esakal | Pimpri: फायनान्स कंपन्यांच्या विरोधात रिक्षाचालकांचे निदर्शने
sakal

बोलून बातमी शोधा

रिक्षाचालकांचे  निदर्शने

पिंपरीत फायनान्स कंपन्यांच्या विरोधात रिक्षाचालकांचे निदर्शने

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

पिंपरी : पुणे व पिंपरी चिंचवड पोलिस आयुक्तालयाच्या हद्दीमध्ये फायनान्स कंपन्यांच्या विरोधात मागील एका वर्षामध्ये एकही गुन्हा दाखल केला नाही. तसेच रिक्षाचालकांच्या इतर प्रश्‍नांसाठी बघतोय रिक्षावाला संघटनेकडून पिंपरी चौकात निदर्शने आज (ता.५) करण्यात आली.

संघटनेचे अध्यक्ष डॉ. केशव क्षीरसागर यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात फोरमचे उपाध्यक्ष श्रीकांत चव्हाण, सचिन वैराट, आशिष ओपलकर, संतोष नेवासकर, श्रीकांत पवार , रमेश तोरडमल, रवी ठाकूर, शरद पवार, विकास वाघमारे, खालिद शेख, दीपक अहिरे, शंकर कुलवडे , बाळासाहेब जाधव, महेश लंकेश्‍वर आदींनी सहभाग घेतला.

अध्यक्ष डॉ. क्षीरसागर म्हणाले, ‘‘कोरोना लॉकडाउन लागल्यापासून अर्थचक्र जवळपास पूर्णपणे कोलमडले आहे. त्यामुळे गोरगरीब कष्टकरी व लघुउद्योजक यांना त्यांनी घेतलेल्या कर्जाचे हप्ते फेडणे अशक्य झाले आहे. जेव्हा अशाप्रकारचे प्रश्‍न उद्भवतात, तेव्हा त्यासाठी न्यायव्यवस्थेद्वारे त्या प्रश्‍नांचे निवारण करण्यासाठी यंत्रणा उपलब्ध आहे. फायनान्स कंपन्या आरबीआय व सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश पायदळी तुडवून बेकायदेशीरपणे गुंडागर्दी करून गोरगरीब कष्टकऱ्यांकडून पैसे वसुल करत आहेत. येत्या आठवड्यामध्ये या बाबींकडे लक्ष घालून सरकारने रिक्षाचालकांच्या समस्या सोडवल्या नाहीत तर बघतोय रिक्षावाला फोरम कडून आमरण उपोषण छेडण्यात येईल.’’

उपाध्यक्ष चव्हाण म्हणाले, ‘‘गेल्या चार वर्षांमध्ये रिक्षाचालकांच्या अनेक मागण्या प्रलंबित आहेत. केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्रालयाचे ३० ऑक्टोबर पर्यंत कारवाई न करण्याचे निर्देश असताना सुद्धा कागदपत्रांच्या कमतरतेसाठी आरटीओ व पोलिस यांच्याकडून रिक्षाचालकांना वेठीस धरून त्यांच्याकडून अव्वाच्या सव्वा दंड वसूल करण्याचे सत्र चालू आहे.’’

loading image
go to top