वाढीव पाणी अद्याप मृगजळच | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Nigdi water purification for water from Pavana dam Andhra Dam water supply pimpri

वाढीव पाणी अद्याप मृगजळच

पिंपरी : पवना धरणातून मिळणाऱ्या पाण्यासाठी निगडी जलशुद्धीकरण केंद्राची शंभर दशलक्ष (एमएलडी) लिटरने क्षमता वाढवणार, आंद्रा धरणातून शंभर दशलक्ष आणि भामा-आसखेड धरणातून १६७ दशलक्ष लिटर पाणी मिळणार, असे ३६७ दशलक्ष लिटर वाढीव पाणी शहराला मिळणार अशा वल्गना प्रशासनासह माजी झालेले सर्वपक्षीय राजकीय पदाधिकारी गेल्या चार-पाच वर्षांपासून करत आहेत. अद्याप मात्र वाढीव पाणी दृष्टिक्षेपात दिसत नसून, आणखी किती दिवस प्रतीक्षा करावी लागणार, या विवंचनेत शहरातील नागरिक आहेत.

शहराला पवना धरणातून पाणीकोटा मंजूर आहे. सद्यःस्थितीत ४८० एमएलडी अशुद्ध जलउपसा पवना नदीवरील रावेत बंधाऱ्यातून केला जात आहे. अधिकचे पाणी विकत घेतले जात आहे. शिवाय, एमआयडीसीकडूनही पाणी विकत घेतले जात आहे. या योजनेसाठी निगडी-प्राधिकरण सेक्टर २३ मध्ये पाचशे एमएलडी क्षमतेचे जलशुद्धीकरण केंद्र उभारले आहे. त्याची क्षमता शंभर एमएलडीने वाढविण्याचे काम दीड वर्षांपासून सुरू आहे. अद्याप पूर्ण झालेले नाही. शिवाय, आंद्रा व भामा-आसखेड धरणातून अनुक्रमे शंभर व १६७ असे २६७ एमएलडी पाणी घेतले जाणार आहे. त्यासाठी चिखली येथे तीनशे एमएलडी क्षमतेचे जलशुद्धीकरण केंद्र उभारणीचे काम दोन वर्षांपासून सुरू आहे. त्यांचे पाणी डिसेंबर २०२१ अखेर मिळेल, एप्रिल २०२१ अखेरपर्यंत नक्की मिळेल, अशी आश्वासनेही दिल्या गेली होती. परंतु, एप्रिल महिना संपला तरी पाणी अद्याप मिळालेले नसल्याने नागरिकांना टॅंकरचा आधार घ्यावा लागत आहे. हे वाढीव पाणी केव्हा मिळणार, या प्रतिक्षेत नागरिक आहेत.

रावेत प्रकल्पाची स्थिती

  • ५०० एमएलडी क्षमतेचे अशुद्ध जलउपसा केंद्र

  • १०० एमएलडी क्षमता वाढविण्यासाठी १७ पंप बदलणे

  • अस्तित्वातील ३० एमएलडी क्षमतेचे पंप ४१ एमएलडी क्षमतेने बदलणे

  • प्रकल्पाची किंमत १२.४४ कोटी

  • आतापर्यंत ९० टक्के साहित्यपुरवठा

  • ४१ एमएलडी क्षमतेचे सात पंप, १६ व्हॉल्व्ह बदलले

  • १६०० केव्ही वीज क्षमतेचे तीन ट्रान्स्फॉर्मर बदलले

निगडी जलशुद्धीकरण प्रकल्प

  • ४२८ एमएलडी क्षमतेचे जलशुद्धीकरण केंद्र

  • केंद्राची क्षमता १०० एमएलडीने वाढविणे

  • न्यू फिल्टर बेड, रीसरक्यूलेशन संप अशी कामे करणे

  • प्रकल्पाची किंमत ३८.२२ कोटी

  • क्लॅरीसेटलरमध्ये ट्रस बसविण्याचे काम सुरू

  • फिल्टर खोदकाम व पीसीसी पूर्ण

  • रिसरक्यूलेशन संप थर्ड लिफ्ट काम पूर्ण

दृष्टिक्षेपात आंद्रा योजना

अशुद्ध जलवाहिनी टाकणे

  • प्रकल्प किंमत ४३.२७ कोटी

  • देहू-निघोजे ते तळवडे चौक लांबी १.८० किलोमीटर, १२५० मिलिमीटर व्यासाची वाहिनी

  • तळवडे चौक ते चिखली लांबी ३.८० किलोमीटर, - १४०० मिलिमीटर व्यासाची वाहिनी

विलंबाची कारणे

  • पाटीलनगर येथे पाण्याच्या बाजूला रस्ता ओलांडणे

  • अशुद्ध जलउपसा केंद्रापर्यंत विद्युत पोल स्थलांतरित करणे

  • जॅकवेल व विद्युत विषयक कामाची मुदत एप्रिल २०२३ पर्यंत

भामा-आसखेड योजना

  • भामा धरण येथे १६७ एमएलडी क्षमतेचे अशुद्ध जलउपसा केंद्र

  • जागा मिळण्यासाठी पाटबंधारे विभागाकडून प्रस्ताव मंजूर

  • जलउपसा केंद्रापासून ८.८ किलोमीटर १७०० मिलिमीटर व्यासाच्या वाहिनीद्वारे जॅकवेलपर्यंत पाणी आणणे

  • जॅकवेलपासून देहूगाव बंधाऱ्यापर्यंत १८.९ किलोमीटर १४०० मिलिमीटर व्यासाच्या वाहिनीद्वारे पाणी आणणे

  • भामा-आसखेड धरणापासून देहू बंधाऱ्यापर्यंत जलवाहिन्या टाकण्याच्या मार्गातील जमीन पाटबंधारे, एमआयडीसी, सार्वजनिक बांधकाम व वन विभागाची असून त्यांची परवानगी मिळवण्यासाठी पाठपुरावा सुरू आहे

चिखली जलशुद्धीकरण प्रकल्प

  • प्रस्तावित ३०० एमएलडीपैकी टप्पा एक अंतर्गत १०० एमएलडी क्षमतेचे काम सुरू

  • स्थापत्य व विद्युतविषयक ८० टक्के कामे झाली आहेत

  • प्रकल्पाचा खर्च बांधकामासाठी ४७ कोटी व देखभाल दुरुस्तीसाठी ३२.५५ कोटी रुपये

आमच्या सोसायटीतील बोअरवेलचे पाणी आटले आहे. एप्रिल महिन्यात आंद्रा धरणातून शंभर एमएलडी पाणी दररोज मिळेल आणि उन्हाळ्यात पाणी टंचाई भासणार नाही, असे प्रशासनाचे म्हणणे होते. त्या घोषणेचे काय झाले? दिवसाआड पाणी देण्याचा प्रयोग अडीच वर्षापासून चालू आहे. हा प्रयोग यशस्वी झाला, असे म्हणून महापालिका स्वत:ची पाठ थोपटून घेत असेल तर ते अयोग्य आहे. उन्हाळ्यामुळे बोअर आटत आहेत. पाण्याची मागणी वाढली आहे. ती महापालिकेकडून पूर्ण होत नसल्याने टँकरवर अवलंबून राहाणे भाग आहे. त्यामुळे आर्थिक गणित व स्वास्थ्यही बिघडत आहे.

- ए. एम. देशमुख, वाकड

आंद्रा व भामा-आसखेड योजनेअंतर्गत चिखली जलशुद्धीकरण प्रकल्प व निगडी जलशुद्धीकरण प्रकल्पाच्या कामांना गती दिली आहे. चिखलीचे काम पूर्ण व्हायला आणखी २०-२५ दिवस लागतील. त्यानंतर शंभर एमएलडी पाणी उपलब्ध होईल. सध्या ५१० एमएलडी पाणी पवनातून उचलून तितकेच पुरवठा करीत आहोत. उन्हाळ्यामुळे बोअर कोरड्या पडल्या व पाण्याचा वापर वाढल्याने सोसायट्यांसमोर अडचणी आहेत. त्या सोडविण्याचे प्रयत्न सुरू आहेत. गेल्या दोन वर्षांत गृहप्रकल्‍पही वाढल्याने पाण्याची मागणीही वाढली आहे. सांडपाण्यावर प्रक्रिया करून एमआयडीसीला द्यायचे आणि त्यांच्याकडून शुद्ध पाणी घ्यायचे नियोजन आहे.

- राजेश पाटील, आयुक्त तथा प्रशासक, महापालिका