कोरोनाबाबत पिंपरी-चिंचवडकरांच्या प्रश्नांना पालिकेच्या अतिरिक्त आयुक्तांनी दिली उत्तरे

सकाळ वृत्तसेवा
Sunday, 4 October 2020

  • पिंपरी-चिंचवड हाउसिंग फेडरेशन महासंघातर्फे वेबिनारचे आयोजन 

पिंपरी : 'माझे कुटुंब, माझी जबाबदारी' मोहिमेअंतर्गत नागरिकांनी विचारलेल्या प्रश्‍नांना पिंपरी-चिंचवड महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त संतोष पाटील आणि अतिरिक्त आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. पवना साळवे यांनी उत्तरे दिली. निमित्त होते पिंपरी-चिंचवड हाउसिंग फेडरेशन महासंघातर्फे रविवारी आयोजित वेबिनारचे. कोरोनाबाबत शहरातील नागरिकांमध्ये जागृती निर्माण व्हावी, हा या वेबिनारचा उद्देश होता. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

कोरोना रोखण्यासाठी महापालिकेतर्फे राबविण्यात येणाऱ्या उपाययोजनांची माहिती डॉ. साळवे यांनी सुरुवातीला दिली. त्यानंतर नागरिकांनी आपले प्रश्‍न व समस्या मांडल्या. काहींनी उपाययोजनेसाठी सूचनाही केल्या. ते प्रश्‍न व सुचना पुढीलप्रमाणे. 

दत्तात्रेय देशमुख : 'माझे कुटुंब, माझी जबाबदारी' यात कोणती ऍक्‍टिव्हिटी आहेत. त्यांची माहिती द्यावी. शंभर टक्के टेस्टिंग होईल का? सर्वेक्षण करणाऱ्यांनी सांगितले, की 35 टक्केच सर्वेक्षण करणार आहोत. 
संतोष पाटील : सर्वेक्षण शंबर टक्के होणार आहे. मात्र, विशेष पथक नियुक्त केले आहेत. त्यांच्याद्वारे 35 टक्‍क्‍यांपर्यंत तपासण्या करण्यात येणार आहेत. आयसीएमआरच्या मार्गदर्शक तत्वानुसार पॉझिटिव्ह रुग्णांच्या संपर्कातील शंभर टक्के व्यक्तींचे टेस्टिंग करणार. तसेच, लक्षणे दिसलेल्यांची टेस्टिंग करणार. ताप व ऑक्‍सिजन पात्रता तपासणी जाणार आहे. नियुक्त केलेले कर्मचारी व स्वयंसेवकांनी हलगर्जीपणा करू नये. घरोघरी जाऊन तपासणी करून घ्यावी. लवकर रुग्ण शोधून लवकर टेस्ट करणे व लवकर उपचार करणे, हा मोहिमेचा उद्देश आहे. यामुळे मृत्त्यूदर कमी ठेवता येईल. 

अरुण देशमुख : 'माझे कुटुंब माझी जबाबदार' ही एक चळवळ आहे. घरी येणारे पथक महापालिकेचेच आहे हे तपासण्यासाठी ओळखपत्र असावे. काही जण, तपासणीच्या नावाखाली चोरी किंवा लुटमार करण्याच्या हेतून येऊ शकतात. अशा वेळी सुरक्षेचे काय? 
संतोष पाटील : कोणत्याही सोसायटी किंवा घरात आमची टीम गेल्यानंतर संबंधित व्यक्तींनी टीमची चौकशी करावी. सर्वांना ओळखपत्र दिलेले आहे. 

ज्ञानेश्‍वर सावंत : काल तपासणीसाठी आमच्याकडे प्राधिकरणात पथक आले होते. त्यांनी फक्‍त माझीच माहिती घेतली व निघून गेले. 
संतोष पाटील : कुटुंब प्रमुखासह संपूर्ण माहिती असेल. अर्धवट सर्वेक्षण करणे चुकीचे आहे. आरोग्य अधिकाऱ्यांनी याकडे लक्ष द्यावे. 

शैलेंद्र : सर्वेक्षणातील माहिती संगणकीकृत करावी. 
संतोष पाटील : संकलित होणारी माहिती वैयक्तिक स्वरूपाचीही आहे. ज्येष्ठ व अन्य आजार असलेल्यांची माहिती असेल. सरकारने ऍप विकसित केले असून त्यात सर्व माहिती संकलित होणार आहे. 

तुषार शिंदे : मोटारीत असताना मास्क नसेल, तर पोलिसांना कारवाईचा अधिकार आहे का? 
संतोष पाटील : सार्वजनिक ठिकाणी गेल्यावर मास्क आवश्‍यक आहे. एकापेक्षा जास्त व्यक्ती असतील तिथे मास्क आवश्‍यक आहे. कारमध्ये बसलेल्या एकापेक्षा जास्त व्यक्ती असल्यास मास्क आवश्‍यक आहे. आपल्या स्वतःच्या, कुटुंबीयांच्या व सहप्रवाशाच्या सुरक्षिततेसाठी मास्क आवश्‍यक आहे. 

युवराज भामरे : नागरिकांना ऍपचा ऍक्‍सेस द्यायला हवा. अँटिजेन टेस्ट व स्वॅब टेस्टचा रिपोर्ट बघायला पुन्हा रुग्णालयात जावे लागते. पुन्हा पॉझिटिव्ह येण्याची भीती. रिपोर्ट एसएमएसद्वारे मिळावा. 
संतोष पाटील : कोरोना पॉझिटिव्ह असलेल्या रुग्णांच्या संपर्कातील व्यक्तींची व लक्षणे असलेल्यांची टेस्ट केली जाते. अर्धवट माहिती घेतली असल्यास पुढील टप्प्यात तपासणी करून घ्यावी. कुटुंबातील सर्वांची नोंदणी करायला हवी. आरोग्य अधिकाऱ्यांनी कर्मचाऱ्यांचे ट्रेनिंग घ्यावे. आमच्या कामकाजात सुधारणा करण्याचा प्रयत्न करू. मृत्यू दर करण्यासाठी हे आवश्‍यक आहे.

डॉ. सावळे : रिपोर्ट एसएमएसद्वारे कळविला जाईल. 

पिंपरी-चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा 

रमेश ओसवाल : हस्तपत्रिका मिळाल्यास घरोघरी पाठवता येतील. स्वयंसेवी संस्थांची नोंदणी करून काम केल्यास सोयीचे होईल. 
डॉ. साळवे : स्वयंसेवी संस्थांना एकत्र आणून चांगले काम करता येईल. 

लालचंद मुथियान : सोसायट्यांनी सहभाग घ्यावा. 35 ते 40 एनजीओ एकत्र आलेल्या आहेत. हाउसिंग सोसायट्या, स्वयंसेवी संस्थांच्या सहकार्याने कोरोना संसर्ग कमी करता येईल. 
संतोष पाटील : होम आयसोलेशन कमीत कमी ठेवण्याचे आदेश आहे. अशा व्यक्तींनी स्वतः नियम पाळायला हवीत. परंतु, तसे होताना दिसत नाही. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

पिंपरी-चिंचवड हाउसिंग फेडरेशन महासंघाचे के. सी. गर्ग उपस्थित होते. महासंघाच्या पदाधिकारी तेजस्विनी यांनी सूत्रसंचालन केले. नवरात्रीच्या काळात खबरदारी घेण्यासाठी नवरात्रोत्सव मंडळाची ऑनलाइन बैठक घेणार असल्याचे गर्ग व तेजस्विनी यांनी सांगितले. 

डॉ. पवन साळवे म्हणाले.... 
पाच हजार पाचशे कुटुंबांची रक्त तपासणी करणार आहोत. डॉ. डी. वाय. पाटील रुग्णालयाच्या सहकार्याने काम सुरू केले आहे. हर्ड इम्युनिटी किती. सोसायट्यांमध्ये 15 ते 20 टक्के आहे. वस्त्या व चाळींमध्ये जास्त आहे. याची कारणे तपासावे लागणार आहेत. आपण काळजी घेणे गरजचे आहे. घरात राहणे, अनावश्‍यक बाहेर न जाणे, हात धुणे, मास्क वापरणे, सोशल डिस्टन्सिंग ठेवणे. दसरा व नवरात्रीत अधिक काळजी घ्यावी लागणार आहे. जर दुर्लक्ष केले, तर पुन्हा रुग्ण वाढू शकतील. सणांच्या काळात काळजी घ्या. नवरात्रात रुग्ण वाढण्याची भिती आहे. अशा मंडळांची वेबिनार घेऊन सूचना द्याव्यात. गर्दी कमी ठेवता येईल. नागरिकांचे प्रबोधन करता येईल.  
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Officials answered the questions of citizens about corona in Pimpri-Chinchwad city