पिंपरी-चिंचवडसाठी दिलासादायक बातमी; कोरोना रुग्णांची संख्या आली निम्म्यावर

पीतांबर लोहार
Saturday, 3 October 2020

 • खासगी व महापालिका रुग्णालयांतील स्थिती 

पिंपरी : कोरोना संसर्गाचे प्रमाण कमी होत असल्याने खासगी व महापालिकेच्या रुग्णालयांसह जम्बो सेंटरमधील रुग्णसंख्याही निम्म्यावर आली आहे. शहरासाठी ही दिलासादायक बाब असून, कोरोनामुक्तीकडे शहराची वाटचाल सुरू असल्याचे चित्र आहे. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

जुलैच्या पहिल्या आठवड्यापासून शहरातील रुग्णसंख्या वाढायला सुरुवात झाली होती. ऑगस्ट व सप्टेंबरच्या पहिल्या पंधरवड्यापर्यंत रुग्णवाढीचा चढता आलेख होता. त्यामुळे राज्य सरकारच्या मदतीने जिल्हा प्रशासन, पुणे महानगर क्षेत्र विकास प्राधिकरण (पीएमआरडीए) आणि महापालिकेने नेहरूनगर येथील मगर स्टेडिअमवर आठशे बेडचे जम्बो रुग्णालय उभारले. त्याच जोडीला महापालिकेने ऑटो क्‍लस्टर आणि भोसरीतील बालनगरीमध्ये जम्बो कोविड सेंटर उभारले आहे. लक्षणे नसलेल्या रुग्णांसाठी 16 ठिकाणी कोविड केअर सेंटर सुरू केले. 43 खासगी रुग्णालयांतही उपचाराच्या सुविधा आहेत. महापालिका रुग्णालयांबाबत तक्रारी होत असल्याने व मेडिक्‍लेम विमा पॉलिसी असल्याने अनेक रुग्ण खासगी रुग्णालयात दाखल झाले होते. त्यामुळे जवळपास दोन हजार बेड क्षमता असलेली खासगी रुग्णालयेसुद्धा पूर्ण क्षमतेने भरले होते. "बेड शिल्लक नाही,' असे उत्तर त्यांच्याकडून मिळायचे. मात्र, गेल्या पंधरा दिवसांपासून रुग्णसंख्या कमी होऊ लागली आहे. खासगीसह महापालिका व जम्बो रुग्णालयांतील रुग्णांची संख्याही कमी झाली आहे. दोन सप्टेंबरच्या तुलनेत शुक्रवारी (ता. 2) रुग्णसंख्या निम्म्यापेक्षाही कमी होती. 

पिंपरी-चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा 

रुग्ण घटण्याची कारणे 

 • 'माझे कुटुंब, माझी जबाबदारी' मोहिमेअंतर्गत घरोघरी सर्वेक्षण 
 • त्वरित रुग्णशोध, त्वरित तपासणी आणि त्वरित उपचाराचे धोरण 
 • नागरिकांकडून वाढलेला मास्कचा वापर व घेतली जाणारी काळजी 

खासगी रुग्णालये 

शहरातील 43 खासगी रुग्णालयांची बेड क्षमता एक हजार 989 आहे. सध्या एक हजार 186 रुग्ण असून, एक हजार दोन बेड उपलब्ध आहेत. एका रुग्णालयात क्षमतेपेक्षा 170, एका रुग्णालयात 25 व दोन रुग्णालयांत क्षमतेपेक्षा दोन रुग्ण जास्त आहेत. 35 बेडच्या एका रुग्णालयात शुक्रवारी दुपारी चार वाजेपर्यंत एकही रुग्ण नव्हता. 18 रुग्णालयांमध्ये दहापेक्षा कमी, 11 रुग्णालयांत 20 पेक्षा कमी आणि सहा रुग्णालयांत 30 पेक्षा कमी रुग्ण आहेत. 

दृष्टिक्षेपात रुग्ण (शुक्रवारी दुपारी चारपर्यंत) 

 • सक्रिय : 5657 
 • महापालिका रुग्णालये : 4242 
 • खासगी रुग्णालये : 1186 
 • लक्षणे नसलेले : 3290 
 • आयसीयूत : 249 
 • व्हेंटिलटेरवर : 87 
 • होम आयसोलेट : 229 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

शहरातील रुग्णसंख्या कमी होत आहे, ही समाधानकारक बाब आहे. शुक्रवारी सकाळी अकरापर्यंत नेहरूनगर जम्बो रुग्णालयात 320 व ऑटोक्‍लस्टर रुग्णालयात 90 रुग्ण होते. त्यापैकी अनुक्रमे 30 व 15 असे 45 रुग्ण व्हेंटिलेटरवर आहेत. सध्या घरोघरी सुरू असलेल्या सर्वेक्षणात नागरिकांनी स्वयंसेवकांना सहकार्य करावे. खरी माहिती द्यावी. लक्षणे असल्यास लपवू नयेत. 
- संतोष पाटील, अतिरिक्त आयुक्त, महापालिका  

 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: number of corona patients has halved in pimpri chinchwad