esakal | पिंपरी-चिंचवड : बोधवाक्य सूचवा आणि दहा हजार रुपये बक्षीस मिळवा
sakal

बोलून बातमी शोधा

 पिंपरी-चिंचवड

पिंपरी-चिंचवड : बोधवाक्य सूचवा आणि दहा हजार रुपये बक्षीस मिळवा

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

पिंपरी : पिंपरी-चिंचवड शहर संपूर्ण देशामध्ये उद्योगनगरी म्हणून प्रसिद्ध आहे. मागील दोन दशकांमध्ये माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील कंपन्यांचे शहरात आगमन झाले आणि आपल्या शहराला आंतरराष्ट्रीय स्तरावर आयटी हब म्हणून ओळख मिळाली. या पार्श्‍वभूमीवर बदलत्या काळानुसार पिंपरी-चिंचवड शहराची ओळख करून देणारे बोधवाक्य तयार करण्याच्या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आले आहे, अशी माहिती महापौर उषा ढोरे आणि महापालिका आयुक्त राजेश पाटील यांनी दिली.

पिंपरी-चिंचवड शहराचा समृद्ध ऐतिहासिक वारसा, औद्योगिक प्रगती, देशातील सर्वाधिक वेगाने विकसित होणारे महानगर, भारतातील सर्वोत्कृष्ट राहण्यास योग्य शहर, देशातील सर्वांत स्वच्छ आणि सुंदर शहर, पर्यावरणस्नेही शहर अशा विविध विषयांचा विचार करून नागरिकांनी बोधवाक्य तयार करणे अपेक्षित आहे. बोधवाक्य छोटे, आकर्षक आणि नाविन्यपूर्ण असावे. बोधवाक्य सहा शब्दांपेक्षा जास्त मोठे असू नये. तसेच त्यामध्ये यमक असावे. बोधवाक्य मराठी, इंग्रजी किंवा दोन्ही भाषांमध्ये सादर करण्याचा पर्याय उपलब्ध आहे. त्यामध्ये शहराचे योग्य प्रकारे वर्णन असावे.

हेही वाचा: वैद्यकीय क्षेत्रात 5000 पदांसाठी बंपर भरती

सदर बोधवाक्य स्वत:ची निर्मिती असावी. निवड झालेल्या बोधवाक्याचा वापर होर्डिंग्ज, जाहिराती, जिंगल्स, पत्रके, बॅनर्स यांमध्ये करण्यात येईल. नागरिकांकडून सादर झालेल्या बोधवाक्याचे परीक्षक मंडळाकडून मूल्यमापन करण्यात येईल. बोधवाक्य स्पर्धेच्या विजेत्या स्पर्धकाला महापालिकेच्या वतीने दहा हजार रुपयांचे पारितोषिक देण्यात येणार आहे.

इच्छुक नागरिकांना पीसीएमसी स्मार्ट सारथी मोबाईल अॅपच्या माध्यमातून या स्पर्धेमध्ये सहभागी होता येईल. त्यासाठी पीसीएमसी स्मार्ट सारथी मोबाईल अॅपमध्ये ‘FEEDS>SURVES/POLLS> येथे जाऊन पिंपरी चिंचवड बोधवाक्य स्पर्धा’ येथे क्लिक करून बोधवाक्य सादर करता येईल. जास्तीत जास्त नागरिकांनी या स्पर्धेत सहभागी व्हावे असे आवाहन महापौर ढोरे आणि आयुक्त पाटील यांनी केले आहे.

loading image
go to top