पंतप्रधान आवास योजनेला नागरिकांकडून प्राधान्य; 3664 घरांसाठी तब्बल 49 हजार 163 अर्ज

Municipal Corporation is implementing a project of 3664 houses at charholi borhadewadi and ravet under the Prime Ministers Housing Scheme
Municipal Corporation is implementing a project of 3664 houses at charholi borhadewadi and ravet under the Prime Ministers Housing Scheme
Updated on

पिंपरी : पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत चऱ्होली, बोऱ्हाडेवाडी व रावेत येथे महापालिका तीन हजार 664 घरांचा प्रकल्प राबवित आहे. यासाठी 49 हजार 163 नागरिकांनी अर्ज दाखल केले आहेत. म्हणजेच एका सदनिकेसाठी सरासरी 14 जणांनी अर्ज दाखल केले आहेत.
 
केंद्र सरकारने 2022 पर्यंत 'सर्वांसाठी घर' अशी घोषणा 2014 मध्ये जाहीर केली. त्यानुसार पंतप्रधान आवास योजना जाहीर केली. त्याअंतर्गत शहरातील आर्थिक दुर्बल घटकांतील कुटुंबांना हक्काचे घर मिळावे, यासाठी गृहप्रकल्प योजना आखली. त्याअंतर्गत चऱ्होलीतील पठारे वस्ती, मोशीतील बोऱ्हाडेवाडी आणि रावेतमध्ये प्रकल्पाची उभारणी सुरू केली. प्रकल्पांचे काम अंतिम टप्प्यात असून ड्रॉ पद्धतीने सदनिका वितरीत केल्या जाणार आहेत. त्यासाठी अर्ज करण्याचे आवाहन नागरिकांना केले होते. अर्जासोबत पाच हजार रुपये किंमतीचा डिमांड ड्राफ्ट जोडायचा होता. 

सदनिकेच्या मूळ किंमतीमध्ये पाच हजार रुपयांचा समावेश केला जाणार आहे. आजपर्यंत 49 हजार 163 नागरिकांनी अर्ज केले आहेत. त्यातील केवळ तीन हजार 664 नागरिकांनाच सदनिका मिळणार आहेत. म्हणजेच 45 हजार 499 नागरिकांच्या आशेवर पाणी फिरणार आहे. त्यांचे प्रत्येकी पाच हजार रुपयांप्रमाणे तब्बल 22 कोटी 74 लाख 95 हजार रुपये काही दिवसांसाठी महापालिकेकडे अडकून पडणार आहेत. ड्रॉमध्ये सदनिका न मिळाल्यास पाच हजार रुपये अर्जदारांना परत मिळणार आहेत. 

पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत राज्य व केंद्र सरकारकडून लाभार्थींना अडीच लाख रुपयांचे अनुदान मिळणार आहे. तीन लाख रुपये वार्षिक उत्पन्न असलेल्यांना अर्ज करता येणार आहे. चऱ्होलीतील प्रकल्पाच्या पार्किंगचे स्लॅब टाकण्याचे काम सुरू आहे. बोऱ्हाडेवाडीतील दोन इमारतींचे आरसीसी झालेले आहे. रावेत येथील इमारतींचेही काम सुरू झालेले आहे. 

असे आहे नियोजन 

चऱ्होली : एक हजार 442 सदनिका. एका सदनिकेची किंमत नऊ लाख 19 हजार रुपये. अडीच लाख रुपये अनुदानामुळे सदनिकेची किंमत केवळ सहा लाख 69 हजार रुपये
बोऱ्हाडेवाडी : एक हजार 288 सदनिका. किंमत आठ लाख 71 हजार आहे. अनुदान वजा जाता एक सदनिका केवळ सहा लाख 21 हजार रुपयांत मिळणार 
रावेत : या प्रकल्पात 934 सदनिका. एका सदनिकेची किंमत नऊ लाख 45 हजार रुपये. अनुदानामुळे केवळ सहा लाख 95 हजार रुपयांत सदनिका मिळणार 

लाभार्थी म्हणतात... 

पंतप्रधान आवास योजनेसाठी अर्ज केलेला आहे. त्यासोबत पाच हजार रुपयांचा डीडी जोडलेला आहे. बोऱ्हाडेवाडी प्रकल्प शहराच्या मध्यवर्ती व नाशिक महामार्गालगत असल्याने त्याला प्राधान्य दिले आहे. येथून कामाचे ठिकाणही जवळ आहे, असे एमआयडीसीत कामाला असलेले काळेवाडीतील ईश्‍वर सुरवसे यांनी सांगितले. 

संपादन - सुस्मिता वडतिले 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com