#VeryPositive : दीड महिन्याचं बाळ; कावीळनंतर कोरोनाशी लढला अन् जिंकला

 #VeryPositive : दीड महिन्याचं बाळ; कावीळनंतर कोरोनाशी लढला अन् जिंकला

पिंपरी : त्याचा जन्म लॉकडाउनमधला. त्याने सुमारे दीडशे किलोमीटर प्रवास केला तोही लॉकडाउनमध्येच. त्याला कोरोना संसर्ग झाला लॉकडाउनमध्ये आणि तो बरा होऊन घरी सुखरूप पोचला लॉकडाउनमध्येच. होय... लॉकडाउनमधल्या जीवन प्रवासाची कथा आहे, अवघ्या दीड महिन्याच्या बाळाची. 

चिंचवडमधील संभाजीनगर परिसरात त्याचे घर. पण, तो गर्भात असताना आई बाळंतपणासाठी मुंबईतील नेरूळला माहेरी गेली. पण, काही दिवसांतच कोरोनाचा उद्रेक झाला. मुंबईसह पुणे, पिंपरी-चिंचवडच नव्हे, तर देशभर लॉकडाउन जाहीर झाला. सर्व जण जिथल्या तिथे. अशातच मार्च महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात त्याचा जन्म झाला. मुंबईतल्या एका रुग्णालयात. पण... तिथे त्याची प्रकृती खालवली. तेरेना मेडिकल कॉलेज व रुग्णालयाच्या एनआयसीयूत दाखल केले. त्याला कावीळ झाली होती. साधारणरतः आठवडाभराने तो बरा झाला. त्याला घरी सोडण्यात आले. आईसह आजोबा-आजींना आनंद झाला. असाच सव्वा महिना निघून गेला. आणि एक दिवस आई-वडील व मोठा चार वर्षांच्या भावासह तो संभाजीनगरला स्वतःच्या घरी आला. पण... दुसऱ्याच दिवशी तापाने फणफणाला. 

पिंपरी चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

दोन मे रोजी त्याला वायसीएममध्ये दाखल केले. त्याच्यासह आई-वडील व भावाच्या घशातील द्रवाचे नमुने एनआयव्हीकडे तपासणीसाठी पाठवले. तीन मे रोजी रिपोर्ट आला. तो व त्याचा भाऊ पॉझिटिव्ह. सर्वांच्या चेहऱ्यावर पुन्हा चिंता. दीड महिन्याचे बाळ, तेही कावीळसारख्या आजारातून नुकतेच बरे झाले. कोरोनाचा सामना कसा करेल. मात्र, त्याच्या आई-वडिलांचे रिपोर्ट निगेटिव्ह होते. त्यामुळे डॉक्‍टरांनी त्याच्या संसर्गाची हिस्ट्री तपासली. संदर्भ नेरूळपर्यंत पोचला. तिथे संपर्क साधला आणि कळले त्याचे आजोबाही (आईचे वडील) पॉझिटिव्ह आढळले होते. संसर्गाचा मार्ग डॉक्‍टरांना सापडला होता. त्यांनी उपचार सुरू केला. बघता बघता 14 दिवस उलटले. त्याच्यासह भावाच्याही घशातील नमुने तपासले आणि सर्वांच्या चेहऱ्यावर आनंद पसरला. दोघांचेही रिपोर्ट निगेटिव्ह होते. कोरोनावर दोन्ही भावंडांनी विजय मिळविलेला होता. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा 

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वायसीएम अर्थात यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयातील बालरोग विभागप्रमुख डॉ. दीपाली अंबिके, वैद्यकीय अधिकारी डॉ. संध्या हरिभक्त, डॉ. सीमा सोनी, डॉ. सूर्यकांत मुंडलोड, डॉ. नुपूर कत्रे, डॉ. शीतल खाडे, डॉ. प्राजक्ता कदम, डॉ. गौरव शर्मा, डॉ. सबाहत अहमद, डॉ. अभिजीत ब्याले, डॉ. रिजवना सय्यद, डॉ. कोमल बिजारनिया व सर्व परिचारिका यांचाही तो विजय होता. या आनंदाच्या भरातच रविवारी (ता. 17) दीड महिन्याच्या बाळासह त्याच्या भावासही घरी सोडण्यात आले. पण, 14 दिवस घरातच क्‍वारंटाइन राहण्याची सूचना त्यांना केली. सर्व डॉक्‍टरांचे वायसीएमचे वैद्यकीय अधिष्ठाता डॉ. राजेंद्र वाबळे व डॉ. अनिकेत लाठी यांनी डॉक्‍टरांचे अभिनंदन केले. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com