मावळातील 'त्या' आंदोलनाला आज ९ वर्षे पूर्ण झाली, मात्र अद्यापही तो प्रश्‍न अनुत्तरितच

भरत काळे
Sunday, 9 August 2020

  • आंदोलनाला नऊ वर्षे पूर्ण
  • सत्तातंरानंतरच्या निर्णयाकडे नागरिकांचे लक्ष 

पवनानगर (ता. मावळ) : पवना बंदिस्त जलवाहिनी विरोधात ९ ऑगस्ट २०११ रोजी आंदोलन झाले होते. त्यावेळी झालेल्या गोळीबारात तीन शेतकरी मृत्युमुखी पडले होते. या आंदोलनाला रविवारी (ता. ९) नऊ वर्षे पूर्ण होत आहे. मात्र, अद्यापही हा प्रश्‍न अनुत्तरितच असून, तालुक्यात सत्तांतर झाल्याने आता तरी जलवाहिनी होणार की नाही, या बाबत सर्वांना उत्सुकता आहे. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 

स्थानिक भूमीपुत्रांना विचारात न घेता पिंपरी-चिंचवड महापालिका हा प्रकल्प राबवित होती. याविरोधात झालेल्या आंदोलनात भाजप, शिवसेना व भारतीय किसान संघ यांच्यासह अनेक संघटना व शेतकरी सहभागी झाले होते. त्याला हिंसक वळण लागले आणि तीन शेतकऱ्यांचा बळी गेला. तसेच, दोनशेपेक्षा जास्त शेतकऱ्यांवर गुन्हे दाखल झाले. या नऊ वर्षांत बरेच पाणी पुलाखालून गेले. मावळ तालुक्यात आधी भाजपची सत्ता होती. तसेच, २०१४ ते २०१९ पर्यंत भाजप-शिवसेनेची सत्ता होती. सत्तेवर येण्याआधी अनेक नेत्यांनी पवना जलवाहिनी हद्दपार करू, असे आश्‍वासन दिले होते. या पाच वर्षांत सत्ताधारी नेत्यांनी व मंत्र्यांनी मावळात जलवाहिनीला विरोध केला, तर पिंपरी-चिचवडमध्ये बंदिस्त जलवाहिनीचे समर्थन केले. त्यामुळे नागरिक सम्रंभात पडले. आता मावळात राष्ट्रवादीचे आमदार सुनील शेळके निवडून आले आहेत. तसेच, राज्यात महाविकास आघाडीचे सरकार आहे. शेळके हे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे कट्टर समर्थक मानले जातात. आतापर्यंत शिवसेना ही भाजपच्या खांद्याला खांदा लावून किसान संघ व आरपीआयच्या मदतीने आंदोलनात सहभागी झाली होती. परंतु, शिवसेना आता महाविकास आघाडीत सहभागी आहे. मात्र, मागील आठवड्यात झालेल्या बैठकित तालुका शिवसेनेने जलवाहिनीला विरोध कामय राहील, असा इशारा दिला होता. त्यामुळे हा प्रकल्प रद्द होणार की मार्गी लागणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. 

पिंपरी-चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

पवना बंदिस्त जलवाहिनीला २०११ पासून विरोध असून, हा प्रकल्प कायमचा रद्द करावा, अशी आमची मागणी आहे. मागील काळात शेतकऱ्यांवरील गुन्हे मागे घेतले आहेत. मात्र, हा लढा प्रकल्प रद्द होईपर्यंत सुरू राहील. 
- बाळा भेगडे, माजी राज्यमंत्री 

प्रकल्प रद्द होईपर्यंत लढा सुरूच राहणार आहे. आंदोलनातील शिवसेना, किसान संघ, आरपीआय व कॉंग्रेस यांना बरोबर घेऊन लढा सुरू ठेवणार आहोत. 
- ज्ञानेश्वर दळवी, अध्यक्ष, जलवाहिनी विरोधी कृती समिती 

शिवसेनाचा विरोध या आधीही होता व पुढेही कायम राहील. पिंपरी-चिंचवडला पाणी देण्यास आमचा विरोध नसून, बंदिस्त वाहिनीतून पाणी देण्यास विरोध आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे जलवाहिनी रद्द करण्याची मागणी केली आहे 
- राजूशेठ खांडभोर, तालुकाप्रमुख शिवसेना 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

श्रद्धांजली सभेचे आयोजन 

यंदा कोरोनामुळे श्रदांजली सभा मोजके नेते व शेतकऱ्यांच्या उपस्थितीत होणार आहे, अशी माहिती पवना बंदिस्त जलवाहिनी विरोधी कृती समितीचे अध्यक्ष ज्ञानेश्वर दळवी यांनी दिली. या सभेसाठी माजी राज्यमंत्री बाळा भेगडे, पुणे जिल्हा भाजपचे अध्यक्ष गणेश भेगडे, भारतीय किसान संघांचे जिल्हाध्यक्ष शंकरराव शेलार, भाजपचे तालुकाध्यक्ष रवींद्र भेगडे, शिवसेनेचे तालुकाप्रमुख राजूशेठ खांडभोर, रिपब्लिकनचे जिल्हाध्यक्ष सूर्यकांत वाघमारे, तालुकाध्यक्ष लक्ष्मण भालेराव यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी व शेतकरी उपस्थित राहणार आहे. 

Edited by Shivnandan Baviskar
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: nine year completed to pavna water pipeline agitation at maval