पिंपरी-चिंचवडकरांनो, घर हवंय तर करा ऑनलाइन अर्ज 

सकाळ वृत्तसेवा
Saturday, 15 August 2020

  • महापौर उषा ढोरे यांच्या हस्ते उद्घाटन
  • ऑनलाइन अर्ज करण्याची प्रणाली कार्यान्वित

पिंपरी :  पंतप्रधान आवास योजनेंतर्गत महापालिकेतर्फे चऱ्होली, रावेत व मोशीतील बोऱ्हाडेवाडी येथे गृहप्रकल्प उभारण्यात येत आहे. या प्रकल्पांचे काम प्रगतिपथावर आहे. आर्थिक दुर्बल घटकातील व्यक्ती या योजनेचा लाभ घेऊ शकतात. त्यासाठी ऑनलाइन अर्ज करण्याची प्रणाली स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर कार्यान्वित करण्यात आली. तिचे उद्घाटन महापौर उषा ढोरे यांच्या हस्ते झाले. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 

केंद्रीय गृहनिर्माण व शहरी गरीब मंत्रालयामार्फत सर्वांसाठी घरे ही संकल्पना राबविण्यात येत आहे. महापालिकेने 20 जून 2017 च्या सर्वसाधारण सभेत गृहप्रकल्प उभारण्याचा ठराव मंजूर केला आहे. तीन ठिकाणी आर्थिक दुर्बल घटकांसाठी प्रकल्प उभारण्यात येत आहे. खासगी भागीदारी तत्त्वावर ही घरी बांधली जात आहेत. चऱ्होली, रावेत व बोऱ्हाडेवाडी गृहप्रकल्पांना पर्यावरण दाखला मिळाला असून, त्यांची महारेराअंतर्गत नोंदणी झाली आहे. राज्य सरकारकडून प्रतिसदनिका एक लाख आणि केंद्र सरकारकडून दीड लाख रुपये अनुदान मिळणार आहे. स्वहिस्सा रक्कम बांधकामांच्या टप्प्यांनुसार भरायची आहे. हिस्स्याचे टप्पे रेरा नियमानुसार ठेवले आहेत.

पिंपरी-चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

प्रकल्पातील मूलभूत सुविधा विषयक कामे व भाववाढ फरक महापालिका देणार आहे. म्हणजेच महापालिकेचा आर्थिक सहभाग हा प्रकल्प स्वतःच्या जागांवर उभारणे, सुविधा पुरविणे, विकास शुल्क माफी, भाववाढ व आस्थापना खर्च या स्वरूपात असेल. सदनिका वाटपासाठी लवकरच सोडत काढली जाणार आहे. तिन्ही ठिकाणच्या मिळून तीन हजार 664 सदनिका असतील. लाभार्थींना राज्य व केंद्र सरकारकडून अडीच लाखांचे अनुदान मिळणार आहे. सात लाखांपर्यंत स्वहिस्सा भरावा लागणार आहे. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

घरासाठी काय करावे 

इच्छुकांनी महापालिकेने दिलेल्या लिंकद्वारे ऑनलाइन अर्ज भरावा, त्याची प्रिंट काढून नागरी सुविधा केंद्रात जमा करावी. नव्याने अर्ज भरताना आधार कार्ड, रेशन कार्ड, पॅन कार्ड, मतदार ओळखपत्र, जात प्रमाणपत्र, उत्पन्न दाखला, बॅंक पास बुक, वीजबिल, महापालिका आयुक्तांच्या नावे पाच हजारांचा डिमांड ड्राफ्ट, दोन पासपोर्ट.  आकारातील फोटो जमा करावा व पोच पावती घ्यावी. या पूर्वी अर्ज केलेल्यांनी केवळ ऑनलाइन अर्ज भरून त्याच्या प्रतीसह पाच हजार रुपयांचा डिमांड ड्राफ्ट जमा करावा. मात्र, या अर्ज केल्यापासून आजपर्यंतच्या कालावधीत उत्पन्न वाढले असल्यास किंवा स्वतःचे घर घेतले असल्यास अपात्र ठरतील. 

अशी असेल प्रक्रिया 

पात्र लाभार्थ्यांची यादी महापालिकेच्या वेबसाईटवर प्रसिद्ध करून सोडत काढून प्रत्येक प्रकल्पासाठी लाभार्थी निश्‍चित केले जातील. पाच हजार रुपये सदनिकेच्या किमतीतून वजा केले जातील व सदनिका न मिळाल्यास परत केले जातील. प्रतीक्षा यादी ठेवणे अथवा रद्द करण्याचा अधिकार महापालिकेने राखून ठेवला आहे. 

दृष्टिक्षेपात प्रकल्प 

चऱ्होलीत 1442, रावेतमध्ये 934 व बोऱ्हाडेवाडीत 1288 सदनिका असतील. 

Edited by Shivnandan Baviskar


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: online application system starts for home under pradhan mantri awas yojna at pimpri chinchwad