हलाखीच्या परिस्थितीवर मात करत प्रणकेतने मिळवले 91 टक्के 

मिलिंद संधान
गुरुवार, 30 जुलै 2020

प्रतिकूल परिस्थितीतही पिंपळे गुरवच्या प्रणकेत विनोद कांबळे याने दहावीच्या परिक्षेत 91.40 टक्के गुण मिळविले.

नवी सांगवी (पिंपरी-चिंचवड) : आई चार घरची धुणी भांडी करते. वडील गावाकडे मोलमजुरी करतात. त्यामुळे रोजच्याच भाकरीची चिंता सतावत असतानाही प्रतिकूल परिस्थितीतही पिंपळे गुरवच्या प्रणकेत विनोद कांबळे याने दहावीच्या परिक्षेत 91.40 टक्के गुण मिळविले. त्यामुळे त्याने आपल्या आईच्या कष्टाचे पांग फेडले असेच म्हणावे लागेल. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 

प्रणकेत लक्ष्मीनगरमध्ये आपल्या आईसह मामांकडे राहतो. त्याचे वडील फलटण तालुक्यातील लिंबोरे येथे मोलमजुरी करतात. त्यामुळे नशिबी गरीबी, तरी न समजणाऱ्या वयातही प्रणकेतने आपला आत्मविश्वास थोडा सुद्धा ढळू दिला नाही. त्याचे मामा कमलाकर धिवार यांच्याकडे तो आई आणि मोठ्या बहिणीसह आठव्या वर्षीच राहायला आला. मामांचीही आर्थिक परिस्थिती बेताचीच, दोन खोल्यांच्या भाड्याच्या  घरात नऊ माणसे राहत होती. त्यामुळे प्रणकेतला ना अभ्यासाठी स्वतंत्र खोली ना कोणती टेबल वा खुर्ची.

पिंपरी-चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

परंतु, परिस्थिती वा माणसावर आलेली वेळ हीच त्याची चांगली गुरू असते, असे म्हणतात. प्रणकेतच्या बाबतीतही तसेच, काही घडले. पिंपळे गुरव येथील महापालिकेच्या शाळेत त्याने प्रवेश घेतला. तेव्हापासूनच आपल्या आईची घालमेल आणि मामा-मामीची आर्थिक कुंचबणा त्याने पाहिली होती. त्यामुळे कोणतीही ट्युशन नाही ना कसला खासगी क्लास. आपल्या शाळेतीलच शिक्षकांच्या सहकार्याने प्रणकेतने आज दहावीत चांगले गुण संपादित करून महापालिकेची एक लाख रुपयांच्या शिष्यवृत्तीचा मानकरी ठरला आहे. त्याच्या या यशाबद्दल शाळेतील शिक्षकांबरोबर पिंपळे गुरव परिसरातूनही त्याचे कौतुक होत आहे. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

लहानपणापासून प्रणकेत माझ्याकडेच होता. त्यामुळे न जाणत्या वयातच त्याला त्याच्या परिस्थितीचे भान होते. त्यामुळे अभ्यास वा इतर शिस्तिच्या बाबतीत त्याला सांगण्याची मला कधी वेळ आलीच नाही. लहान मुले खेळणी वा नवीन कपड्यांचा हट्ट धरतात. परंतु, याने मला कधीच त्रास दिला नसल्याचे त्याचे मामा कमलाकर यांनी सांगितले.
  
प्रणकेत म्हणाला, "मी दररोज सकाळी सहा वाजता अभ्यासाला बसायचो. दहा वाजेपर्यंत मी घरचा अभ्यास व लिखाण काम करीत होतो. त्यानंतर साडेदहा वाजता शाळेतील ज्यादा तास व बारा ते साडेपाचपर्यंत शाळेत जायचो. मी कोणताही खासगी क्लास लावला नव्हता किंबहुना त्याची फी भरण्याची माझी ऐपतही नव्हती. माझे मुख्याध्यापक शिक्षक पांडुरंग मुदगुन, दत्तात्रेय जगताप, कविता चव्हाण यांच्याबरोबर सर्व शिक्षकांनी मला वैयक्तिक मार्गदर्शन केले."
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Pimple Gurav's Pranaket Kamble scored 91.40 per cent in 10th exam