पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या विषय समित्यांवर उद्या नवे कारभारी 

सकाळ वृत्तसेवा
Sunday, 4 October 2020

  • ऑनलाइन निवडणूक घेण्यास राज्य सरकारची परवानगी 

पिंपरी : मुदत संपल्यामुळे महापालिकेतील विषय समित्या 14 जून रोजी बरखास्त झाल्या, तेव्हा लॉकडाउन व जमावबंदी होती. त्यामुळे निवडणूक होऊ शकली नाही. आता व्हिडिओ कॉन्फरसिंगद्वारे ऑनलाइन निवडणूक घेण्यास राज्य सरकारने परवानगी दिली आहे. त्यामुळे मंगळवारी (ता. 6) होणाऱ्या सर्वसाधारण सभेत विषय समिती सदस्यांची निवड केली जाईल. त्यानंतर समित्यांच्या अध्यक्षांची निवड केली जाईल. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

महापालिकेची स्थायी समिती म्हणजे शहराची तिजोरी असते. विकास कामांबाबतचे सर्व निर्णय ही समिती घेत असते. या समितीचे अध्यक्ष व नवीन सदस्यांची निवड फेब्रुवारी महिन्यात झाली होती. त्यामुळे ती कार्यरत आहे. मात्र, विधी, शहर सुधारणा, महिला व बालकल्याण आणि कला-क्रीडा व सांस्कृतिक समित्यांची मुदत 14 जून रोजी संपली. तेव्हा लॉकडाउन, संचारबंदी, जमावबंदी आदेश लागू असल्याने नवीन सदस्यांची निवड होऊ शकली. परिणामी त्या बरखास्त झाल्या. त्यानंतर काही दिवसांतच शिक्षण समितीचीही मुदत संपल्याने तीही बरखास्त झाली.

पिंपरी-चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा 

सध्या या समित्यांचे अधिकार सर्वसाधारण सभेकडे आहेत. आता निवडणूक घेण्यास सरकारने परवानगी दिली आहे. ऑक्‍टोबर महिन्याची सर्वसाधारण सभा मंगळवारी आहे. त्यात नवीन सदस्यांची निवड केली जाणार आहे. यात सत्ताधारी भाजपसह राष्ट्रवादी कॉंग्रेस व शिवसेना कोणाला संधी देते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेसने इच्छुक नगरसेवकांकडून गुरुवारपर्यंत (ता. 1) अर्ज मागविले होते. त्यातून कोणाला संधी मिळणार हे मंगळवारीच कळणार आहे. 

सदस्य संख्याबळ 
महापालिकेतील प्रत्येक विषय समितीवर नऊ सदस्यांची निवड केली जाईल. त्यातून एकाची अध्यक्षपदी निवड होईल. महापालिका सभागृहातील संख्याबळानुसार नऊ सदस्यांमध्ये भाजपचे पाच, राष्ट्रवादीचे तीन आणि शिवसेनेचा एक सदस्य असेल. त्या-त्या पक्षाच्या सदस्यांची नावे संबंधित पक्षाचे गटनेते सर्वसाधारण सभेत महापौरांकडे सुपूर्द करतील. त्यानंतर सदस्यांच्या नावाची घोषणा केली जाईल. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

प्रभाग अध्यक्ष अर्जासाठी आज संधी 
महापालिकेचे आठ प्रभाग कार्यालये (क्षेत्रीय) आहेत. त्यांच्या अध्यक्षांची निवड शुक्रवारी (ता. 9) होणार आहे. त्यासाठी इच्छुक नगरसेवकांनी सोमवारी (ता. 5) दुपारी तीन ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत अर्ज दाखल करायचे आहेत. शुक्रवारी सकाळी अकरा वाजता महापालिका भवनातील माजी महापौर मधुकरराव पवळे सभागृहात निवड प्रक्रिया सुरू होईल. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Pimpri Chinchwad Municipal Corporation's subject committees will get new office bearers tomorrow