विद्यार्थ्यांशिवाय शाळा; विद्यार्थी चार फेब्रुवारीपासून

सकाळ वृत्तसेवा
Wednesday, 27 January 2021

महापालिका क्षेत्रातील सर्व शाळेतील नववी व दहावीचे वर्ग आणि कनिष्ठ महाविद्यालये अर्थात अकरावी व बारावीचे वर्ग गेल्या महिन्यापासून सुरू झाले आहेत. आता पाचवी ते आठवीपर्यंतचे वर्ग सुरू होणार आहेत.

पिंपरी - महापालिकेसह शहरातील पाचवी ते आठवीपर्यंतच्या शाळा आजपासून (ता. २७) सुरू होणार आहेत. मात्र, वर्गांची साफसफाई, निर्जंतुकीकरण व शिक्षकांची कोरोना तपासणी यामुळे प्रत्यक्ष शिकवायला चार फेब्रुवारीपासून सुरुवात केली जाणार आहे. त्यामुळे चार फेब्रुवारीपासून विद्यार्थी शाळेत येऊ शकणार आहेत. मात्र, त्यासाठी पालकांचे संमतिपत्र आवश्‍यक आहे. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

महापालिका क्षेत्रातील सर्व शाळेतील नववी व दहावीचे वर्ग आणि कनिष्ठ महाविद्यालये अर्थात अकरावी व बारावीचे वर्ग गेल्या महिन्यापासून सुरू झाले आहेत. आता पाचवी ते आठवीपर्यंतचे वर्ग सुरू होणार आहेत. त्याबाबतचा आदेश महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी सोमवारी (ता. २५) सायंकाळी काढला. त्यानुसार महापालिका क्षेत्रातील सर्व प्रकारच्या शाळांमधील पाचवी ते आठवीपर्यंतचे वर्ग शालेय शिक्षण व क्रीडा विभागाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार सुरू करण्यास परवानगी दिली आहे. मात्र, मुख्याध्यापक, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी बुधवारपासूनच शाळेत उपस्थित राहायचे आहे, असे महापौर उषा ढोरे यांनी सांगितले. बुधवार (ता. २७) ते गुरुवार (ता. ४) या कालावधीत शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची अँटिजेन टेस्ट, आरटीपीसीआर टेस्ट केली जाणार आहे. तसेच, या काळात त्यांनी शाळेत उपस्थित राहून वर्गनिहाय वेळापत्रक तयार करायचे आहे. शाळा, वर्गखोल्या, परिसर, पाण्याच्या टाक्‍या, स्वच्छतागृहे यांच्या साफसफाईकडे लक्ष द्यायचे आहे, असे सत्तारूढ पक्षनेते नामदेव ढाके यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.

पुण्यातील इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा

शाळा व्यवस्थापनासाठी सूचना

  • वाहतूक सुविधांचे निर्जंतुकीकरण व्यवस्था व नियमितपणाबाबत पडताळणी करावी
  • शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची कोरोना चाचणी बंधनकारक असून, प्रमाणपत्र वैद्यकीय विभागाला द्यावेत
  • वर्गात व स्टाफरूममधील बैठक व्यवस्थेत सोशल डिस्टन्सिंग पाळावे. एका बाकावर एक विद्यार्थी असावा
  • मास्क, सोशल डिस्टन्सिंग पालनाबाबत सूचना लावावी, सहा फूट अंतरावरील जागा चिन्हांकित कराव्या
  • विद्यार्थ्यांच्या पालकांचे संमतिपत्र घेऊन प्रशासन विभागाकडे जमा करावेत
  • वाहक वाहनांचे दिवसातून दोन वेळा निर्जंतुकीकरण झाल्याची खात्री पर्यवेक्षकांनी करावी
  • बंद खोलीत वर्ग भरवू नयेत, दारे-खिडक्‍या उघड्या ठेवाव्यात
  • विद्यार्थ्यांच्या निरामय आरोग्यासाठी शाळेचा परिसर रोज स्वच्छ करावा, स्वच्छतागृहांचे निर्जंतुकीकरण करावे

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Municipal Corporation Schools start from today pimpri-chinchwad