
नागरवस्ती विकास योजना विभाग नव्हे, आता “समाज विकास विभाग”
पिंपरी : पिंपरी चिंचवड महापालिकेचा “नागरवस्ती विकास योजना विभाग” यापुढे “समाज विकास विभाग” या नावाने संबोधले जाणार आहे , अशी माहिती आयुक्त राजेश पाटील यांनी दिली. आयुक्त पाटील यांनी याबाबत स्वतंत्र आदेश निर्गमित केले आहे. महापालिकेच्या सर्व दप्तरी “नागरवस्ती विकास योजना विभाग” ऐवजी “समाज विकास विभाग” अशी नोंद करावी असे आदेशात नमूद केले आहे. महिला, बालक आणि मागासवर्गीयांसाठी योजना राबविण्याकरिता नागरवस्ती विकास योजना असा स्वतंत्र विभाग तयार करण्यात आला होता. या विभागामार्फत विविध समाज उपयोगी कल्याणकारी योजना राबविल्या जातात.
यामध्ये महिला व बालकल्याण योजने अंतर्गत विद्यार्थ्यांना सायकल घेण्यासाठी अर्थसाहाय्य, महिलांना चारचाकी वाहन प्रशिक्षण, उच्च शिक्षण घेण्यासाठी अर्थसाहाय्य, मुलींना कुंफू कराटे प्रशिक्षण, महिलांसाठी योगासन प्रशिक्षण, जननी शिशू सुरक्षा अंतर्गत मनपाच्या रुग्णालयामध्ये प्रसूती झालेल्या महिलांना मोफत आहार योजना, परदेशातील उच्च , शिक्षण अभ्यासक्रमासाठी निवड झालेल्या युवतींना अर्थसाहाय्य, निर्भया अस्तित्व पुनर्वसन, कोरोना प्रादुर्भावाच्या काळात विधवा झालेल्या महिलांना अर्थसाहाय्य, महिलांसाठी ज्ञान कौशल्य विकास, विधवा महिलांकरिता पुनर्विवाह प्रोत्साहन, महिला बचत गटांना अर्थसाहाय्य, दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती, दिव्यांग व्यक्तींना व्यवसायासाठी अर्थसाहाय्य, मतिमंद व्यक्तींच्या पालकांसाठी अर्थसाहाय्य, वय वर्षे ५० पार केलेल्या तृतीयपंथी व्यक्तीसाठी पेंशन योजना आदी योजना राबविल्या जात आहेत. अर्थातच सर्व समाजाचा सर्वांगीण विकास करण्यासाठी नागरवस्ती विकास योजना विभाग कार्यरत आहे. आता हा विभाग समाज विकास विभाग या नावाने संबोधले जाणार आहे. त्यामुळे या विभागाशी पत्रव्यवहार अथवा तत्सम संपर्क साधताना समाज विकास विभाग असे संबोधन करावे असे, आवाहन प्रशासनाने केले आहे.
Web Title: Nagarvasti Vikas Yojana Department Now Social Development Department Rajesh Patil Pimpri
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..