संविधान दिनानिमित्त पिंपरी-चिंचवड महापालिका अधिकारी, कर्मचाऱ्यांनी केला राष्ट्रीय एकात्मतेचा निर्धार

पितांबर लोहार 
Thursday, 26 November 2020

पिंपरी-चिंचवड महापालिकेतर्फे संविधान दिनानिमित्त मुख्य प्रशासकीय इमारतीत भारतीय संविधानाच्या प्रास्ताविकेचे सामूहिक वाचन करण्याचा कार्यक्रम आयोजित केला होता.

पिंपरी : स्वातंत्र्य, समता, बंधुता, न्याय प्राप्त करून देण्याचा तसेच व्यक्तीची प्रतिष्ठा, राष्ट्राची एकता आणि एकात्मता यांचे आश्‍वासन देणारी बंधुता प्रवर्धित करण्याचा संकल्पपूर्वक निर्धार आज महापालिका अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी आयुक्त श्रावण हर्डीकर यांच्या उपस्थितीत केला. 

पिंपरी-चिंचवड महापालिकेतर्फे संविधान दिनानिमित्त मुख्य प्रशासकीय इमारतीत भारतीय संविधानाच्या प्रास्ताविकेचे सामूहिक वाचन करण्याचा कार्यक्रम आयोजित केला होता. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस आयुक्त हर्डीकर यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. त्यानंतर संविधानाच्या प्रास्तविकेचे सामूहिक वाचन झाले. अतिरिक्त आयुक्त संतोष पाटील, आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ.के.अनिल रॉय, सहाय्यक आयुक्त अण्णा बोदडे, कार्यकारी अभियंता प्रगोद ओंभासे, समाज विकास अधिकारी संभाजी येवले, सुरक्षा अधिकारी मेजर उदय जरांडे, माहिती व जनसंपर्क विभागाचे प्रफुल्ल पुराणिक आदी उपस्थित होते. 

पिंपरी चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा 

भारताचे एक सार्वभौम, समाजवादी, धर्मनिरपेक्ष, लोकशाही गणराज्य घडविण्याचा आणि त्याच्या सर्व नागरिकांस सामाजिक, आर्थिक व राजनैतिक न्याय प्राप्त करून देण्याचा निर्धार करण्यात आला. तसेच विचार, अभिव्यक्ती, विश्‍वास, श्रद्धा आणि उपासना यांचे स्वातंत्र्य, दर्जा व संधीची समानता निश्‍चितपणे प्राप्त करून देण्याचा आणि त्या सर्वांमध्ये व्यक्तीची प्रतिष्ठा व राष्ट्राची एकता आणि एकात्मता यांचे आश्‍वासन देणारी बंधुता प्रवर्धित करण्याचा संकल्पपूर्वक निर्धार करण्यात आला. भारतीय संविधान अंगीकृत आणि अधिनियमित करून स्वत:प्रती अर्पण करीत असल्याची कृतज्ञता व्यक्त करण्यात आली. आपल्या देशाप्रती एकनिष्ठ राहून देशाला प्रगतीच्या मार्गावर अग्रेसर ठेवण्याची भावना व्यक्त केली. 

दरम्यान, पिंपरी चौकातील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास आयुक्त हर्डीकर यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. तसेच, पुतळ्याच्या प्रांगणातील भारतीय संविधानाच्या प्रास्ताविकतेच्या कोनशिलेस देखील पुष्पहार अर्पण करण्यात आला. अतिरिक्त आयुक्त संतोष पाटील, सहाय्यक आयुक्त अण्णा बोदडे, सेवानिवृत्त सहाय्यक आयुत्त सुभाष माछरे, शहर क्षयरोग नियंत्रण अधिकारी डॉ. किशोर खिलारे आदी उपस्थित होते. यावेळी प्रफुल्ल पुराणिक यांनी सूत्रसंचालन केले. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: On the occasion of Constitution Day the officers and employees of PCMC have decided for national unity