनतेचे असते. कुठल्याही साथीच्या आजारात डॉक्टरांची भूमिका निर्णायक असते. त्यांना योग्य ते मार्गदर्शन तज्ज्ञांकडून मिळणे महत्त्वाचे आहे. नवीन रुग्ण तयार न होण्यासाठी सामाजिक संस्थांनी प्रशासनासोबत काम करायला हवे. मायक्रो लेव्हलवर काम करण्यासाठी प्रशासनावर दबाव आणणेही गरजेचे आहे. रुग्ण संख्या कमी होण्यावरही भर द्यावा.’ प्रशासनाचा जागतिक अभ्यास कुठेतरी कमी पडला आहे. लॉकडाउन लावणे हे प्रशासकीय अपयश आहे. प्रशासनाने ९० टक्के काम नवीन रुग्ण तयार होणार नाहीत यासाठी करावे. प्रत्येक गोष्टीचे वॉर्डनुसार नियोजन करून जबाबदाऱ्यांचे वाटप करावे. नागरिकांशी दैनंदिन संवाद करावा. राजकीय पक्षांनीही यात सहभागी व्हायला हवे. सरकारने सामाजिक संस्थांचे सहकार्य घ्यावे. बुथनिहाय लसीकरण करण्यावर भर द्यायला हवा, असेही झगडे यांनी सांगितले.