पिंपरी-चिंचवड : प्रभाग एकमध्ये वाढले दुप्पट मतदार

Voter
Voter

पिंपरी - महापालिका प्रभाग एक, चार व चौदामधील प्रत्येकी एका जागेसाठी पोटनिवडणूक होणार आहे. त्यासाठी १५ जानेवारीपर्यंत नवीन मतदार नोंदणी करून पोटनिवडणुकीसाठी तीनही प्रभागातील अंतिम मतदारयादी बुधवारी (ता. ३) प्रसिद्ध करण्यात आली. २०१७ च्या तुलनेत प्रभाग एकमध्ये तब्बल दुप्पट मतदार वाढले आहेत. 

प्रभाग एकमधील दत्तात्रेय साने, प्रभाग चारमधील लक्ष्मण उंडे, प्रभाग १४ मधील जावेद शेख यांचे कोरोनामुळे सहा महिन्यांपूर्वी निधन झाले आहे. त्या रिक्त जागांसाठी पोटनिवडणूक होणार आहे. त्यासाठी निवडणूक याद्या अद्ययावत करण्याचा आदेश राज्य निवडणूक आयोगाने महापालिका निवडणूक विभागाला दिले होते. त्यानुसार १५ जानेवारीपर्यंत नवीन मतदार नोंदणी करून तीनही प्रभागांतील अंतिम मतदारयाद्या प्रसिद्ध करण्यात आल्या. 

दृष्टिक्षेपात मतदार
महापालिका २०१७ च्या निवडणुकीवेळी प्रभाग एकमध्ये १४ हजार ६५५ महिला व १९ हजार १३९ पुरुष मतदार होते. ती संख्या आता अनुक्रमे २९ हजार ५०४ आणि ३६ हजार ६३४ झाली आहे. प्रभाग चारमध्ये १६ हजार ७२४ महिला व १९ हजार ९४२ पुरुष मतदारांची संख्या आता अनुक्रमे १९ हजार ५९९ आणि २२ हजार ८३३ झाली आहे. प्रभाग चौदामधील २१ हजार १८ महिला व २४ हजार ६८६ पुरुष मतदार होते. आता २३ हजार ३०१ महिला व २६ हजार ९८७ पुरुष मतदार आहेत. यावेळी तृतीयपंथी मतदारांची वेगळी नोंद करण्यात आली आहे. त्यांची संख्या प्रभाग एकमध्ये चार आणि प्रभाग चार व १४ मध्ये प्रत्येकी एक आहे. 

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

असे होते पक्षीय स्थान
प्रभाग एकमधील दत्तात्रेय साने व प्रभाग १४ मधील जावेद शेख राष्ट्रवादीचे; तर प्रभाग चारमधील लक्ष्मण उंडे भाजपचे नगरसेवक होते. चार सदस्यीय प्रभागातील अनुक्रमे ‘ड’, ‘ब’ आणि ‘अ’ जागेवरून ते निवडून आले होते. या जागांवर नवी मुंबई, नाशिक, औरंगाबाद या महापालिका निवडणुकीसोबत शहरातील तीन जागांवर पोटनिवडणूक होण्याची शक्यता आहे. पिंपरी-चिंचवड महापालिकेची आगामी निवडणूक फेब्रुवारी २०२२ मध्ये होणार आहे. त्यामुळे पोटनिवडणुकीत विजयी होणाऱ्यांना अवघा काही महिन्यांचा कालावधी मिळणार आहे. 

Edited By - Prashant Patil

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com