
पिंपरी - शहरात १ जुलै २०२१ पासून ‘पे ॲंड पार्क’ योजना (Pay and Park Scheme) राबविण्यात आली होती. महापालिका स्थायी समितीसमोर (Standing Committee) ‘पे ॲंड पार्क’ विषयाला मंजुरी मिळाली. मात्र, अवघ्या तीन महिन्यांत ही योजना बारगळली. त्यातून आठ लाख रुपयांचे उत्पन्न महापालिकेला (Municipal) मिळाले. कोरोना काळानंतर आर्थिक संकटात आलेले नागरिक अजुन सावरलेले नाहीत. त्यात पुन्हा नागरिकांच्या खिशाला दोन महिन्यांत भुर्दंड बसण्याची चिन्हे आहेत. अशा परिस्थितीत नागरिकांनी ‘पे ॲंड पार्क’ धोरणाला तीव्र नाराजी व विरोध दर्शविला आहे.
शहरात २७ लाखांपेक्षा अधिक लोकसंख्या आहे. वाहने दुपटीने आहेत. परंतु, त्यासाठी पुरेशी जागा शहरात नाही. पार्किंगच्या जागा अनेकांनी गिळंकृत केल्या आहेत. त्यातूनही वाहन पार्किंगसाठी शहरातील ४० ठिकाणे निवडली गेली. जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर महिन्यात ही योजना सुरू राहिली. पार्किंगसाठी कंत्राटी तत्त्वावर कर्मचारी तैनात केले. त्यांना तिकिटासाठी पास्को मशिन देण्यात आल्या. वाहनांसाठी पार्किंगची रस्त्यावर आखणी केली. परंतु पार्किंग धोरणाला विरोध असल्याने, नागरिकांच्या रोषाला सामोरे जावे लागले. अनेक संघटनांनी या धोरणाच्या विरोधात आंदोलन केली. निवेदने दिली. त्यानंतर योजना पूर्णपणे बंद झाली.
पार्किंग धोरणात पुन्हा नव्याने सुधारणा करून वाहतूक पोलिसांकडून दंडात्मक कारवाई होणार आहे. त्यासाठी पाच टोइंग वाहने दिली जाणार आहेत. बेशिस्त वाहनांना जॅमर लावले जाणार आहेत. वाहतूक विभागाकडून दहा टप्प्यात विभाजन केले आहे. नो पार्किंगमध्ये वाहने लावल्यास कारवाई होणार आहे. सध्या या वाहनांची निविदा वाहतूक कमिटीसमोर आहे. निविदा प्रक्रियेचे काम अंतिम टप्प्यात असून, ऑडिट सुरू आहे. मागील प्रस्तावात ज्या प्रकारे ‘पे ॲंड पार्क’ साठी अंमलबजावणी करण्यात आली होती, त्यात काही अंशी सुधारणा करून पुढे कार्यान्वित करण्यात येणार असल्याचे महापालिका अधिकाऱ्यांनी सांगितले.
‘शहरातील पार्किंग पॉलिसी धोरणाची अंमलबजावणी करण्याची कार्यवाही पुन्हा सुरू होणार आहे. महापालिकेकडून वाहतूक विभागाला वाहने ताब्यात मिळाल्यानंतर दोन महिन्यात ही योजना सुरू होईल. शहरात अवजड वाहने नको तिथे पार्क केली जातात. त्यामुळे रस्त्यांवर वाहतूक कोंडीचे चित्र निर्माण होते. त्यामुळे, बेशिस्त वाहतुकीला शिस्त लागावी म्हणून ‘पे ॲण्ड पार्क’ पॉलिसी लागू केली आहे. ११३ प्रमुख रस्ते आणि उड्डाणपुलाखालील ठिकाणे निवडली आहेत.’
- बापूसाहेब गायकवाड, कार्यकारी अभियंता, वाहतूक नियोजन विभाग, महापालिका
‘पिंपरी मार्केटमध्ये अनेकदा वाहनचालकांना दुचाकी लावताना अडचणी येतात. वाहन लावण्यासाठी देखील जागा मिळत नाही. चारचाकी वाहन घेऊन अनेक ठिकाणी चालक जाऊच शकत नाही, अशी परिस्थिती शहरात आहे. वाहतुकीला आधी शिस्त लावावी. पुरेशी जागा पार्किंगला तयार कराव्यात. केवळ पैसे वसुलीसाठी नागरिकांना वेठीस धरू नये.’
- अन्वर जहागीरदार, नागरीक, निगडी
‘कित्येकदा रिक्षा रस्त्यावर उभ्या कराव्या लागतात. काही कामांसाठी पार्किंगला लावाव्या लागतात. आधीच कोरोनामुळे नागरीक हतबल झाले आहेत. एकवेळचा भाजीपाला एका दिवसाच्या पार्किंगच्या पैशात निघतो. सर्वसामान्य किती हतबल आहे हे धोरणकर्त्यांना माहीत नाही. अनेकदा आमचे पार्किंगवाल्या सोबत वाद झाले आहेत. या योजनेला आमचा विरोध आहे.’
- राजेश कुद्रे, रिक्षाचालक, चिंचवड
प्रति तासाला मोजावे लागणारे पैसे
- दुचाकी आणि तीन चाकीसाठी ५ रुपये
- चारचाकीसाठी १० रुपये
- टेंपो आणि मिनी बससाठी २५ रुपये
- ट्रक आणि खासगी बससाठी १०० रुपये
या मार्गावर आहेत ‘पे ऍण्ड पार्क’ची ठिकाणे
टेल्को रोड, स्पाईन रोड, नाशिक फाटा वाकड बीआरटीएस रस्ता, जुना मुंबई-पुणे रस्ता, एम. डी.आर., काळेवाडी फाटा ते देहू आळंदी रस्ता, औंध रावेत रस्ता, निगडी वाल्हेकरवाडी रस्ता, टिळक चौक ते बिग इंडिया चौक, प्रसुनधाम सोसायटी रोड, थेरगाव गावठाण रोड, नाशिक फाटा ते मोशी रोड, वाल्हेकरवाडी रोड, उड्डाणपुलाखालील जागा ऑफ स्ट्रीट पार्किंग, रॉयल ग्लोरी सोसायटी वाकड, रहाटणी स्पॉट – १८ मॉल, अंकुशराव लांडगे भोसरी सभागृह-भोसरी, रामकृष्ण मोरे सभागृह-चिंचवड, भक्ती शक्ती फ्लाय ओव्हर- निगडी, एम्पायर इस्टेट फ्लाय ओव्हर- चिंचवड, चापेकर चौक ब्लॉक -१ चिंचवड, चापेकर चौक ब्लॉक -२ चिंचवड, पिंपळे सौदागर वाहनतळ, मधुकर पवळे उड्डाण पूल निगडी याठिकाणी व्यवस्था करण्यात आली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.