पिंपरी : फ्लेक्समधून वर्षांत १२.५८ कोटी वसूल

पिंपरी शहरातील प्रत्येक रस्त्यावर, चौकात होर्डिंग्ज, फ्लेक्स लावलेले आहेत. अधिकृतपेक्षा अनधिकृतची संख्या अधिक आहे.
flex
flexsakal
Summary

पिंपरी शहरातील प्रत्येक रस्त्यावर, चौकात होर्डिंग्ज, फ्लेक्स लावलेले आहेत. अधिकृतपेक्षा अनधिकृतची संख्या अधिक आहे.

पिंपरी - शहरातील प्रत्येक रस्त्यावर, चौकात होर्डिंग्ज, (Hordings) फ्लेक्स (Flex) लावलेले आहेत. अधिकृतपेक्षा अनधिकृतची संख्या अधिक आहे. शहराचे विद्रूपीकरण करून अनेक जण कोट्यवधींची कमाई (Income) करीत आहेत. महापालिकेचा (Municipal) कोट्यवधींचा महसूल (Revenue) बुडत आहे. या वर्षी काही प्रमाणात दिलासा मिळाला असून, आकाशचिन्ह परवाना विभागाने तब्बल १२ कोटी ५८ लाखांचा महसूल वसूल केला आहे. कोणताही नवीन परवाना न देता जुन्या परवानाधारकांकडील थकबाकी व दंडाची रक्कम वसूल केली आहे. गेल्या दहा वर्षांतील हा उच्चांकी आकडा असून, आजपर्यंतच्या महसूल बुडीस जबाबदार कोण? असा प्रश्न उपस्थित होत आहे.

शहराच्या वेगवेगळ्या भागात होर्डिंग्ज उभारून जाहिराती केल्या जातात, असे होर्डिंग्ज महापालिका स्वतःच्या जागेत उभारून व खासगी जागा मालकांना परवानगी देते. त्यासाठी आकाशचिन्ह परवाना विभाग कार्यरत असून, महापालिकेच्या उत्पन्नाचे एक साधन आहे. शुल्क आकारून होर्डिंग्ज उभारण्याची परवानगी दिली जाते. काही जाहिरातदार व खासगी जागा मालक एका होर्डिंग्जच्या परवान्यावर अनेक होर्डिंग्ज उभारून कमाई करतात. यामुळे शहराचे विद्रुपीकरण होऊन महापालिकेचा महसूल बुडविला जातो. काही जण परवाना घेऊन शुल्क भरत नव्हते. जागेचे भाडे देत नव्हते. त्यामुळेसुद्धा महसूल बुडतो. या वर्षी महापालिका आयुक्त राजेश पाटील आणि परवाना विभागाचे सहायक आयुक्त नीलेश देशमुख यांनी कारवाई करून अनधिकृत फ्लेक्स, होर्डिंग्ज लावणाऱ्यांकडून दंड वसूल केला. थकबाकी वसूल केली. त्यामुळे एक एप्रिल २०२१ पासून २९ मार्च २०२२ पर्यंत सुमारे ११ कोटी रुपये महसूल मिळाला आहे. गेल्या दहा वर्षातील हा उच्चांकी आकडा आहे. या दहा वर्षांचा विचार केल्यास सर्वांत कमी तीन कोटी ८० लाख रुपये महसूल २०१७-१८ मध्ये वसूल झाला होता. त्यापूर्वी २०१६-१७ मध्ये आठ कोटी नऊ लाख रुपये उत्पन्न मिळाले होते. हे वर्षे वगळता २०११-१२ पासून २०२०-२१ पर्यंत सात कोटी रुपयांपेक्षा कमी उत्पन्न मिळाले आहे. या वर्षा नवीन परवाने न देता तब्बल अकरा कोटी रुपये उत्पन्न मिळाले आहे. त्यामुळे आतापर्यंत बुडालेल्या महसुलास किंवा न मिळालेल्या उत्पन्नास जबाबदार कोण? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

परवाना शुल्क आकारणी

होर्डिंग्ज उभारण्यासाठी प्रतिवर्षी १२१ रुपये प्रतिचौरस फुटानुसार परवाना शुल्क व त्यासोबत रोड प्रिमियम शुल्क आकारले जाते. नगररचना विभागाने ठरवून दिलेल्या दरानुसार जागेचे भाडे आकारले जाते. महापालिका निविदा प्रक्रिया राबवून जागा भाडे व परवाना शुल्क ठरवते. खासगी जागांबाबत अर्ज प्रक्रिया राबवून परवाना दिला जातो. मात्र, अनेक जण परवानगी न घेता खासगी जागांवर होर्डिंग्ज उभारून कमाई करत आहेत.

उदाहरणार्थ...

२० बाय ४० फूट लांबी-रुंदीचे अर्थात ८०० चौरस फुटाचे होर्डिंग आहे. महापालिकेच्या धोरणानुसार, १२१ रुपये प्रतिचौरस फूट वार्षिक परवाना शुल्क आकारले जाते. म्हणजेच ९६ हजार ८०० रुपये परवाना शुल्क व रोड प्रिमियम असे सुमारे एक लाख रुपये शुल्क भरावे लागेल.

होर्डिंग, फ्लेक्स कारवाईची पद्धत

अनधिकृत होर्डिंग, फ्लेक्स, बॅनर व किऑस्क जाहिरात फलकांवर महापालिकेतर्फे दोन प्रकारे कारवाई केली जाते. आकाशचिन्ह परवाना विभाग अनधित होर्डिंग शोधून किंवा त्याबाबत तक्रार आल्यानंतर कारवाई करते. फ्लेक्स, बॅनर वा विजेच्या खांबांवर लावलेल्या किऑस्क फलकांवर क्षेत्रीय कार्यालयांनुसार कारवाई केली जाते. अनधिकृत होर्डिंग, फ्लेक्स काढण्याचे काम आठ ठेकेदारांना दिले आहे. मुख्यालयाने गेल्या वर्षभरात १२१ होर्डिंग्ज काढले आहेत. त्यात चिखली, मोशी परिसरात एका माजी महापौराने सरकारी जागेत उभारलेल्या तीन होर्डिंग्जचा समावेश आहे. ई क्षेत्रीय कार्यालयाने गेल्या महिन्यात किऑस्क काढलेले होते. त्या खांबांवर आता पुन्हा किऑस्क लावलेले दिसत आहेत.

किऑस्क काय? काढणार कोण?

विजेच्या खांबांवर लावलेले दोन बाय तीन फूट लांबी, रुंदीच्या जाहिरात फलकांना किऑस्क म्हटले जाते. आगामी निवडणुकीमुळे किऑक्स वाढण्याची शक्यता असल्याने आगामी चार महिने अर्थात जुलै अखेरपर्यंत कारवाई सुरू ठेवण्याचे नियोजन आहे. त्यासाठी प्रतिमहिना दीड लाख रुपयांप्रमाणे सहा लाख रुपये खर्च अपेक्षित आहे. त्यामुळे आजपर्यंत झालेला दहा लाख नऊ हजार ११४ रुपये खर्च आणि आगामी काळात होणारा सहा लाख रुपये खर्चास स्थायी समिती सभेने मंजुरी दिली आहे. एका खांबावर किमान चार किऑस्क लावले असल्याचे चित्र डुडुळगाव ते मोशी रस्त्यावर बघायला मिळाले. मोशीपासून चिखलीपर्यंतच्या दुभाजकांवरील खांबांवरही हेच चित्र आहे.

गेल्या वर्षी किऑस्कवरील कारवाई

अंदाजे किऑस्क - २८,८००

अंदाजित खर्च - १०,०९,११४

झालेला खर्च - ५,३३,०४०

ठेकेदारांना बाकी बिले - ४,७६,०७४

असा बुडतो महसूल

महापालिकेने स्वतःच्या जागेवर ६२ होर्डिंग्ज उभारले आहेत. खासगी जागांवर एक हजार २२१ होर्डिंग्जला परवानगी दिली आहे. त्यातून दरवर्षी अनुक्रमे ६८ लाख आणि पाच कोटी रुपये उत्पन्न अपेक्षित असते. शहरात चारशेपेक्षा अधिक होर्डिंग्ज अनधिकृत असावेत, असा अंदाज आहे. एका परवान्यावर एकापेक्षा अधिक किंवा एका सांगाड्यावर एकापेक्षा अधिक होर्डिंग्ज लावूनही महापालिकेची फसवणूक केली जात आहे.

होर्डिंग्ज, फ्लेक्सच्या माध्यमातून मिळालेला महसूल (कोटी रुपयांत)

२०११-१२ ३.९३

२०१२-१३ ५.१५

२०१३-१४ ५.४१

२०१४-१५ ५.९४

२०१५-१६ ६.६३

२०१६-१७ ८.०९

२०१७-१८ ३.८०

२०१८-१९ ३.९८

२०१९-२० ६.१२

२०२०-२१ ४.२१

२०२१-२२ १२.५८

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com