भातकापणी करताना बळीराजाची परवड; परतीच्या पावसाचे पाणी साचल्याने करावी लागतेय मोठी कसरत

दिनेश टाकवे
Tuesday, 3 November 2020

नाणे मावळात भातकापनीला वेग आला असून आता गावांगावातील सर्व लहान मोठी मंडळी शेतातील चिखलात भातकापनीची लगबग सुरु आहे. कधी ही पाऊस पडू शकतो. या पावसाच्या भितीपोटी शेतकरी लगेचच झोडपनी करत आहे.

करंजगाव : तांदळाचे माहेरघर असलेल्या मावळात अवकाळी पावसाने शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान केले आहे. हाता-तोंडाशी आलेले भातपीकाचे नुकसान झाले आहे. शेतात पाणी असले तरी भातकापनीला सुरवात केली असून भाताची कडपे शेतातून बाहेर काढण्यासाठी शेतक-याला मोठी कसरत करावी लागत आहे. शेतात पाणी साचल्याने मोठी परवड झाली आहे.

नाणे मावळात भातकापनीला वेग आला असून आता गावांगावातील सर्व लहान मोठी मंडळी शेतातील चिखलात भातकापनीची लगबग सुरु आहे. कधी ही पाऊस पडू शकतो. या पावसाच्या भितीपोटी शेतकरी लगेचच झोडपनी करत आहे.

काही दिवसापूर्वी झालेल्या पावसामुळे अनेक शेतक-यांचे तयार झालेले भातपिक शेतात आडवे झाले. यामुळे शेतक-यांना मोठ्या समस्येचा सामना करावा लागत आहे. अजूनही अनेक शेतात पाणी साचले असल्याने शेतक-यांना मोठी कसरत करावी लागत असून शेतातून भात कापल्यानंतर शेतात भातपिक  ठेवता येत नसल्याने दोन माणसांना शिडी अथवा दोन बांबूच्या साह्याने शेता बाहेर काढून वाळवावे लागत आहे. त्यातच मजूरांचा तुटवडा अशा अनेक समस्यांमुळे बळीराजा हैराण झाला आहे.

गोवित्रीचे प्रवीण शेडगे, शेखर शिंदे म्हणाले, पावसाचा काही भरवसा नाही. मजूर मिळो ना मिळो घरातील सदस्यांच्या मदतीने लवकरात लवकर भातकापनी व झोडपनी करुन भातपिक घरात घेऊन जाणे हे आमचे लक्ष आहे.

कांबरे येथील शेतकरी रामदास गायकवाड म्हणाले, परतीच्या पावसाचे पाणी भातखाचरात साचले असल्याने चिखलात भात कापणी करावी लागत आहे. जर हे कष्ट घेतले नाही तर वर्षभर खाण्यासाठीचेही भात हाती लागणार नाही.

भाताने बुडवले पण कांद्याने वाचवले

नाणे येथील तानाजी आंद्रे या शेतकऱ्याचे दरवर्षीच्या प्रमाणात चाळीस पोत्यांचे नुकसान झाले. मात्र साठवून ठेवलेल्या कांद्याला नव्वद रुपये भाव मिळाल्याने त्यांचे आर्थिक स्थैर्य मिळाले. भाताने बुडवले पण कांद्याने वाचवले अशी भावना त्यांनी व्यक्त केली.

काही ठिकाणी भात कापणी रखडली

कापणीयोग्य भात होऊनही शेतात पाणी असल्याने अनेक शेतकऱ्यांचे कापणीचे काम रखडले आहे. पावसाच्या अनियमिततेमुळे एकाच वेळी सर्व शेतकऱ्यांचे पीक कापणीला आले आहे. त्यामुळे मजुरांची टंचाई निर्माण झाली आहे. हार्वेस्टरच्या मदतीने काम करावे तर शेतात पाणी आहे, अशा दुहेरी संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांची भातकापणी रखडली आहे. पाण्याने भाताचा चोथा कुजल्याने पावळीचे उत्पादन कमी होऊन वैरण महाग होईल, अशी भीती नामदेव खोंडे यांनी व्यक्त केली.
 
संपादन - सुस्मिता वडतिले


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Paddy cultivation has gained momentum in Naane Mawla and now paddy cultivation is almost started