महिला दिन: आगीविरुद्ध लढणाऱ्या बारा रणरागिणी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

महिला दिन

महिला दिन: आगीविरुद्ध लढणाऱ्या बारा रणरागिणी

पिंपरी : अग्नी चुलीतील असो, स्टोव्हचा असो की गॅस शेगडीचा. त्याच्याशी प्रत्येक महिलेचा स्वयंपाक करताना संपर्क येतो. पण, हाच अग्नी रौद्ररूप धारण करतो, अग्नितांडव माजवतो, वणवा पेटवतो तेव्हा अनेकांची पाचावर धारण बसते. भलेभले आगीपासून लांब पळण्याचा प्रयत्न करतात. पण, अशा आगीविरुद्ध लढून सर्वसामान्यांचे जीवन वाचविणाऱ्या बारा रणरागिणी पिंपरी-चिंचवड महापालिका अग्निशमन दलात शिकाऊ उमेदवार म्हणून वर्षभरापासून कार्यरत आहेत. त्यांनी केवळ आगीच शमविल्या नसून, नदीत पडलेल्याला बाहेरही काढले आहे. घरात अडकलेले बाळ व झाडावर अडकलेल्या पक्षाचीही सुटका केली आहे. विषारी साप पकडण्याचे धारिष्ट्यही त्यांच्यात आहे.

अग्निशमन विभाग म्हणजे पुरुषांची मक्तेदारी. पण, त्याला छेद देत महाराष्ट्रातील अनेक युवतींनी हे क्षेत्र निवडले आहे. महाराष्ट्र अग्निशमन सेवा संचालनालय संचलित मुंबई सांताक्रूज येथील महाराष्ट्र राज्य अग्निशामन अकादमीत त्यांनी प्रवेश घेतला. अग्निशामक (फायरमन) आणि उपअधिकारी व अग्निप्रतिबंधक अधिकारी पदाचा (सबऑफिसर व फायर प्रिव्हेंशन ऑफिसर) कोर्स केला. त्यातील बारा जणी शिकाऊ उमेदवार म्हणून पिंपरी-चिंचवड अग्निशामक दलात दाखल आहेत.

त्यांच्यात एक अधिकारी असून, सकाळी सात ते दुपारी तीन आणि दुपारी तीन ते रात्री दहा अशा दोन सत्रात त्या कार्यरत असतात. महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या भागातील त्या मूळ रहिवासी आहेत. त्यांत फायर ऑफिसर स्नेहल रायसिंग-सोनवणे चोपडा (जि. जळगाव), फायर फायटर दर्शना पाटील, सानिका सुर्वे (अलिबाग), पल्लवी जागले (पालघर), प्रियांका धरम व स्मिता गौरकर (नागपूर), धनश्री बागूल (धुळे), पायल नालट (अकोला) यांचा समावेश आहे. अन्य चार युवतींची नियुक्ती महापालिकेच्या नवीन भोसरी व नवीन जिजामाता रुग्णालयात आहे.

पती अभियंता

फायर ऑफिसर रायसिंग कुटुंबीयांसमवेत वाल्हेकरवाडीत राहतात. त्यांचे पती चंद्रशेखर सोनवणे खासगी कंपनीत अभियंता आहेत. त्यांना दहा वर्षांचा मुलगा आहे. आई-वडिलांसह पती व सासरच्यांचाही पाठिंबा मिळाल्यामुळे मी अग्निशामक दलात सेवा करत आहे. मुख्य अग्निशामक अधिकारी व अन्य सहकाऱ्यांचे मार्गदर्शन आम्हाला मिळत आहे, असे त्यांनी सांगितले.

फायर फायटर म्हणाल्या

‘माणसांसह वन्यजीव, प्राणी, संपत्ती यांना आगीपासून आम्ही वाचवतो. त्या वेळी त्यांच्या मालकांच्या चेहऱ्यावरील समाधानच आम्हाला आनंद देऊन जाते’, ‘चोवीस तास सतर्क राहावे लागते, असे हे काम आहे. असा वेळी आम्हीही जिवाची परवा करत नाही’, ‘समाजाची सेवा केल्याचे समाधान मिळते’, ‘आगीला घाबरून लोक बाहेर पडत असतात, तेव्हा आम्ही आगीकडे धाव घेत तिला शमवित असतो’, असे अग्निशामक दलातील युवतींनी सांगितले.

‘‘राज्यात केवळ मुंबई व पिंपरी-चिंचवड महापालिका अग्निशामक दलातच शिकाऊ महिला फायर फायटर आहेत. अन्य महापालिकांत नाहीत. राज्य सरकारच्या परवानगीने त्यांना एक वर्षाच्या प्रशिक्षणार्थी म्हणून घेतले आहे. त्यांच्या निवासाची व्यवस्था केली आहे. त्यांच्या पालकांची बैठक घेऊन कामाबाबत कल्पना दिली आहे. पहिल्या व दुसऱ्या सत्रातच त्यांना ड्यूटीवर बोलवले जाते. आग, पाणी व अन्य घटनांबाबत आलेल्या वर्दीनुसार व मॉकड्रीलसाठी त्यांना पाठवले जाते. त्यांना कराटे व सर्प पकडण्याचे प्रशिक्षणही दिले आहे.’’

- किरण गावडे, मुख्य अग्निशामक अधिकारी, महापालिका

कठीण प्रसंगात धीरोदात्त

- कुदळवाडीतील भंगाराच्या गोदामाला लागलेली आग रात्री अकरा ते पहाटे सहापर्यंत शमवली

- दापोडीतील मुळा नदीत पडलेला मृतदेह पाण्यातून बाहेर काढला

- कोविड काळात महापालिका रुग्णालयांच्या सुरक्षेसाठी अग्निशामक बंब ठेवले होते, तिथे नियुक्ती

- सध्या नवीन भोसरी व नवीन जिजामाता रुग्णालयाच्या आगीपासून संरक्षणासाठी चौघींची नियुक्ती

असा कोर्स असा कालावधी

अग्निशामक अर्थात फायरमन कोर्ससाठी दहावी उत्तीर्ण आणि उपअधिकारी व अग्निप्रतिबंधक अधिकारी पदासाठी कोणत्याही शाखेचा पदवीधर अशी शैक्षणिक पात्रता आहे. फायरमन कोर्स सहा महिन्यांचा आणि अधिकारी कोर्स एक वर्षाचा आहे. त्यासाठी प्रवेश

मिळण्यासाठी प्रवेश परीक्षा द्यावी लागते. कोर्स पूर्ण झाल्यावर एक वर्ष शिकाऊ उमेदवार म्हणून काम करावे लागते.

Web Title: Pimpri Chinchwad Corpoation Fire Department Twelve Womens

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :Pimprifire brigadewomens
go to top