Pavana Dam : पवना धरण @ ९७.७३; अद्यापही दमदार पावसाची प्रतीक्षाच

पुढील वर्षी जुलैअखेरपर्यंत शहराची तहान भागवेल इतका पाणीसाठा पवना धरणात असला, तरी अद्याप ते शंभर टक्के भरलेले नाही.
Pavana Dam
Pavana DamSakal

पिंपरी - पुढील वर्षी जुलैअखेरपर्यंत शहराची तहान भागवेल इतका पाणीसाठा पवना धरणात असला, तरी अद्याप ते शंभर टक्के भरलेले नाही. पावसाचा जोर ओसरला आहे. वीजनिर्मिती केंद्रातून विसर्ग सुरू आहे. ऑगस्टचे तीन आठवडे संपले आहेत.

अधिक पावसाची अपेक्षा असलेली नक्षत्रे संपत आली आहेत. शेतातील पिके करपू लागली आहेत. पावसाने अशीच दडी मारल्यास पिकांवर रोगराई पडण्याची भीती व्यक्त केली जात आहे. सद्यःस्थितीचा विचार करता, शहरासह पवन मावळ आणि लगतच्या परिसरातील शेतीसाठी दमदार पावसाची आवश्यकता आहे.

मावळ तालुक्यातील पवना धरणातून शहरासाठी पाणीपुरवठा केला जातो. त्यासाठी वीजनिर्मिती केंद्रातून विसर्ग केला जातो. धरण शंभर टक्के भरण्याची परिस्थिती पाहून, सांडव्यातून पाणी सोडले जाते. शिवाय, धरणाखालील क्षेत्रात व कासारसाई धरण क्षेत्रात झालेल्या पावसाचे पाणीही पवना नदीतून शहरापर्यंत पोचते.

रावेत येथील बंधाऱ्यातून दररोज ५१० दशलक्ष लिटर अशुद्ध जलउपसा केला जातो. त्यावर निगडी प्राधिकरणातील जलशुद्धीकरण केंद्रात प्रक्रिया करून वितरण केले जाते. शिवाय, ‘एमआयडीसी’कडून ३० व आंद्रा धरणातून ५० दशलक्ष लिटर पाणी प्रतिदिन महापालिका घेत असते.

यंदा पावसाला सुमारे २० दिवस उशिरा सुरवात झाली. त्यामुळे पेरण्या उशिरा झाल्या. शिवाय, पावसाने अधून-मधून दडीही मारली. त्याचा परिणाम शेती व शहराच्या पाणीपुरवठा नियोजनावर होत असतो. सध्या अशीच परिस्थिती निर्माण झाल्याचे चित्र आहे.

दृष्टिक्षेपात धरणे

गेल्या वर्षी २० ऑगस्टपर्यंत धरण शंभर टक्के भरले होते. ६१३.२६ मीटर पाणीपातळी व २४०.९७ घनमीटर जिवंत साठा होता. रविवारी (ता. २०) सकाळी आठपर्यंत २३५.५४ घनमीटर अर्थात ६१३ मीटर पाणी पातळी होती. धरणातील पाणीसाठा अवघा ९७.७३ टक्के आहे. वीजनिर्मिती केंद्रातून विसर्ग सुरू आहे.

पवना नदीला भेटणाऱ्या कासारसाई नदीवरील कासारसाई धरणही अवघे ९४.७७ टक्के भरले आहे. मुळशी धरण केवळ ८७.३४ टक्के भरले असून सध्याचा पावसाचा जोर पाहता ते शंभर टक्के भरेल की नाही, अशी शंका उपस्थित केली जात आहे.

हवामानाचा अंदाज

येत्या २५ ऑगस्टपर्यंत पिंपरी-चिंचवडसह परिसरातील हवामान सामान्यतः ढगाळ किंवा पूर्णतः ढगाळ राहण्याची आणि पावसाचा शिडकावा पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. काही ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे.

सोमवारी व मंगळवारी शहर परिसरात कमाल तापमान ३० व किमान तापमान २३ अंश सेल्सिअस राहण्याची शक्यता आहे. त्यानंतरच्या तीन दिवसांत अर्थात २३ ते २५ ऑगस्ट दरम्यान तापमानात काही अंशी घट होण्याची शक्यताही वर्तविण्यात आली आहे.

या वर्षी पावसाला उशिरा सुरुवात झाली. आतापर्यंत तुलनेने कमी पाऊस झाला आहे. सध्याचा पाऊस तात्पुरता फायद्याचा आहे. पावसाचा जोर न वाढल्यास पिकांवर रोग पडू शकतो. सुकलेला चारा संपत आला आहे. हिरवी वैरण अद्याप तयार झालेली नाही. त्यामुळे जनावरांच्याही चारा-पाण्याचा प्रश्न आहे. एकंदरीत शेतीचा व शहराच्या पाणीपुरवठ्याचा विचार करता, दमदार पावसाची आवश्यकता आहे.

- चंद्रकांत दहिभाते, प्रगतिशील शेतकरी, बेडसे (मावळ)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com