जांबेत पैशांच्या कारणावरून लेबर कॉन्ट्रॅक्‍टरचा खून

मंगेश पाडे
Saturday, 28 November 2020

पैशांच्या कारणावरून एका लेबर कॉन्ट्रॅक्‍टरने दुसऱ्या लेबर कॉन्ट्रॅक्‍टरचा खून केल्याची घटना जांबे येथे घडली. खुनानंतर आरोपी पसार झाला. 

पिंपरी : पैशांच्या कारणावरून एका लेबर कॉन्ट्रॅक्‍टरने दुसऱ्या लेबर कॉन्ट्रॅक्‍टरचा खून केल्याची घटना जांबे येथे घडली. खुनानंतर आरोपी पसार झाला. गणपत सदाशिव सांगळे (वय 24, रा.कळस, ता.इंदापूर, पुणे) असे खून झालेल्या लेबर कॉन्ट्रॅक्‍टरचे नाव आहे.

याप्रकरणी सुरेश निवृत्ती मोहिते (रा.मु.पो.जांबे, मुळशी) यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार अरविंद यादव याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मृत सांगळे व आरोपी यादव हे दोघेही लेबर कॉन्ट्रॅक्‍टर होते. ते फिर्यादीच्या भाड्याच्या खोलीत एकत्र राहत होते. दरम्यान, आरोपीने पैशाच्या कारणावरून सांगळे यांच्या डोक्‍यात कठीण वस्तूने मारहाण केली.

यामध्ये ते गंभीर जखमी झाल्याने त्यांचा मृत्यू झाला. त्यानंतर सांगळे यांना घरात कोंडून बाहेरून दरवाजा बंद करून आरोपी पसार झाला. खोलीतून वास येऊ लागल्याने दरवाजा उघडून आत पाहिले असता शुक्रवारी (ता.27) सकाळी साडेसातच्या सुमारास उघडकीस आली. याप्रकरणी हिंजवडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल असून आरोपीच्या शोधासाठी पोलिसांची पथके रवाना झाली आहेत. हिंजवडी पोलिस अधिक तपास करीत आहेत. 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: In Pimpri a labor contractor murdered another labor contractor for money