पिंपरी-चिंचवडच्या राजकारणात पालिकेच्या वैद्यकीय अधिकाऱ्याचा राजकीय 'बॉम्ब'

सकाळ वृत्तसेवा
Sunday, 27 September 2020

शहराच्या राजकारणात अधिकाऱ्याचा राजकीय 'बॉम्ब' असे वातावरण निर्माण झाले.

पिंपरी : 'वॉर्ड पद्धत पुन्हा सुरू होत आहे. निवडणूक लढवायला काही हरकत नाही, असं वाटायला लागलं' अशी पोस्ट वेगवेगळ्या छायाचित्रांसह महापालिकेचे आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. के. अनिल रॉय यांनी टाकली आणि शहराच्या राजकारणात अधिकाऱ्याचा राजकीय 'बॉम्ब' असे वातावरण निर्माण झाले. रॉय यांनी 'जोक टाइम' असे म्हटले असले, तरी वेगवेगळे तर्क त्यांच्या पोस्टबाबत काढले जात आहेत. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

डॉ. के. अनिल रॉय हे महापालिकेतील एक उच्च पदस्थ अधिकारी आहेत. मात्र, त्यांचे सहकारी अतिरिक्त वैद्यकीय अधिकारी डॉ. पवन साळवे यांच्याशी त्यांचे पटत नसल्याची चर्चा महापालिका वर्तुळात आहे. सध्या डॉ. रॉय यांच्याकडे आरोग्य विभाग असून, डॉ. साळवे यांच्याकडे वैद्यकीय विभागाची जबाबदारी आहे. रॉय यांच्या सेवानिवृत्तीला अवघा एक-दीड वर्षांचा कालावधी शिल्लक आहे. आणि महापालिका निवडणूकही साधारणतः दीड वर्षांनी अर्थात फेब्रुवारी 2022 मध्ये आहे. त्यामुळे रॉय यांच्या पोस्टला मोठे महत्त्व आहे. त्यांनी पोस्टवर 2022 असाही उल्लेख केल्यामुळे अनेकांचे लक्ष वेधले गेले आहेत. 

पिंपरी-चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा 

महापालिकेची 2017 ची निवडणूक पॅनेल अर्थात प्रभाग पद्धतीने लढली गेली होती. तत्कालीन भाजप सरकारने प्रभाग पद्धती आणली होती. त्यामुळे सध्या एका प्रभागात चार नगरसेवक आहेत. असे 32 प्रभाग आहेत. त्यापूर्वीची म्हणजे 2012 ची निवडणूक द्विसदस्यीय प्रभाग पद्धतीने लढविली होती. त्या वेळी 64 प्रभाग होते. त्यापूर्वीच्या दोन निवडणुका मात्र वॉर्ड पद्धतीने झाल्या होत्या. त्या वेळी महापालिकेत राष्ट्रवादी कॉंग्रेसची सत्ता होती. सध्या भाजपची सत्ता आहे. राष्ट्रवादी व कॉंग्रेसचा प्रभाग पद्धतीला विरोध आहे. सध्या राज्यात दोन्ही पक्षांसह शिवसेनेचे सरकार आहे. भाजपची भूमिका शिवसेनेलाही मान्य नव्हती. त्यामुळे महापालिका निवडणूक प्रभाग पद्धतीऐवजी वॉर्ड पद्धतीने घेण्यास तीनही पक्ष अनुकूल असण्याची शक्‍यता आहे. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

याशिवाय, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शहराकडे व महापालिकेतील कामांकडे अधिक लक्ष घातल्याचे गेल्या सहा महिन्यात दिसून आले आहे. त्यामुळे आगामी निवडणूक वॉर्ड पद्धतीने होऊ शकते, असा तर्क लढविला जात असून त्या दृष्टीने डॉ. अनिल रॉय यांच्या 'वॉर्ड पद्धत पुन्हा सुरू होत आहे. निवडणूक लढवायला काही हरकत नाही, असं वाटायला लागलं' या पोस्टला महत्त्व प्राप्त झाले आहे. अनेक नेटकऱ्यांनीही त्यांना लाइक केले असून 'डॉक्‍टरसाहेब निवडणूक लढवाच' असा सल्ला दिला आहे. कारण, काहीही असले तरी, डॉक्‍टरांच्या राजकीय बॉम्बने महापालिका निवडणूक चर्चेत आली आहे. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: pimpri chinchwad municipal health medical officer dr k anil roy has posted a political post