पुणे, पिंपरी-चिंचवडकरांनो! आता मास्क नसल्यास एक हजाराचा दंड 

सकाळ वृत्तसेवा
Friday, 28 August 2020

  • उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे मत
  • आज निर्णय होण्याची शक्‍यता 

पिंपरी : "डॉक्‍टर्स, नर्स, अन्य वैद्यकीय क्षेत्रातील कर्मचारी, अधिकारी, प्रशासन, सरकार कोरोना नियंत्रणात आणण्यासाठी प्रयत्न करीत आहे. मात्र, त्यांना जनतेची साथ मिळायला हवी. अनेक जण मास्क वापरत नाहीत, सोशल डिस्टन्सिंग पाळत नाहीत, असे दिसून आले आहे. त्यामुळे पुणे व पिंपरी-चिंचवड शहरांसह पुणे जिल्ह्यात मास्क न वापरणाऱ्यांवर एक हजार रुपये दंड आकारण्याचा विचार सुरू आहे. याबाबत आज आम्ही सर्व मिळून ठरवणार आहोत, जनतेची साथ मिळण्यासाठी हे करावे लागणार आहे,'' असे सुतोवाच उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 

पिंपरी-चिंचवड महापालिकेने ऑटो क्‍लस्टर प्रदर्शन केंद्रात उभारलेल्या 210 बेडच्या कोविड-19 रुग्णालयाच्या उद्‌घाटनप्रसंगी पवार बोलत होते. विधानसभा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, महापौर उषा ढोरे, खासदार श्रीरंग बारणे, आमदार लक्ष्मण जगताप, महेश लांडगे, अण्णा बनसोडे, महापालिका सत्तारूढ पक्षनेते नामदेव ढाके, आयुक्त श्रावण हर्डीकर आदी उपस्थित होते. 

पवार, म्हणाले, "राज्य सरकार, पीएमआरडीए, पुणे व पिंपरी-चिंचवड महापालिका यांच्यातर्फे मगर स्टेडियम येथे 800 बेडचे कोविड-19 हॉस्पिटल सुरू केले. आता ऑटो क्‍लस्टर येथील रुग्णालय पूर्णतः पिंपरी-चिंचवड महापालिकेने उभे केले आहे. त्याबद्दल महापौर व त्यांच्या सर्व पदाधिकारी, अधिकाऱ्यांचे अभिनंदन. पण, आपण गणेशोत्सवाच्या आनंदावर थोडी बंधने आणू या. कोरोनाचे संकट आहे. ते पुरेसे थांबलेले नाही. थांबावे, असे वाटते आहे. ही कष्टकऱ्यांची नगरी आहे. येथील नागरिकांवर किफायतशीर दरात उपचार झाले पाहिजे. म्हणून रूग्णालय उभारले. गणरायाने संकट दूर करावे, असे साकडे मी घालतो.'' 

पिंपरी-चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

सीरम इन्स्टिट्यूटने कोरानाची चाचणी पुण्यात सुरू केली आहे. दोघांना लस दिली आहे. 28 दिवसांनी पुन्हा डोस दिला जाणार आहे. ही पहिली मानवी चाचणी आहे. ती यशस्वी होईलच व आपल्याला लस उपलब्ध होईल, असा विश्‍वास आहे. जगातील मोठमोठी राष्ट्र चाचणी करताहेत. परंतु, त्यांना यश आलेले नाहीत. आपण त्यात यशस्वी होऊ, असा विश्‍वासही पवार यांनी व्यक्त केला. 

कोरोना रुग्णांवर उपचारांचे जास्त बिले आकारणाऱ्या रूग्णालयांवर करडी नजर आहे. पुणे, पिंपरी-चिंचवड शहरातील रुग्णालयांचे स्वतंत्र लेखा परीक्षण केले जात आहे. ग्रामीण भागासाठी 20 भरारी पथके नियुक्त केली आहे. एक लाखापेक्षा अधिक बिलांचे लेखापरीक्षण केले जाईल. आतापर्यंत 95 रूग्णांचे 74 लाखांची बिले कमी केली आहेत. ही प्रक्रिया सुरूच राहणार आहे. अशा संकटातून जास्त पैशांचा प्रयत्न करू नये. परंतु, दुर्देवाने काही जण प्रतिसाद देत नाहीत. म्हणून लेखा परीक्षण करावे लागत असल्याचेही पवार यांनी नमूद केले. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

पवार म्हणाले, "कोरोनाविरुद्धची लढाई ही एकत्रित लढायची आहे. त्यासाठी आम्ही एकत्रित आलो आहोत. राजकीय मत, भूमिका वेगवेगळी असू शकतात. परंतु, निवडणुका झाल्यानंतर हा सत्ताधारी पक्षाचा, हा विरोधी पक्षाचा असा भेदभाव करायला नको. अशा संकटाच्या वेळी एकसंघ राहायला पाहिजे. या काळात एकमेकांवर आरोप-प्रत्योरोप करण्यापेक्षा सर्वांनी एकत्र मिळून लढले पाहिजे. त्यामुळे कोणी वेगळी शंकाकुशंका घेण्याची गरज नाही. दुर्देवाने असे हॉस्पिटल उभे करावे लागले. काही पावलं उचलावी लागली. या लढाईत अनेकांना जीव गमवावा लागला. अनेक पदाधिकारी त्यात होते. राज्य व देशाला कोरोनामुक्त करणं हीच मृतांचा श्रद्धांजली ठरेल. रुग्णालयाचे उद्‌घाटन झाले पण, तिथे कोणाला जायची वेळ येऊ नये. परंतु, खबरदारीचा उपाय म्हणून 210 बेड उपलब्ध करून दिले, त्याबद्दल महापालिकेचा आभारी आहे.'' 

देवेंद्र फडणवीस म्हणाले...

गेल्या काही दिवसात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढतो आहे. राज्यात रोज 15 हजार रुग्ण आढळतात. संसर्गाचे प्रमाण राज्यात 19 टक्के आहे. या परिस्थितीत मोठ्या प्रमाणात टेस्टिंग करणे, लक्षणे नसलेल्या रुग्णांना होम आयसोलेअशन करणे, काहींना संस्थांत्मक क्वारंटाइन करणे, गरजेचे आहे. सध्या 20 टक्के रूग्णांची विशेष काळजी घ्यावी लागते. 15-16 टक्के लोकांना ऑक्‍सिजन व दोन-तीन टक्‍क्‍यांना व्हेंटिलेटर लागतात. त्यांची सोय उभी करणे. कोविड विरुद्धची लढाई अशाच प्रकारे लढता येईल. रुग्णसंख्या वाढते तेव्हा चिंता वाटते. ती करताना जास्तीत जास्त टेस्टिंग करणे. आयसोलेशन करणे. वैद्यकीय व्यवस्था पुरवणे या आधारावरच कोरोना कंट्रोल करता येईल. पुण्यात टेस्टिंग वाढवल्याने नंबर वाढले व संसर्ग कमी झाला. पीसीएमसी मृत्यू दर 1.7 टक्के आहे. तो एक टक्‍क्‍यापर्यंत आणायचा आहे. व्हॅक्‍सिन येईपर्यंत यासाठी प्रयत्न करावे लागणार आहेत.'' 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: one thousand rupees fined for not having a mask said ajit pawar in pune pimpri chinchwad