पवना धरणाच्या पाणीसाठ्यात वाढ कायम; आजचा साठा जाणून घ्या  

भरत काळे
Sunday, 16 August 2020

मावळ तालुक्‍यात गेल्या दहा दिवसांपासून पावसाची संततधार सुरू आहे. त्यामुळे पवना धरणाच्या पाणीसाठ्यात चांगलीच वाढ झाली आहे. 

पवनानगर (ता. मावळ) : मावळ तालुक्‍यात गेल्या दहा दिवसांपासून पावसाची संततधार सुरू आहे. त्यामुळे पवना धरणाच्या पाणीसाठ्यात चांगलीच वाढ झाली आहे. 

मावळ तालुक्यासह पिपंरी-चिंचवड शहाराला पाणीपुरवठा करणारे पवना धरण ७० टक्के भरले आहे. यामुळे मावळसह पिंपरी-चिचंवडकरांची वर्षाभरासाठी पिण्याच्या पाण्याची चिंती मिटली आहे. गेल्या आठवड्यापासून धरण क्षेत्रात जोरदार पाऊस सुरू असल्याने धरणाच्या पाणीसाठ्यात गतीने वाढ होत आहे. जून, जुलैमध्ये पावसाने दडी मारल्याने धरणाची पाणी पातळी कमी झाली होती. मात्र, सध्या सुरू असलेल्या संततधार पावसामुळे पवना धरणाच्या पाणीसाठ्यात चांगलीच वाढ झाली आहे.

पिंपरी-चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

मावळात सुमारे दीड महिना पावसाने दडी मारली होती. जुलै महिना कोरडा गेला होता. मात्र, सध्या सुरू असलेल्या संततधार पावसामुळे पवना धरण ७० टक्के भरले आहे. आज (रविवारी) सायंकाळी सहा वाजेपर्यंत पवना धरण ७०.१६ टक्के भरले आहे, तर १२ तासांत धरण परिसरात ६५ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. परिसरात आतापर्यंत ११५० मिलिमीटर एवढा एकूण पाऊस झाला आहे. मागील वर्षी आजच्या दिवशी धरणात ९७.७३ टक्के पाणीसाठा होता. दरम्यान, पवना धरण परिसरात समाधानकारक पाऊस झाल्याने भातासह सर्वच पिकांना जीवदान मिळाले आहे. तसेच, ओढे, नाले, ओहळा दुथडी भरून वाहू लागल्या आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांमध्येही आनंदाचे वातावरण आहे.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: pavna dam filled 70 percent due to continuous rain