पिंपरी-चिंचवड : महापालिका विषय समित्यांच्या अध्यक्षपदासाठी रस्सीखेच!

टीम ई-सकाळ
Saturday, 17 October 2020

महापालिका विषय समित्यांमध्ये विधी, शहर सुधारणा, महिला व बालकल्याण, कला-क्रीडा व सांस्कृतिक आणि शिक्षण या समित्यांचा समावेश आहे. प्रत्येक समितीवर नऊ नगरसेवकांची वर्णी लागली आहे.

पिंपरी : पिंपरी-चिंचवड महापालिकेतील विषय समित्यांच्या नवीन पदाधिकाऱ्यांची निवड मंगळवारच्या (ता. 6) सर्वसाधारण सभेत करण्यात आली. आता विषय समित्यांच्या अध्यक्षपदासाठी रस्सीखेच सुरू झाली आहे. शुक्रवारी (ता. 23) सकाळी अकरा वाजता निवडणूक होणार आहे. त्यासाठी सोमवारी (ता. 19) दुपारी तीन ते पाच या वेळेत अर्ज दाखल करण्याची वेळ आहे.

विषय समित्यांचे अध्यक्ष निवडणुकीसाठी पीठासन अधिकारी म्हणून विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी महिला व बालकल्याण आयुक्त डॉ. ऋषिकेश यशोद यांची निवड केली आहे. अध्यक्षपदासाठीचे अर्ज महापालिका नगरसचिव कार्यालयात दाखल करायचे आहेत. महापालिका विषय समित्यांमध्ये विधी, शहर सुधारणा, महिला व बालकल्याण, कला-क्रीडा व सांस्कृतिक आणि शिक्षण या समित्यांचा समावेश आहे. प्रत्येक समितीवर नऊ नगरसेवकांची वर्णी लागली आहे. त्यात संख्या बळानुसार प्रत्येक समितीवर भाजपचे पाच, राष्ट्रवादी काँग्रेसचे तीन आणि शिवसेनेचा एक सदस्य आहे. राष्ट्रवादी व शिवसेना एकत्र आले तरी त्यांची संख्या प्रत्येक समितीत चारच होते. त्यामुळे भाजपचाच अध्यक्ष होणार हे निश्चित आहे. मात्र, पक्षश्रेष्ठी किंवा शहराचे भाजप कारभारी कोणाला संधी देतात हे सोमवारीच स्पष्ट होणार आहे. 

कोणाला मिळू शकते संधी?
सर्व समित्यांमध्ये सत्ताधारी भाजपचे संख्याबळ असल्याने त्यांचाच अध्यक्ष होणार हे स्पष्ट आहे. विषय समित्यांमधील भाजप सदस्य पुढीलप्रमाणे आहेत. त्यांच्यापैकी एकाला अध्यक्षपद मिळेल. यात विधी समितीच्या स्वीनल म्हेत्रे, वसंत बोराटे, संगीता भोंडवे, सुजाता पालांडे, सीमा चौघुले. महिला व बालकल्याण समितीच्या योगिता नागरगोजे,  सविता खुळे, चंदा लोखंडे, माधवी राजापुरे, निर्मला गायकवाड. शहर सुधारणा समितीच्या साधना मळेकर, सोनाली गव्हाणे, अनुराधा गोफणे, सुनिता तापकीर, शारदा सोनवणे. कला-क्रिडा-सांस्कृतिक समितीच्या अश्विनी जाधव, केशव गोडवे, उत्तम केंदळे, शैलेश मोरे, बाळासाहेब ओव्हाळ. शिक्षण समितीच्या सारिका सस्ते, प्रियंका बारसे, मनिषा पवार, माया बारणे, तुषार कामठे यांचा समावेश आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: municipal corporation special committee selection