
पिंपरी : मृत्यू झालेले पाळीव प्राणी अर्थात कुत्रा (Dog) व मांजर (Cat) यांच्या दहनविधीसाठी मालकांकडून प्रतिप्राणी दोन हजार रुपये शुल्क आकारण्याचा प्रस्ताव आरोग्य विभागाने तयार केला आहे. दहन यंत्राची देखभाल-दुरुस्ती, इंधन व कर्मचाऱ्यांवरील खर्च वाढत असल्यामुळे शुल्क आकारणीचा प्रस्ताव बुधवारच्या (ता. २३) स्थायी समिती सभेसमोर ठेवण्यात आला आहे.
ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप
शहरातील मृत प्राण्यांची विल्हेवाट लावण्यासाठी महापालिकेने नेहरूनगर येथे २००७ पासून पाळीव प्राणी दफनभूमी उभारली आहे. गेल्या दोन वर्षांपासून प्राण्यांचे दहनही केले जात आहे. डिसेंबर २०१६ पासून मार्च २०२० पर्यंत एक हजार ३०९ प्राण्यांचे दहन करण्यात आले आहे. त्यासाठी सीएनजीचा वापर केला आहे. यासाठी दरमहा सरासरी १५ ते २० हजार रुपये खर्च येत आहे. सध्या पाळीव प्राण्यांचे मोफत दफन केले जात होते. भटक्या प्राण्यांची विल्हेवाट महापालिकेच्या आरोग्य विभागामार्फत क्षेत्रीय कार्यालय स्तरावर लावली जात आहे. मात्र, खर्च अधिक होत असल्याने पुणे महापालिकेप्रमाणे शुल्क आकारण्याचा प्रस्ताव प्रशासनाने ठेवला आहे. त्यानुसार महापालिका हद्दीतील कुत्रा व मांजर यासाठी दोन हजार रुपये व महापालिका हद्दीबाहेरील प्राण्यांसाठी तीन हजार रुपये शुल्क आकारण्याचा प्रस्ताव आहे. त्यासाठी प्राण्यांच्या मालकांना शहरातील रहिवासी असल्याचा पुरावा द्यावा लागणार आहे.
पिंपरी-चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा
कुत्रा, मांजर हे प्राणी कोणीही पाळू शकतो. त्यांचा मृत्यू झाल्यानंतर अनेक जण मोकळ्या जागेत किंवा सोयीच्या ठिकाणी दफन करून टाकतात. काही जण महापालिकेला कळवतात. मात्र, अंत्यविधीसाठी दोन हजार रुपये शुल्क आकारणी केल्यास कोणीही महापालिकेला कळविणार नाही. मिळेल त्या ठिकाणी दफन करतील. मात्र, दोन हजार रुपयांऐवजी शुल्काची रक्कम कमी केल्यास नागरिकांकडून प्रतिसाद मिळू शकेल. शक्यतो प्राण्यांच्या अंत्यविधीसाठी शुल्क आकारू नये.
- गीता तोरो, प्राणिप्रेमी, लिंकरोड, चिंचवडपाळीव प्राण्यांच्या अंत्यविधीसाठी प्रस्तावित केलेले दोन हजार रुपये शुल्क अधिक आहे. पुणे महापालिका विद्युत दाहिनीत अंत्यसंस्कार करते. अनेक स्वयंसेवी संघटना मृत प्राण्यांचे दफन करतात. कुत्रा, मांजर पाळणाऱ्या बहुतांश व्यक्ती सर्वसामान्य कुटुंबातील आहेत. दोन हजार रुपये शुल्क त्यांना परवडणारे नाही. त्यामुळे शुल्काची रक्कम कमी करावी. प्राण्यांच्या मालकाला शुल्क रकमेची पावती द्यावी. प्राण्यांचे दफन किंवा दहन करतानाचे छायाचित्र किंवा चित्रीकरण करून ते मालकाला द्यावे. तसेच, वाहनसुविधा उपलब्ध करून द्यावी.
- विक्रम भोसले, स्वयंसेवक, वाइल्डलाइन वेल्फेअर असोसिएशन
पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा