Video : ...त्याने मानेवरच गोंदलाय 'मृत्यू'; काय आहे प्रकार, वाचा सविस्तर

pic.jpg
pic.jpg

पिंपरी : मानेवरच 'मृत्यू' असे गोंदून घेतले आहे, त्याला कसली आलीय मरणाची भीती? कोरोनाने मृत्यू झालेल्यांचे देह तो उचलतो. रुग्णालयातून ते थेट स्मशानभूमीपर्यंत पोचविण्याचे कामदेखील तोच करतो. अंत्यसंस्कारही तोच करतो. हा आहे शवविच्छेदन विभागातील कर्मचारी नागेश वाघमारे. महामारीमुळे रक्ताची नाती दुरावली तरी या कोरोनायोद्‌ध्याने दीड महिन्यात दहा मृतदेहांवर अंत्यसंस्कार करून माणुसकीचे दर्शन घडविले आहे.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयात गेल्या 28 वर्षांपासून शवविच्छेदन विभागात "चिरफाड कर्मचारी' या पदावर वाघमारे काम करतात. आजवर त्यांनी सुमारे 10 ते 12 हजार शवविच्छेदन केले आहेत. पण आयुष्यात पहिल्यांदाच रक्ताची नाती कशी दुरावली, या मृतदेहांजवळ जायलाही लोक घाबरतात, आक्रोश करायलादेखील कोणी येत नसल्याचे वाघमारे यांचा हृदयद्रावक अनुभव आहे. सद्यःस्थितीत 99 टक्के नातेवाईक मृतदेहाजवळ नसतात. स्मशानभूमीत आपली म्हणवणारी माणसे दूर थांबतात. अशा परिस्थितीत मृतदेहांवर अंत्यविधी करायला कोणीच धजावत नसल्याने वाघमारे हे मात्र, प्रामाणिकपणे करत आहेत.

रुग्णालयातून एखाद्या कोरोनाबाधिताचा मृत्यू झाल्याचा फोन आल्यावर त्या शवासोबतच पाच किलोमीटरचा प्रवास करत, तो मृतदेह शववाहिकेतून खाली उतरवण्यापासून ते विद्युत दाहिनीपर्यंत पोचविण्याचे काम ते करत आहेत. अनेक वेळा शव खूप जड असते. पण अशावेळी दूरवर थांबलेले नातेवाईक मदतीला येत नाहीत. याउलट "आम्ही पैसे देतो, तुम्हीच करा' असे ते उत्तर देतात. मुळातच शवविच्छेदन विभागात तीनच कर्मचारी आहेत. एक विभागात थांबल्यावर अशा वेळी दोन कर्मचाऱ्यांच्या खाद्यांवरच ही जबाबदारी येऊन पडते.

पाच वर्षांपूर्वी नागेश यांनी मानेवरच ठसठशीत "मृत्यू' असे गोंदवून घेतले. आठ तास शवागृहात मृतदेह पाहण्यापलीकडे पर्यायच नाही. "भय इथले संपत नाही,' असे म्हणण्यापेक्षा "मृत्यू' हे अंतिम सत्य स्वीकारावे, त्यामुळे मृत्यूची भीती वाटत नसल्याचे त्यांनी सांगितले.

घरच्यांपासून लपूनच
मृतदेहाला हात लागून कोरोना संसर्गाचा धोका होऊ नये, यासाठी कर्मचारी हातमोजे, पीपीई किट वापरतात. पण प्रत्येक वेळी नवीन किट मिळेलच असे नाही. पण तरीही ते काम करत आहेत. म्हणूनच कोरोनाबाधित मृतदेह उचलण्याचे काम करत असल्याची माहिती घरच्यांपासून लपूनच ठेवली असल्याचे वाघमारे यांनी सांगितले. रुग्णालयात वेगळे कपडे वापरतो आणि घरी जाताना अगदी काळजीपूर्वक स्वच्छ होऊनच परतत असल्याचे ते म्हणाले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com