PCMC: पती, पत्नी की अन्य कोणी? सोडतीनंतर ठरणार लढतीचे गणित | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

PCMC
पती, पत्नी की अन्य कोणी? सोडतीनंतर ठरणार लढतीचे गणित

PCMC: पती, पत्नी की अन्य कोणी? सोडतीनंतर ठरणार लढतीचे गणित

पिंपरी - महापालिका निवडणुकीसाठी मंगळवारी आरक्षण सोडत काढली जाणार आहे. आम्ही निवडणुकीची तयारी केली आहे. पण, प्रभागातील जागा महिलांसाठी आरक्षित झाल्यास पत्नीला निवडणुकीत उभे करणार आहे, असे एका इच्छुक उमेदवाराने सांगितले. अशीच तयारी शहरातील माजी नगरसेवक, नगरसेविकांसह अन्य इच्छुकांनीही केली आहे. त्यामुळे पती, पत्नी की कुटुंबातील अन्य कोणी लढायचे, याचे चित्र मंगळवारच्या सोडतीनंतर स्पष्ट होणार आहे.

कोरोनामुळे २०२१ ची जनगणना न झाल्यामुळे २०११ च्या लोकसंख्येनुसार महापालिकेची आगामी निवडणूक होणार आहे. २०११ च्या लोकसंख्येनुसार महापालिकेची २०१२ व २०१७ ची निवडणूक झाली होती. मात्र, गेल्या दहा वर्षात शहरातील लोकसंख्येची वाढ विचारात घेऊन राज्य सरकारने ११ जागा वाढविल्या आहेत. त्यामुळे २०२२ ची निवडणूक तीन सदस्यीय प्रभाग पद्धतीनुसार १३९ जागांसाठी होणार आहे. त्यासाठी तीन सदस्यांचे ४५ व चार सदस्यांचा एक अशा ४६ प्रभागांची लोकसंख्येच्या प्रमाणात रचना केली आहे. त्यासाठी सरासरी अनुक्रमे ३७ हजार २८८ आणि ४९ हजार ७१८ लोकसंख्या निश्चित झाली आहे.

तसेच, शहराच्या एकूण लोकसंख्येच्या प्रमाणात अनुसूचित जाती (एससी) व अनुसूचित जमातींसाठी (एसटी) अनुक्रमे २२ व तीन जागा निश्चित झाल्या आहेत. स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये महिलांना पन्नास टक्के आरक्षण असल्याने १३९ जागांपैकी ७० जागा महिलांसाठी राखीव असतील. यात एससी, एसटीतील ५० टक्के महिलांच्या जागांचाही समावेश असेल. त्याचीच सोडत मंगळवारी काढली जाणार आहे.

आरक्षण सोडत मंगळवारी काढली जाणार आहे. त्यात अनुसूचित जाती, जमाती व खुल्या गटातील महिलांसाठी आरक्षण काढले जाईल. सोडतीनंतर एक जूनला प्रभागनिहाय आरक्षणाचे प्रारूप प्रसिद्ध केले जाईल. प्रभागनिहाय आरक्षण निश्चितीबाबत हरकती व सूचना दाखल करण्याचा कालावधी एक ते सहा जूनपर्यंत आहे.

- बाळासाहेब खांडेकर, सहायक आयुक्त, महापालिका

Web Title: Pimpri Chinchwad Municipal Election Reservation Draw Politics Planning

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top