वडगावात यंदा 'या' पद्धतीने साजरा होणार गणेशोत्सव

सकाळ वृत्तसेवा
Sunday, 16 August 2020

करोना साथीच्या पार्श्वभूमीवर सामाजिक बांधिलकी जपत शहरात यंदा 'एक गाव एक गणपती' उपक्रम राबविण्याच्या संकल्पनेला सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी सकारात्मक प्रतिसाद दिला आहे.

वडगाव मावळ (पुणे) : करोना साथीच्या पार्श्वभूमीवर सामाजिक बांधिलकी जपत शहरात यंदा 'एक गाव एक गणपती' उपक्रम राबविण्याच्या संकल्पनेला सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी सकारात्मक प्रतिसाद दिला आहे.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गर्दी टाळण्यासाठी आगामी गणेशोत्सवावर सरकारने घातलेले निर्बंध ही 'एक गाव एक गणपती' उपक्रम राबविण्यासाठी संधी असल्याची भूमिका 'सकाळ'ने मांडली होती. त्यासाठी लोकप्रतिनिधींनी पुढाकार घ्यावा, असे आवाहन केले होते. वडगावचे नगराध्यक्ष मयूर ढोरे यांनी पुढाकार घेऊन ही संकल्पना शहरात मांडली. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर वडगाव नगरपंचायत व वडगाव मावळ पोलिस ठाणाच्या वतीने रविवारी मंडळांची बैठक घेण्यात आली. कोरोनाच्या संकटकाळात यंदाच्या वर्षीचा गणेशोत्सव हा सण अतिशय साध्या पद्धतीने साजरा केला जावा, असे निर्देश राज्य सरकारकडून देण्यात आले आहेत. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

शहरात दिवसेंदिवस कोरोना साथीचे रुग्ण वाढत आहेत. प्रतिबंधात्मक उपाययोजनेसाठी शहरातील सार्वजनिक गणेश मंडळांनी 'एक गाव एक गणपती' ही संकल्पना राबवावी जेणेकरून आपल्या शहरात, समाजात एकतेचा संदेश पोहोचेल, असे आवाहन नगराध्यक्ष मयूर ढोरे यांनी यांनी यावेळी केले. नगरपंचायतीच्या वतीने श्री. पोटोबा महाराज मंदिराच्या प्रांगणात उभारण्यात येणाऱ्या मंडपात तो साजरा करावा, असे आवाहन केले. त्याला गणेश मंडळांचे अध्यक्ष, प्रतिनिधी व सदस्य यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला. जबाबदारीची जाणीव ठेवून शहराला महामारीतून सुरक्षित ठेवण्यासाठी ही संकल्पना राबविण्यासाठी महत्त्वाचे पाऊल उचलले. 

पिंपरी-चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

उत्सव काळात  नगरपंचायतीच्या वतीने व सर्वांच्या सहकार्याने रक्तदान शिबिर, आरोग्य तपासणी, कोव्हिड-१९ ची रॅपिड टेस्ट, मास्क वाटप इत्यादी विधायक उपक्रम श्री. पोटोबा महाराज प्रांगणात राबविण्यात येणार असल्याचे नगराध्यक्ष ढोरे यांनी सांगितले. मंडळांच्या प्रतिनिधींची मते व सूचना जाणून घेण्यात आल्या. पोलिस निरीक्षक सुरेश निंबाळकर यांनी सरकारच्या नियमावलीची माहिती दिली. यंदा मिरवणुकीला परवानगी नसल्याचे त्यांनी सांगितले व गणेशोत्सव साध्या पद्धतीने व शांततेत साजरा करण्याचे आवाहन केले. उपनगराध्यक्ष चंद्रजीत वाघमारे, नगरसेवक राजेंद्र कुडे, प्रवीण चव्हाण, राहुल ढोरे, दिलीप म्हाळसकर, शामराव ढोरे, राजेश बाफना, प्रवीण ढोरे, शरद ढोरे, भाऊसाहेब ढोरे, गणेश जाधव, शरद मोरे, पोलिस नाईक गणेश तावरे, मनोज कदम आदी उपस्थित होते.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: one ganpati one village at vadgaon maval