दरोडा टाकताना तो आधी महिलांना 'टार्गेट' करायचा मग...

मंगेश पांडे 
Friday, 31 July 2020

वेगवेगळ्या क्‍लुप्त्या लढवीत तब्बल सतरा वर्षे राज्याच्या विविध ठिकाणी दरोडा टाकणारा अट्टल दरोडेखोर अखेर पोलिसांच्या जाळ्यात अडकलाच.

पिंपरी : नातेवाइकांकडे राहून दरोडा टाकण्याच्या ठिकाणची 'रेकी' करायची, घरात शिरल्यानंतर घरातील महिलेच्या गळ्याला हत्यार लावून दागिने, रोकड लुटून फरारी व्हायचे, पोलिसांच्या जाळ्यात अडकू नये, यासाठी वारंवार ठिकाणं बदलण्यासह पेहरावही बदलायचा, अशा पद्धतीने वेगवेगळ्या क्‍लुप्त्या लढवीत तब्बल सतरा वर्षे राज्याच्या विविध ठिकाणी दरोडा टाकणारा अट्टल दरोडेखोर अखेर पोलिसांच्या जाळ्यात अडकलाच. सतरा वर्षांपूर्वीच्या गुन्ह्यात आपल्याला ताब्यात घेतल्याचे समजताच तो देखील अवाक्‌ झाला. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 

रघुवीरसिंग चंदूसिंग टाक (वय 51, रा. परतूर जि. जालना) असे या अट्‌टल दरोडेखोराचे नाव आहे. 27 जुलै 2003 ला पहाटे सव्वा तीन वाजता आरोपींनी देहूरोड येथील धनराज केसरीमल सोनिगरा यांच्या घरात शिरत त्यांच्या मुलीच्या गळ्याला चाकू लावून 21 तोळे सोन्याचे दागिने व आठ लाख 50 हजारांची रोकड लंपास केली होती. या गुन्ह्यातील इतर आरोपी जेरबंद झाले होते. मात्र, रघुविरसिंग हा मागील सतरा वर्षांपासून फरारी होता. सतत पेहराव बदलून पोलिसांना गुंगारा द्यायचा. 

पिंपरी-चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

दरम्यान, टाक हा आरोपी सध्या जालना जिल्ह्यातील परतूर येथे त्याच्या गावी मासे विक्रीचा धंदा करीत असल्याची माहिती पिंपरी-चिंचवड पोलिसांच्या गुन्हे शाखा युनिट पाचच्या पथकाला मिळाली होती. त्यानुसार पथक जालन्याला रवाना झाले. मासे विक्रीच्या ठिकाणी पोलिस सापळा लावण्याच्या तयारीत असतानाच आरोपी जालना न्यायालयात एका सुनावणीसाठी गेला असून, त्याच्या डोक्‍यावर निळ्या रंगाची पगडी आहे. एवढीच माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी जालना येथील न्यायालय परिसरात सापळा रचला. दरम्यान, आरोपी न्यायालयाबाहेर पडत असतानाच परिसरात असलेल्या साध्या गणवेशातील पोलिसांना त्याने नजरेवरून ओळखले. त्यामुळे तो पुन्हा न्यायालयात गेला. दरम्यान, पथकातील एक अधिकारी त्याला नकळत त्याच्या पाठोपाठ न्यायालयात गेले व त्याच्यावर नजर ठेवून होते. अर्धा तास तो आतमध्येच फिरत राहिला. आता आपण जाळ्यात अडकणार याची कल्पना त्याला आली होती. दरम्यान, काही वेळाने तो बाहेर पडल्यानंतर पसार होण्याच्या प्रयत्नात असतानाच आंबड चौक येथे पथकाने त्याच्यावर झडप टाकली. सतरा वर्षांपूर्वीच्या गुन्ह्यात आपल्याला ताब्यात घेतल्याचे समजताच तो देखील अवाक्‌ झाला. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

ही कारवाई युनिट पाचचे वरिष्ठ निरिक्षक बाळकृष्ण सावंत, सहाय्यक पोलिस निरीक्षक राम गोमारे, कर्मचारी फारुक मुल्ला, राजकुमार ईघारे, दयानंद खेडकर, भरत माने, धनराज किरनाळे, दत्तात्रय बनसोडे, सावन राठोड, संदीप ठाकरे, मयूर वाडकर, ज्ञानेश्‍वर गाडेकर, स्वामीनाथ जाधव, नितीन बहिरट, शामसुंदर गुट्टे, गणेश मालुसरे, धनंजय भोसले, गोपाळ ब्रह्मांदे यांच्या पथकाने केली. 

... अशी होती गुन्हे करण्याची पद्धत 

एखाद्या नातेवाइकाकडे मुक्कामी राहायचे. ज्या ठिकाणी दरोडा टाकायचा आहे, त्याठिकाणची पाहणी (रेकी) करून सोनं, रोकड असे मोठ्या लुटीचे टार्गेट समोर ठेवायचे. दरोड्यासाठी मध्यरात्रीची वेळ निवडायची. घरात शिरल्यानंतर घरातील स्त्रीला हत्याराचा धाक दाखवून आपल्या ताब्यात ठेवायचे. त्यानंतर महिलांच्या अंगावरील दागिने घेत तिजोरीतील रक्कम लुटायची. घरातील एखाद्या सदस्याने हालचाल करण्याचा प्रयत्न केल्यास त्याच्यावर प्राणघातक हल्ला करण्यासही मागे-पुढे पाहत नाहीत. यामुळे समोरचा व्यक्ती कितीही धाडसी असला तरी तो शांतच राहणार असे वातावरण निर्माण करायचे. 

असा बदलायचा पेहराव 

आरोपी ज्या समाजात आहे, त्यामध्ये अनेक जण साधारण डोक्‍यावर पगडी परिधान करतात. आरोपीचाही पगडीचाच चेहरा अनेकांना परिचित होता. मात्र, तो अनेकदा पगडी काढायचा, कधी दाढी कमी करायचा, कधी वाढवायचा, अचानक पॅंन्ट शर्ट; तर कधी धोतर परिधान करायचा. त्यामुळे तो पहिल्या नजरेत ओळखू येत नसे. पगडी काढल्यानंतर तर त्याची ओळखच पटणार नाही, अशाप्रकारे तो स्वत:च्या राहणीमानात वेळोवेळी बदल करायचा. 

दरोड्याचे नऊ गुन्हे दाखल 

या आरोपीवर जालना येथे आठ, औरंगाबाद, अकोला, नागपूर, बीड, मुंब्रा व पुण्यातील चतु:श्रृंगी येथे प्रत्येकी एक, तर वाशिम दोन व बीड येथे चार असे एकूण वीस गंभीर गुन्हे दाखल आहेत. यामध्ये दरोड्याचे नऊ गुन्हे दाखल असून, दरोड्याची तयारी, लूटमार, घरफोडी, शस्त्र बाळगणे यासारख्या गंभीर गुन्ह्यांचाही समावेश आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: pimpri chinchwad police arrested notorious robber