esakal | रावेत-बालेवाडी मार्गावरील खड्डे दुरुस्तीचे आदेश 
sakal

बोलून बातमी शोधा

रावेत-बालेवाडी मार्गावरील खड्डे दुरुस्तीचे आदेश 
  • सार्वजनिक बांधकाम विभागाने घेतली दखल 

रावेत-बालेवाडी मार्गावरील खड्डे दुरुस्तीचे आदेश 

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

पिंपरी : पुणे-मुंबई महामार्गावरील रावेत ते बालेवाडी या अंतरातील खड्डे, सेवा रस्ते दुरुस्तीचे आणि नियमित देखभालीचे काम वेळीच करण्याचे आदेश सार्वजनिक बांधकाम विभागाने संबंधित ठेकेदाराला दिले आहेत. तसेच, महामार्गावरील दुभाजकांमधील झाडांची वाढ झाली नसेल, तर ती बदलण्याचे काम तातडीने पूर्ण करा, असेही आदेशात म्हटले आहे. या विषयावर चिंचवडचे आमदार लक्ष्मण जगताप यांनी अर्थसंकल्पीय अधिवेशनात प्रश्न उपस्थित केला होता. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 

पिंपरी-चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

पुणे-मुंबई हा महामार्ग सहापदरी करण्याचे काम सुरू असून, तो वाकड ते रावेत-किवळे दरम्यान पिंपरी-चिंचवड शहराच्या हद्दीतून जातो. या हद्दीत मार्गाची प्रचंड दुरवस्था झाली आहे. महामार्गाच्या दोन्ही बाजूला, तसेच दुभाजकांमध्ये कोणत्याही प्रकारचे सुशोभीकरण केलेले नाही. सेवा रस्ते चांगल्या दर्जाचे नसल्यामुळे आसपासच्या परिसरातील वाहनचालकांना त्याचा त्रास होतो. याची दखल घेऊन जगताप यांनी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे अधिकारी आणि संबंधित ठेकेदारांच्या प्रतिनिधींची मध्यंतरी बैठक घेतली होती. याशिवाय जागेवर जाऊन दुरवस्था दाखविली होती. त्यावेळी अधिकारी आणि ठेकेदाराच्या प्रतिनिधींना दुरुस्तीविषयी सुनावले होते. तसेच, हा प्रश्न अधिवेशनात उपस्थित केला होता. याची दखल घेत सार्वजनिक बांधकाम विभागाने संबंधित ठेकेदाराला रावेत ते बालेवाडीदरम्यान दुभाजक बसविण्याचे आदेश दिले आहेत. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

सवलत करारानुसार या महामार्गावर आवश्‍यक तेथे कॅट आईज, थर्मोप्लॅस्टिक पेंट आणि रिफ्लेक्‍टर्स बसवावे, खराब होणाऱ्या सर्व्हिस रस्त्यांचे नियमित देखभाल दुरुस्ती कामांतर्गत दुरुस्ती करावी, खड्ड्यांची व नियमित देखभाल दुरुस्तीची कामे वेळीच करावेत. दुभाजकांमध्ये वृक्षारोपण केलेल्या झाडांची वाढ झाली नसल्यास किंवा झाडांचे नुकसान झाले असल्यास तेथील झाडे बदलण्याचे काम तातडीने पूर्ण करण्याचे आदेशही संबंधित ठेकेदाराला दिले आहेत.