कोरोनामुळे फटाकेविरहित दिवाळी करा; पिंपरी-चिंचवड महापालिका आयुक्तांचं आवाहन

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 12 November 2020

  • महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांचं नागरिकांना आवाहन

पिंपरी : ‘‘कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी दिवाळीत नागरिकांनी प्रतिबंधात्मक खबरदारी घेणे अत्यंत गरजेचे आहे. कोरोनाबाधित रुग्णांना फटाक्‍यांच्या धुराचा त्रास होऊ शकतो, ही बाब लक्षात घेऊन फटाक्‍यांचा वापर शक्‍यतो टाळावा,’’ असे आवाहन आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी शहरवासीयांना केले आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 

‘दिवाळीत कोरोनापासून बचावासाठी घ्यावयाची काळजी’ या विषयावर आयुक्तांनी नागरिकांशी फेसबुकद्वारे बुधवारी संवाद साधला. ते म्हणाले, ‘‘कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी प्रशासनाद्वारे सातत्याने प्रयत्न केले जात आहेत. सध्या कोरोना कमी होत असल्याचे आकडेवारीवरून दिसत आहे. त्याची संसर्गजन्यता अधिक असल्याने सर्वांनी काटेकोरपणे काळजी घेणे गरजेचे आहे. दिवाळीत नागरिकांनी कोरोनाविषयक मार्गदर्शक सूचनांचे पालन करणे बंधनकारक राहील. नियम भंग करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करण्याच्या सूचना सर्व सहायक आरोग्य अधिकारी, आरोग्य निरीक्षक आणि पोलिस प्रशासनाला दिल्या आहेत.’’ 

पिंपरी-चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

‘दिवाळी पहाट’सारखे कोणत्याही प्रकारचे सामुदायिक, सांस्कृतिक, सार्वजनिक, सामाजिक एकत्रीकरण कार्यक्रमांना परवानगी नसेल. असे कार्यक्रम ऑनलाइन पद्धतीने आयोजित करावेत. खरेदीसाठी बाहेर जाणे गरजेचे असल्यास योग्य ती खबरदारी घेऊन शक्‍यतो कमी गर्दीच्या वेळी आणि कमी गर्दीच्या ठिकाणी जाण्यास प्राधान्य द्यावे. शक्‍यतो फटाक्‍यांचा वापर टाळावा अथवा कमीत कमी करावा, लोकहितासाठी अधिक सजग राहून दिवाळीचा आनंद घ्यावा. उद्याने, मैदाने, पर्यटनस्थळे, शाळा आदी ठिकाणी फटाके फोडू नयेत. फटाक्‍यांचा वापर शक्‍यतो टाळावा किंवा कमी करावा किंवा ध्वनिप्रदूषण न होणारे, कमी आवाजाचे, कमी धूर होणाऱ्या फटाक्‍यांचा वापर करावा.

यामुळे होणार दंडात्मक कारवाई

  • कोरोनाच्या अनुषंगाने नियमभंग करणे
  • मास्क सुयोग्य प्रकारे परिधान न करणे
  • रस्ते व सार्वजनिक ठिकाणी थुंकणे
  • विनापरवानगी कार्यक्रम घेणे, गर्दी करणे

काय होऊ शकते?

  • बाधित रुग्णांना फटाक्‍यांच्या धुराचा त्रास
  • वायू व ध्वनिप्रदूषणाच्या पातळीत वाढ
  • प्रदूषणाचा प्राण्यांच्या आरोग्यावर दीर्घकाळ विपरीत परिणाम

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

हात स्वच्छ करण्यासाठी वापरले जाणारे सॅनिटायझर ज्वलनशील आहे. त्यामुळे दिवाळीत दिवे लावताना, फटाके फोडताना सॅनिटायझरचा वापर टाळावा. या काळात हात स्वच्छ करण्यासाठी साबण अथवा हँडवॉशचा नियमितपणे वापर करावा.
- श्रावण हर्डीकर, आयुक्त, महापालिका


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: pimpri chinchwad municipal commissioner says diwali celebrates without firecrackers to prevent corona infection