esakal | तरुणांनो, मावळात कृषी पर्यटनातून मिळवा रोजगार
sakal

बोलून बातमी शोधा

तरुणांनो, मावळात कृषी पर्यटनातून मिळवा रोजगार
 • कृषी पर्यटनातून आर्थिक परिवर्तनाची नांदी 
 • मावळ तालुक्‍यात विस्तार शक्‍य
 • शेतकरी तरुणांना रोजगाराची मोठी संधी 

तरुणांनो, मावळात कृषी पर्यटनातून मिळवा रोजगार

sakal_logo
By
ज्ञानेश्वर वाघमारे

वडगाव मावळ : राज्यात कृषी पर्यटन धोरण राबविण्यास राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत नुकतीच मान्यता देण्यात आल्याने मावळात या पर्यटनाचा विस्तार करण्याची व शेतकरी तरुणांना रोजगाराची मोठी संधी निर्माण झाली आहे. कृषी पर्यटनातून आर्थिक परिवर्तनाची नांदी ठरू शकते. 

पिंपरी-चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

निसर्गाचे भरभरून वरदान लाभलेल्या मावळला या कृषी पर्यटन धोरणाचा लाभ घेण्याची मोठी संधी उपलब्ध झाली आहे. गेल्या काही वर्षात पर्यटक लोणावळा व खंडाळा या नेहमीच्या पर्यटन स्थळांप्रमाणेच ग्रामीण भागातील नवीन स्थळांचा शोध घेताना दिसून येत आहेत. आंदर, नाणे व पवन या दुर्गम व डोंगराळ भागातही पर्यटकांना भुरळ घालणारी अनेक अपरिचित ठिकाणे आहेत. पावसाळ्यात या तीनही मावळात धो-धो पडणारा पाऊस, डोंगरदऱ्यातील धुक्‍याचा पाठशिवणीचा खेळ, कोसळणारे फेसाळते धबधबे, हिरवीगार भात खाचरे पर्यटकांचे आकर्षण ठरले आहे. गेल्या काही वर्षात या ठिकाणीही पर्यटकांची वर्दळ वाढली आहे. त्यामुळे कृषी पर्यटनाचा विस्तार करण्यास तालुक्‍यात मोठा वाव आहे. 

कृषी पर्यटनाचा उद्देश 

 • शेती मालाला बाजारपेठ उपलब्ध करून देणे 
 • गावातील महिला व तरुणांना रोजगाराची संधी 
 • लोककला व परंपरांचे दर्शन घडविणे 
 • पर्यटकांना प्रत्यक्ष शेतीतील कामांचा अनुभव देणे 
 • प्रदूषण मुक्त व निसर्गाच्या सानिध्यात राहण्याचा अनुभव देणे 

निकष काय असतील 

 • वैयक्तिक शेतकरी व कृषी शेतकरी संस्था कृषी पर्यटन केंद्र उभारू शकतात 
 • दोन ते पाच एकरपर्यंत शेती क्षेत्र असलेल्यांना सहभागी होता येईल 
 • खोल्या, भोजन व्यवस्था, स्वयंपाक घर असणे आवश्‍यक 

योजनेचा लाभ 

 • नोंदणीकृत कृषी पर्यटन केंद्रास जीएसटी व विद्युत शुल्कामध्ये सवलत 
 • पर्यटन विभागाकडून नोंदणी प्रमाणपत्र 
 • नोंदणी प्रमाणपत्राच्या आधारे बॅंक कर्ज 
 • जलसंधारण विभागाच्या पाणलोट आधारित योजना 
 • शेततळ्यांचा योजनांचा लाभ 
 • ग्रीन हाउस, फळबाग, भाजीपाला लागवड योजनांचा लाभ 
 • आठ खोल्या तसेच इतर सुविधांच्या बांधकामासाठी नगररचना विभागाच्या परवानगीतून सूट 
 • अनुभवी प्रशिक्षकांमार्फत कृषी पर्यटन केंद्र चालकांना प्रशिक्षण 
 • ऑनलाइन मार्केटिंग आदी सुविधा उपलब्ध करून दिल्या जाणार 
 • कृषी पर्यटन केंद्रासाठी दोन हजार 500 रुपये प्रथम नोंदणी शुल्क घेणार 
 • दर पाच वर्षांनी एक हजार रुपये नूतनीकरण शुल्क भरावे लागणार 

मावळातील ठिकाणे 

 • आंबवणे गावाजवळील कोरीगड, सहारा कंपनीचा ऍम्बी व्हॅली प्रकल्प 
 • कार्ला व भाजे लेणी, लोहगड व विसापूर किल्ला, पवना धरण, तुंग व तिकोना किल्ला, बेडसे लेणी 
 • नाणे मावळातील कोंडेश्‍वर मंदिर, वडिवळे धरण, राजमाचीचे श्रीवर्धन व मनोरंजन किल्ले 

रोजगाराची संधी 

 • प्रवासी वाहतूक करण्यासाठी वाहने, वस्तूंची विक्री, निवास खोल्या व मावळी जेवणाची व्यवस्था 
 • मावळ दर्शन स्वरूपाच्या खासगी बससेवेचा व्यवसाय 
 • शिक्षित तरुणांना प्रशिक्षण दिल्यास माहिती देण्यासाठी गाइड म्हणूनही त्यांना रोजगार 
 • अशिक्षित तरुणांना सुरक्षा रक्षक म्हणूनही रोजगार 
 • तांदूळ, नाचणी, मध, जेली, तूप, दही, दूध, ताक आदींची विक्री 
 • करवंदे, जांभूळ, आंबे, तोरणे, आळू, जाम, शिंदोळ्या आदी गावरान मेव्याची विक्री 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

राज्याचा कृषी पर्यटन धोरणामुळे मावळातील कृषी पर्यटनाला निश्‍चित चालना मिळेल. मात्र सरकारने पर्यटकांच्या सोयीसाठी ग्रामीण व दुर्गम भागातील रस्ते, वीज, सुरक्षा व्यवस्था आदी मुलभूत सुविधांमध्येही अधिक सुधारणा करण्याची गरज आहे. 
- सुरेश कालेकर, व्यवस्थापक, मावळ ऍग्रो टूरिझम संस्था 

राज्याच्या कृषी पर्यटन धोरणामुळे येथील अनेक शेतकऱ्यांनाही फायदा होईल. पॉलिहाउसची उभारणी करुन त्यात फुलांबरोबरच भाजीपाला, औषधी वनस्पती आदींचे उत्पादन ते घेऊ शकतील. पर्यटकांमुळे त्यांच्या शेतीमालाला ग्राहक व बाजारपेठ उपलब्ध होईल. 
- हेमंत कापसे, सचिव, महाराष्ट्र नर्सरीमेन असोसिएशन 

सरकारचे कृषी पर्यटन धोरण चांगले असून, तालुक्‍यातील शेतकऱ्यांनी त्याचा लाभ घेतल्यास कृषी पर्यटनाला मोठी चालना मिळेल. शेतकऱ्यांच्या मुलांना मोठ्या प्रमाणावर रोजगार उपलब्ध होतील. 
- सचिन वाघमारे, नवउद्योजक, भाजे