पिंपरी : जगद्गगुरू संत तुकाराम महाराज संतपीठ’ला आंतरराष्ट्रीय पुरस्कार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

PCMC Sant Peeth

राज्यातील पहिले संतपीठ पिंपरी-चिंचवडमध्ये उभारण्यात आले. अल्पावधीतच संतपीठाचा लौकीक आंतरराष्ट्रीय पातळीवर झाला आहे.

पिंपरी : जगद्गगुरू संत तुकाराम महाराज संतपीठ’ला आंतरराष्ट्रीय पुरस्कार

पिंपरी - राज्यातील पहिले संतपीठ पिंपरी-चिंचवडमध्ये उभारण्यात आले. अल्पावधीतच संतपीठाचा लौकीक आंतरराष्ट्रीय पातळीवर झाला आहे. जगद्गुरू संत तुकाराम महाराज संतपीठ शाळेला सांस्कृतिक उपक्रमांना प्रोत्साहन देणारी सर्वोत्कृष्ठ शाळा पुरस्कार जाहीर झाला आहे, अशी माहिती प्राचार्या मृदुला महाजन यांनी दिली.

इंटशरनॅनल युनायटेड एज्युकेशनिस्टस फ्रेटरनिटी या संस्थेद्वारे आंतरराष्ट्रीय मेगा समीट आणि शैक्षणिक उत्कृष्ठता पुरस्कार कार्यक्रमांतर्गत उत्तर प्रदेशमधील अयोध्या येथे दि. १२ नोव्हेंबर रोजी या पुरस्काराचे वितरण होणार आहे. यावेळी सीबीएसई बोर्डाचे सेक्रेटरी अनुराग त्रिपाठी उपस्थित राहणार आहेत.

प्राचार्या मृदुला महाजन म्हणाल्या की, सीबीएसई बोर्डाच्या माध्यमातून इंग्रजी भाषेत दिल्या जाणाऱ्या शिक्षणाबरोबरच संत साहित्याचे शिक्षण देऊन भारतीय संस्कृती व परंपरेची शिकवणे देणे हे संतपीठाचे वैशिष्टय आहे. शाळेच्या वेळापत्रकामध्ये शैक्षणिक विषयांसह संत साहित्य, तबला वादन, पखवाज वादन, श्लोक, अभंग, स्त्रोत, हरिपाठ पठण, संगीत, नृत्य हे विषय मुलांना शिकवले जातात. भारतभर कार्य केलेल्या अनेक संतांच्या जयंतीचे तसेच पुण्यतिथीचे औचित्य साधून विद्यार्थ्यांना त्यांच्या कार्याची माहिती दिली जाते. आमदार लांडगे यांच्या सकारात्मक पाठपुराव्यामुळे पिंपरी-चिंचवडमध्ये राज्यातील पहिले संतपीठ सुरू झाले.

दरम्यान, महापालिका आयुक्त तथा प्रशासक आणि जगद्गुरू संत तुकाराम महाराज संत पीठाचे अध्यक्ष शेखर सिंह यांनी सर्व संचालक, प्राचार्य आणि शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे अभिनंदन केले आहे. संत पीठाचे संचालक व राज्याच्या साहित्य व संस्कृती मंडळाचे अध्यक्ष डॉ. सदानंद मोरे, संचालक व संत ज्ञानेश्वर महाराज संस्थानचे अध्यक्ष डॉ. अभय टिळक, संचालिका डॉ. स्वाती मुळे, राजू महाराज ढोरे यांच्या मार्गदर्शनाखाली संतपीठाने वैविध्यपूर्ण उपक्रम राबवले आहेत.

आले मूळ भेदी खडकाचे अंग। अभ्यासासी सांग कार्यसिद्धी॥

‘आले मूळ भेदी खडकाचे अंग। अभ्यासासी सांग कार्यसिद्धी॥’

या तुकोबारायांच्या अभंगाप्रमाणे प्रमाणे संतपीठ स्कूल ही काळाची गरज ओळखून वैश्विक नागरिक घडवण्याचे कार्य करीत आहे.

पिंपरी- चिंचवडला वारकरी संप्रदायाचा वारसा आहे. संतपीठाची इमारत उभारणीपासून शालेय अभ्यासक्रम आणि अध्यात्मिक, विज्ञानाधारित शिक्षण प्रणाली याबाबत त्या-त्या क्षेत्रातील तज्ञ व्यक्तींचे मार्गदर्शन घेतले जाते. मूल्याधिष्ठित आणि आध्यात्मिक शिक्षण प्रणाली समाजात रुजवण्याचा संस्थेचा प्रयत्न आहे. महाराष्ट्राच्या शिक्षण क्षेत्रात आदर्शवत काम संतपीठाच्या माध्यमातून होईल, असा विश्वास वाटतो.

- महेश लांडगे, शहराध्यक्ष व आमदार, भाजपा, पिंपरी- चिंचवड.